- राहुल गायकवाड
एक दिवस तिच्या मनात विचार आला सायकल काढू आणि थेट भारतच फिरून येऊ. कधीतरी कुठेतरी बसून मनात आलेला हा विचार तिनं सत्यात उतरवायचं ठरवलं आणि ती थेट निघाली भारताच्या सफरीवर..एकटी. सायकलवर. अनप्लॅण्ड ट्रिपवर.पुण्याची शाश्वती भोसले.महिला सक्षमीकरणाचा संदेश देत शाश्वती सायकलवर निघाली आहे. तू मुलगी आहेस, रात्नी घरी यायला उशीर करू नकोस, एकटी जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस , तुला कसं जमेल, एकटीनं कशी सायकलवर फिरशील या सार्या वाक्यांनाच खरं तर शाश्वतीनं आव्हान दिलं आहे. ठरवलं तर आपण सर्वकाही करू शकतो हा विश्वास ठेवून या मुलीनं देशप्रवासासाठी सायकलला पायडल मारलं आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातील शाश्वती. तिच्या पालकांना कधी वाटलंही नव्हतं की आपली मुलगी एकेदिवशी सायकल घेऊन थेट भारतच फिरायला निघून जाईल, तिही एकटी. शाश्वतीने बीएस्सी केल्यांनंतर नोकरी करण्यास सुरु वात केली. काही वर्षे तिने नोकरी केली; परंतु नोकरीमध्ये तिचं मन काही रमत नव्हतं. आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे असं तिला नेहमी वाटायचं. एकेदिवशी तिच्या मनात विचार आला की, का नाही आपण सायकलवर भारतच फिरायला जावं. बघायला तसा विचार धाडसी होता; परंतु तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. शाश्वती महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीस होती. एकेदिवशी तिने थेट नोकरीचा राजीनामा देत घर गाठलं. घरच्यांना मुलगी घरी परत आल्याचा आनंद झाला. शाश्वतीने घरी येताच घरच्यांना तिचा प्लॅन सांगितला. सुरुवातीला घरच्यांना तिची काळजी वाटली. परंतु त्यांनीही नंतर तिच्या धाडसाचे कौतुक केले.
6 मार्च 2019 ला शाश्वतीच्या भारतभ्रमंतीची सुरु वात झाली. खरं तर शाश्वती ही सायकलपटू नाही. तिला स्पोर्ट्सची आवड आहे असंही काही नव्हतं. तिनं पुण्यातनं सायकल खरेदी केली आणि थेट नॉर्थ ईस्ट गाठलं. सोबत टेन्ट, इतर सामान असं सगळं सोबत घेतलं. कुठे जायचं कसं जायचं काहीही ठरवलं नाही. फक्त भारत पालथा घालायचा एवढाच चंग तिने मनाशी बांधलाय. दिवसाला साधारण 140 किलोमीटरचा प्रवास शाश्वती करते. रस्त्यात येणार्या गावांना, शाळांना ती भेट देतीये. कधी पोलिसांच्या मदतीने तर कधी सीआरपीएफचे जवान यांच्याकडून माहिती घेऊन ती आपल्या मुक्कामाचं ठिकाण शोधते. नाहीच कुठे सोय झाली तर टेन्ट आहेच. परंतु अजूनतरी शाश्वतीला राहण्याची कुठलीही अडचण आलेली नाही. जेव्हा ती तेथील स्थानिक लोकांना सांगते की महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी ती एकटी भारतभ्रमंतीवर निघाली आहे. तेव्हा लोक तिचं आनंदाने स्वागत करतात. त्यांना तिच्या धाडसाचं कौतुक वाटतं. ईशान्य भारतात नोकरीच्या तसेच शिक्षणाच्या फारशा संधी नाहीत. मात्र निसर्गसौंदर्य अफाट. या ठिकाणचं पर्यटन वाढवून येथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यालया हव्यात असं तिला वाटतं. तिथल्या खमक्या, नेकीनं उद्योग व्यवसाय करणार्या स्रिया खूप आवडल्याचं शाश्वती सांगते.डिसेंबर्पयत संपूर्ण प्रवास तिला पूर्ण करायचायं. या सगळ्या प्रवासातून, आलेल्या अनुभवातून तिला पुढचं आयुष्य जगायचं आहे. सध्यातरी ती फिरतीये, भारत पाहतीये, लोकांना समजून घेतीये. या सगळ्या प्रवासातून एक माणूस म्हणून ती अधिकच समृद्ध होतीये. पुण्यात ती तिच्या प्रवासाचा शेवट करणार आहे. परत आल्यानंतर सामाजिक कार्यामध्येच पुढील आयुष्य घालवण्याचा शाश्वतीचा विचार आहे.
***शाश्वतीने आत्तार्पयत आसाम, मिझोराम, नागालॅँड या भागांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणांचा तिचा अनुभव विलक्षण आहे. या ठिकाणचं निसर्गसौंदर्य, शांतता मनमोहून टाकणारं आहे, असं ती सांगते. पाठीला तान्हुलं बाळ घेऊन काम करणार्या या महिलांना पाहून त्यांच्या कष्टाचं तिला अप्रूप वाटतं. आत्तार्पयतच्या प्रवासात शाश्वतीला अनेक चांगले-वाईट अनुभव आले; परंतु प्रत्येक अनुभवामधून तिला काहीतरी शिकायला मिळालं आहे.