शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भेटा वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट झालेल्या अभिषेक आणि कुलदीपला

By सचिन जवळकोटे | Published: July 11, 2018 5:24 PM

सातारा हा शूर जवानांचा जिल्हा. याच जिल्ह्यातले दोन विशीतले तरुण आता सैन्यदलात थेट लेफ्टनंट झालेत. ज्या वयात मुलं पाठीला सॅक लावून कॉलेजकट्टय़ावर बसतात, त्या वयात हे दोघे सैन्यात अधिकारी झालेत...

कोंडवे गाव आज भलतंच सजलेलं. गावच्या पारावर बॅण्डपथक उभारलेलं. चांगले-चुंगले कपडे नेसून ग्रामस्थ एकत्र येऊ लागलेले. सार्‍यांच्याच चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहू लागलेला. एवढय़ात समोरून मिरवणूक आली. यातल्या उघडय़ा जीपमध्ये होती लाडकी सत्कारमूर्ती. प्रत्येकजण या व्यक्तीशी हस्तांदोलन करून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करू लागली.  कोण होती ही सत्कारमूर्ती? एवढा कसला जल्लोष चालला होता या गावात?प्रत्येकाच्या दृष्टीनं नवलाईची गोष्ट वाटणारी ही व्यक्ती का ठरली होती कौतुकाला पात्र? खरं तर, या गावानं आजर्पयत अनेक मिरवणुका बघितलेल्या. अनुभवलेल्या. कधी विजयी उमेदवारांच्या राजकीय मिरवणुकांमध्ये अंगाला गुलालही लावून घेतलेला, तर कधी यात्रेतील भंडारही उधळून घेतलेला. मात्र, आजची मिरवणूक अविस्मरणीय होती. मिसरूड फुटलेल्या एका कोवळ्या तरुणाची. त्याच्या जिद्दीची. आजपावेतो चार-पाच डझन पावसाळे पाहिलेल्या सुरकुत्यांनाही त्याचं अपार कौतुक वाटत होतं.  या सत्कारमूर्तीचं नाव होतं अभिषेक. सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावचा हा सुपुत्र. वय वर्षे अवघं वीस. ज्या वयात पोरं पाठीवरच्या सॅकमध्ये वह्या पुस्तकांचं ओझं घेऊन कॉलेज लाइफ जगत असतात, त्यावेळी हा अभिषेक छातीवर ‘लेफ्टनंट’चं पदक लावून सैन्यात दाखल झाला आहे. लेफ्टनंट अभिषेक अनिल वीर,  इंडियन आर्मी, हैदराबाद कॅम्प.सातारा हा शूर जवानांचा जिल्हा. जिगरबाज सैनिकांचा जिल्हा. या जिल्ह्यानं आजपावेतो देशाला शेकडो मिलिटरी ऑफिसर दिलेले. हजारो घरांचे उंबरठे जवानांची पाठवणी करताना ओवाळले गेलेले. मात्र, अभिषेकची गोष्ट वेगळी होती. अत्यंत कमी वयात लेफ्टनंट होण्याचा बहुमान त्यानं मिळविला होता. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं हे अनोखं यश प्राप्त केलं होतं.म्हणूनच गावानं त्याची आज उघडय़ा जीपमधून सवाद्य मिरवणूक काढली होती. गावात ठिकठिकाणी त्याचे फ्लेक्सही लावले गेले होते.विशेष म्हणजे कमी वयात लेफ्टनंट होण्याचा मान कोंडव्याच्या अभिषेकबरोबरच्या सातार्‍याच्या कुलदीपनंही मिळविला होता. त्याचंही वय अवघं वीस होतं. कोंडव्यातल्या सत्कार सोहळ्यात त्याचाही गौरव करण्यात आला होता. अभिषेकचे वडील शेतकरी. कोंडव्यात पोल्ट्रीफार्म टाकून संसार मोठा केला. त्यांनी आयुष्यभर कोंबडय़ा सांभाळण्याचं काम केलं असलं तरी आपल्या मुलानं देश सांभाळावा, ही त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा. म्हणूनच त्यांनी अभिषेकला लहानपणीच प्रायमरी मिलिटरी स्कूलच्या बालवाडीत दाखल केलं. सातारा सैनिक स्कूलमधील अधिकार्‍यांच्या पत्नी या ‘प्रायमरी’त टीचर म्हणून काम करायच्या. सरकारी सैनिक स्कूलशी याच अर्थाअर्थी काही संबंध नसला तरी भविष्यातील मिलिटरी लाइफचा बेस इथंच तयार केला जायचा. अभिषेक याच ‘प्रायमरी’तून थेट ‘सैनिक स्कूल’मध्ये दाखल झाला. तो पाचवीत असतानाच त्याच्यातला ‘स्पार्क’ तिथल्या शिक्षकांनी ओळखला, म्हणूनच पालकांनीही त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं. दहावीत अन् बारावीला सरासरी नव्वद टक्के मार्क मिळाल्यानंतर अत्यंत कठीण परीक्षेतून त्याची ‘एनडीए’साठी निवड झाली. त्या काळात त्याला खूप जपलं गेलं. गावाकडं त्याची आजी वारली. मात्र, वडिलांनी मातृविरहाचं दुर्‍ख मनातल्या-मनात ठेवलं. अभिषेकला कळूही दिलं नाही. जेव्हा तो परीक्षा देऊन सुटीवर घरी आला, तेव्हा ही वाईट बातमी त्याला सांगण्यात आली. खडकवासलाच्या तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर डेहराडून इथं ‘आयएमए’ अर्थात इंडियन मिलिटरी अकॅडमीत तो भरती झाला. हाही काळ अत्यंत कठीण कष्टाचा होता.मात्र, या परीक्षेतही चांगल्यारितीनं पास होऊन तो बाहेर आला, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर झळकत होता प्रचंड आत्मविश्वास. लेफ्टनंटपदाची पदकं मिरवत जेव्हा तो भेटला, तेव्हा आई-वडिलांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू. कमी वयात आपला सुपुत्र लष्करात अधिकारी बनला, ही भावना त्यांची मान अभिमानानं उंचावत होती.     

अकरावीला असतानाच ‘एनडीए’ची परीक्षा.

पूर्वीच्या काळी बारावीनंतर दिली जायची ‘एनडीए’ची परीक्षा; परंतु बारावी अगोदरही या परीक्षेला बसता येतं, हे आजही खूप कमी मंडळींना माहीत. अभिषेक अन् कुलदीप यांनी तर अकरावीला असतानाच ही परीक्षा दिली. तिही केवळ अभ्यासाचा सराव म्हणून. त्यानंतर बारावीला असताना दोघांनी परीक्षा दिली, तेव्हा त्यांचं वय होतं अवघं साडेसोळा वर्षे. या लेखी परीक्षेत ते दोघे पास झाले, तेव्हा बारावीचाही लागून गेला होता रिझल्ट. त्यानंतरच्या ‘एसएसबी’ अर्थात तोंडी अन् प्रॅक्टिकल परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले, तेव्हा त्यांचं वय होतं सतरा वर्षे. ‘एनडीए’ची तीन वर्षे संपवून ते डेहराडूनला हजर झाले, तेव्हा त्यांना लागलं होतं विसावं वर्ष. लेफ्टनंटपदाची पदवी घेऊन ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी साजरा केला एकविसावा वाढदिवस. पूर्वी सेकंड लेफ्टनंटपद दिलं जायचं. आता संधी असते थेट लेफ्टनंटचीच.लहानपणापासूनच सैनिकी शिस्तीचं शिक्षण अन् ‘एनडीए’ परीक्षेचा तंत्रशुद्ध अभ्यास. यामुळंच हे दोघेही एकाच झटक्यात पहिल्याच परीक्षेत पास झाले. बाकीची मुलं इथंच ठेच लागून धडपडतात. वारंवार परीक्षा देण्यातच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ निघून जातो.

जागा 310. अन् परीक्षार्थी सहा लाख !

लष्करी अधिकारी होण्याचं स्वप्न बहुतांश तरुणांमध्ये असतं. त्यामुळेच अलीकडच्या काळात नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात ‘एनडीए’च्या परीक्षेला बसणार्‍यांची संख्या वरचेवर वाढतच चाललीय. ‘आयएएस किंवा आयपीएस’ धर्तीवरची ही परीक्षा ‘यूपीएससी’चीच असते. 310 जागांसाठी प्रत्येक लेखी परीक्षेला देशभरातून किमान पाच ते सहा लाख उमेदवार बसतात. मात्र यातील केवळ पाच ते सहा हजार तरुणच पास होतात.यानंतरची अवघड टेस्ट म्हणजे ‘एसएसबी’ अर्थात ‘सव्र्हिस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा. तब्बल पाच दिवस चालणार्‍या या परीक्षेत उमेदवाराची शारीरिक-मानसिक स्थिती, त्याची देहबोली, त्याचं राहणीमान अन् त्याचा आत्मविश्वास या सार्‍या गोष्टींची घेतली जाते चाचणी. यातून निवडले जातात फक्त पाचशे उमेदवार. मग या यादीतीलही पहिल्या 310 जणांना मिळते लष्करात दाखल होण्याची सुवर्णसंधी.  यातही तीन प्रकार असतात. दोनशे तरुण ‘आर्मी’कडे वळतात. सत्तर ‘एअर फोर्स’मध्ये, तर चाळीस जातात ‘नेव्ही’त. त्यांचे गुण अन् त्यांची इच्छा या दोन्हींचा अभ्यास करून घेतला जातो निर्णय.

दोघांनाही चष्मा. दोघांचेही आजोबा देशसेवेत!

अभिषेक अन् कुलदीप बालवाडीपासून एकाच क्लासमध्ये. म्हणजे जणू लंगोटीयार. सोळा वर्षाचं सैनिकी शिक्षणही त्यांनी एकत्रच घेतलेलं. आता लेफ्टनंट म्हणून दोघेही हैदराबादच्या कॅम्पमध्येच एकत्र डय़ूटी बजावताहेत. सातार्‍याची ही सर्वात लहान जोडी पंजाब, उत्तर प्रदेश अन् हरियाणामधल्या आडदांड सहकार्‍यांचं वेधून घेते नेहमीच लक्ष. या दोघामधलं साधम्र्य म्हणजे दोघांनाही पूर्वीपासून चष्मा. त्यामुळंच दोघांनीही ‘एअर फोर्स’ अन् ‘नेव्ही’चा विचार न करता जॉईन केली थेट ‘आर्मी’. विशेष म्हणजे, या दोघांचेही आजोबा देशसेवेतच होते. अभिषेकचे वडील पांडुरंग वीर हे मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झालेले. निवृत्त होताना मात्र त्यांनी सहायक आयुक्त अर्थात ‘एसीपी’ म्हणूनच सॅल्यूट ठोकलेला. कुलदीपचे आजोबा दिनकर पवार हे 1925 च्या सुमारास लान्स नायक म्हणून लष्करात दाखल झालेले. दुसर्‍या महायुद्धातही त्यांनी मदरुमकी गाजवलेली. त्यामुळंच की काय, या दोघांच्याही नसा-नसात पूर्वजांच्या शौर्याचंच रक्त सळसळत आलेलं.  

कुलदीपनं पटकाविली कैक पदकं ! 

डेहराडूनच्या प्रशिक्षण काळात कुलदीप पवारनं कैक पदकं कमविली. त्यानं पटकावलेलं ब्राँझ पदक तर महाराष्ट्राची शान उंचाविणारं ठरलं. ही सारी पदकं उघडून दाखविताना त्याचे वडील नानासाहेब पवार सांगत होते, ‘माझे वडील लष्करात होते. माझी इच्छा असूनही मी लष्करात जाऊ शकलो नाही. मुलाला मात्र कोणत्याही परिस्थितीत लष्करी अधिकारी बनवायचं, हे डोक्यात ठेवूनच लहानपणापासून कुलदीपला घडविलं. तो जेव्हा बोबडे बोल बोलू लागला, तेव्हा त्याला मी सर्वप्रथम एबीसीडीच शिकविली. प्रायमरी सैनिक स्कूलच्या बालवाडीमध्ये अ‍ॅडमिशन इंटरव्ह्यू घेताना प्रिन्सिपल मॅडमनी त्याला मराठीत प्रश्न विचारले, तेव्हा त्यानं फक्त इंग्लिशमधूनच फटाफट उत्तरे दिली. तेव्हाचा त्याचा चुणचुणीतपणा पाहून शाळेतील एका टीचरनं सांगितलंही होतं, ये बेटा एक दिन बडा नाम करेगा.. अन् तसंच झालं बघा,’ कुलदीपच्या ‘ब्राँझ मेडल’वरून हळूवारपणे हात फिरविताना नानासाहेबांचे डोळे पाणावले होते. मुलांसाठी पुण्यातली चांगल्या कंपनीची नोकरी सोडून सातार्‍यात शिक्षक म्हणून स्थायिक झाल्याचा गर्व आज त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत होता. 

( लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)