काजल राजवैद्य (मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)
लहानपणापासून मला रोबोटची आवड. या रोबोटच्या आवडीमुळेच मी इंजिनिअरिंगकडे वळले. इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअर झाले. अकोल्यामध्ये स्वतर्ची कंपनी सुरू केली. एक वर्ष मुंबईत होते. मुंबईतल्या मुलांना प्रॅक्टिकल प्रशिक्षण देत स्पर्धेसाठी तयार करत होते. तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की मी जे मुंबईमध्ये करतेय त्याची सर्वात जास्त गरज तर माझ्या गावात आहे. तिथल्या मुलांना प्रॅक्टिकल प्रशिक्षण देणारं कोणीच नाही. मी स्वतर् जेव्हा शिकत होते तेव्हा मला तरी कुठे कुणाची प्रेरणा होती, आवड होती म्हणून मी शिकले. आजही हे माझ्या गावाकडचं, ग्रामीण भागातलं चित्र बदललेलं नाही. म्हणून मी परत अकोल्याला परतले. इथल्या मुलांना रोबोटिक्सचं प्रॅक्टिकल शिक्षण मिळावं असं मला मनापासून वाटत होतं. मी 2017 मध्ये अकोल्यात माझी कंपनी सुरू केली. अकोल्यातल्या मुलांना इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल शिक्षण देणं हा कंपनी सुरू करण्यामागचा मूळ उद्देश होता. त्याच दरम्यान मी अकोल्यातल्या शाळा-कॉलेजांमध्ये फिरू लागले. रोबोट सायन्सची माहिती देऊ लागले. आपण हे करू शकतो हे सांगू लागले; पण शाळा-कॉलेजेस काही तयार होत नव्हते. कारण प्रश्न पैशांचा होता. शाळा-कॉलेजकडे पुरेशी संसाधनंही नव्हती. नंतर मी ज्या शाळेत शिकले (मीच काय माझी आई, मामी, मावशी ज्या शाळेत शिकल्या ) त्या मनूताई कन्या शाळेत गेले. मला असलेल्या वर्गशिक्षिका मुख्याध्यापक झालेल्या होत्या. डॉ. वर्षा पाठक. त्यांना मी कल्पना सांगितली. बाईंच्या परवानगीनं मी अकोल्यातल्या या मुलींच्या शाळेत विज्ञानाची लॅब सुरू केली. यासाठी हवं असलेलं साहित्य आणलं. शाळेतल्या विज्ञान प्रयोगाला सुरुवात झाली. मी नववीतल्या मुलींसोबत विज्ञानातले प्रयोग घ्यायला सुरुवात केली; पण माझ्या मनासारखं काही घडत नव्हतं. कारण विज्ञानाच्या प्रयोगात सातत्य नव्हतं. एकीकडे माझ्या कंपनीचं काम, दुसरीकडे मुलींच्या शाळेचं वेळापत्रक, त्यांचा अभ्यास यामुळे विज्ञानातल्या प्रयोगासाठी हवं असलेलं सातत्य आणि एकाग्रता काही केल्या साधली जात नव्हती.दरम्यान, अकोल्यात एक विज्ञान स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी या मुलींना भाग घेण्यास सांगितलं. मुलींनी मोरना नदीवर नाटक बसवलं. त्याचं स्पर्धेत सादरीकरण झालं. परीक्षकांना, प्रेक्षकांना नाटक खूप आवडलं; पण स्पर्धेत आमच्या मुलींचा नंबर आला नाही. केवळ मराठी शाळा, शाळेतल्या ग्रामीण विद्यार्थिनी यामुळे नाटक चांगलं असूनही आम्हाला बक्षीस मिळालं नाही. या गोष्टीचा मला भंयकर त्रास झाला. वाटलं या मुलींना अधिक संधी मिळायला हवी. मग मी या मुलींना मुंबईत दरवर्षी आयोजित होणार्या ‘फस्र्ट लिगो लीग’मध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला. अर्थात या स्पर्धेत उतरणं सोपं नव्हतं. रजिस्ट्रेशन, किट, मुलींना स्पर्धेसाठी तयार करणं, त्यांना मुंबईला घेऊन जाणं सोपं नव्हतं. मुलींचे पालक किंवा शाळा एकही पैसा खर्च करू शकत नव्हते. यासाठी स्पॉन्सरर उभे करायचं ठरवलं. आणि ते आठ दिवसात झालंही. खरी परीक्षा पुढेच होती. मी मुलींना या स्पर्धेत उतरवते आहे हे जेव्हा मी मुख्याध्यापिकांना सांगितलं तेव्हा त्यांना आनंद होण्यापेक्षा धक्काच बसला. आपल्या या साध्या मुली. ज्यांना इंग्रजी येत नाही की ज्यांना अकोल्याबाहेरचं जग माहिती नाही त्यांचा मुंबईसारख्या शहरातल्या स्पर्धेत टिकाव लागणं केवळ अशक्य असल्याचं त्यांना वाटत होतं; पण मी माझ्या निर्धारावर ठाम होते. आपल्या मुली हे करतील याचा मला विश्वास होता. मी शाळेतल्या विज्ञानाच्या लॅबमध्ये मुलींची स्पर्धेसाठीची तयारी सुरू केली.23 सप्टेंबर 2019 रोजी मी पहिला क्लास घेतला. त्यासाठी 50 मुली निवडल्या. सुरुवातीला मी मुलींना एक समस्या सोडवायला सांगितली. आपल्या शहरातले खड्डे जर लगेच बुजवायचे असतील तर आपण काय करू शकतो? यावर मुलींना विचार करायला लावला. यातून मला मुलींची आजूबाजूच्या परिस्थितीविषयीची समज, त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा होता. 50 पैकी 20 मुलींनी यावर उपाय शोधला. त्या 20 मुलींची मी पुढच्या टप्प्यासाठी निवड केली. मी त्यांच्यासोबत स्पर्धेची तयारी सुरू केली. विविध विषयांवरची माहिती देणं, त्यांना व्हिडीओ दाखवणं सुरू केलं. स्पर्धा मुंबईला असली, तिथे सहभागी होणारे फाडफाड इंग्रजीत बोलत असले तरी आपण या स्पर्धेत सहभागी व्हायचंच या इच्छाशक्तीर्पयत मुली जेव्हा येऊन पोहोचल्या तेव्हा त्यांच्या पालकांसोबत एक मीटिंग घेतली. त्यांना या स्पर्धेची पूर्ण कल्पना दिली. यापुढे तीन महिने मुली शाळेत येतील; पण त्यांचा वेळापत्रकाप्रमाणे तास होणार नाहीत. त्यांना घरी यायला उशीर होऊ शकतो, गरज पडल्यास मुलींचा शाळेत मुक्काम पडण्याची शक्यतासुद्धा सांगितली. मीटिंगअंती 20 पैकी 18 मुलींचे पालक तयार झाले. 18 मुलींसोबत आमची स्पर्धेची तयारी सुरू झाली. काही दिवसांनी यातील दोन मुलींनी माघार घ्यायचं ठरवलं. त्यामुळे 16 मुली शिल्लक राहिल्या. पुढे प्रत्यक्षात प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यावर विषयाला आवश्यक असलेल्या गतीशी आपण जुळवू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे आणखी दोन गळाल्या. 14 मुली शिल्लक राहिल्या. मुलींचं गळतीचं प्रमाण बघून अजून कोणाला जायचं असेल, माघार घ्यायची असेल तर आताच सांगा असं विचारल्यावर 14 मुलींनी आपण या स्पर्धेसाठी ठामपणे तयार असल्याचं सांगितलं. ‘मनूताई किट्स एजंल’ अशी आमची 14 मुलींची टीम मुंबईतल्या स्पर्धेसाठी उभी राहिली. सुरुवातीला मुलींचं संवादकौशल्य सुधारणं गरजेचं होतं. मुलींना कोणताही विषय घेऊन बोलतं करायला सुरुवात केली. मुली विचार करू लागल्या. बोलू लागल्या. प्रत्येक गोष्टीचं मेकॅनिझम असतं. विज्ञान आणि गणित असतं. रोबोट सायन्स शिकायचं तर छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टींमध्येही हे घटक शोधावे लागतात. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं निरक्षण करण्याची सवय मुलींना लावली. एक एक दिवस पुढे सरकत होता. मुली तयारीचा एक एक टप्पा ओलांडत होत्या. या स्पर्धेसाठी मुलींचा आत्मविश्वास वाढावा यासाठी अकोल्यातल्या इतर शाळांमध्ये मुलींना सादरीकरणासाठी घेऊन जायला लागले. सादरीकरणासाठी मुलींना इंग्रजी येणं गरजेचं होतं; पण मुलींना नीट मराठीच येण्याची मारामार होती. इंग्रजीचं दडपण येणं स्वाभाविक होतं. मग मुलींना सादरीकरणासाठी हिंदीतून सराव करायला सांगितला. त्यांना माहिती इंग्रजीतून देत होते. त्या बोलत हिंदीत होत्या. परीक्षक मराठीच असतील असं नाही ते महाराष्ट्राबाहेरचेही असण्याची शक्यता होती. त्यामुळे मुलींना इंग्रजीतून प्रश्नांना सामोरं जावं लागण्याचीही शक्यता होती. यासाठी मुलींना प्रश्न काय विचारतात हे नीट समजावं म्हणून त्यांना इंग्रजीतल्या विविध प्रश्नांचा सराव दिला गेला. स्पर्धेसाठी शहरातील समस्या आणि त्यावरचा उपाय हा विषय होता. मुलींनी या विषयाबाबत चर्चा केली. स्पर्धेसाठी त्यांनी झोका देणारा रोबोट असा विषय निवडला. यावर काम सुरू झालं. रोबोटसाठीचं किट लॅबमध्ये आलं. रोबोट बनवण्याचं प्रशिक्षण सुरू झालं. त्या प्रशिक्षणातून झोका देणारा रोबोट तयार झाला. रोबोटच्या चाचण्या सुरू झाल्यावर लक्षात आलं की रोबोट झोका देत होता; पण झोक्यावर ठेवलेलं बाहुलं सारखं पडत होतं. हे असं का होतं, हा अपघात आपण कसा टाळू शकतो यावर विचार मंथन सुरू झालं. आणि मुलींनी अलार्मचा पर्याय सुचवला. बाहुला जोरात झोका घेत असेल तेव्हा किंवा बाहुला गोल गोल झोका फिरवत असेल तेव्हा बाहुला झोक्यावरून पडण्याची शक्यता लक्षात घेता तेव्हा अलार्म वाजवण्याची व्यवस्था केल्यास झोक्यावरून बाहुला पडण्याची दुर्घटना टळू शकेल हे समोर आलं. त्याप्रमाणे प्रयोगात दुरुस्ती करून झोक्यामध्ये अर्लाम यंत्रणा बसवण्यात आली.
‘रोप स्विंग अॅक्सिडेंट प्रिव्हेन्शन अॅण्ड अर्लाम सिस्टीम’ हा मुलींनी तयार केलेला रोबोट स्पर्धेसाठी सज्ज झाला. 18 जानेवारीच्या स्पर्धेसाठी मुंबईला या मुली रवानाही झाल्या.पहिल्यांदा रेल्वेनं आणि तेही रिझव्र्हेशनच्या डब्यात प्रवास. पहिल्यांदाच मुंबईची सहल; पण मुलींचा आत्मविश्वास जबर होता. स्पर्धा सुरू झाली. दोन दिवसांच्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी कोअर व्हॅल्यू (टीमवर्क, एकाग्रता, समर्पण), रोबोट डिझाइन आणि कम्युनिकेशन या मुद्दय़ांवर स्पर्धा झाली आणि दुसर्या दिवशी टीमनं बनवलेल्या रोबोटचे सादरीकरण झालं. स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 200 टीम सहभागी झालेल्या होत्या. उत्तमोत्तम आणि कल्पक रोबोट अकोल्यातल्या या मुलींच्या रोबोटसमोर होते; पण मुली डगमगल्या नाहीत. विदाउट सेन्सरचा आपला रोबोट त्यांनी आत्मविश्वासानं सादर केला. मुलींना हरण्याची भीती नव्हती. सादरीकरणानंतर आपल्याला हे जमलं याचाच आनंद त्यांना खूप झाला होता. आणि मग निकाल लागला. मनूताईच्या रोबोटला बक्षीस जाहीर झालं. फक्त एकच बक्षीस नाही तर उत्तम टीमवर्कचं, उत्कृष्ट मेण्टॉरचं आणि अमेरिकेतल्या स्पर्धेला पात्र ठरवणारं चॅम्पिअन अवॉर्डही मनूताईच्या या 14 पर्यांनी पटकावलं. मुली आनंदानं उडय़ा मारत होत्या. एकमेकींना मिठी मारून रडत होत्या. कधी न पाहिलेलं त्यांचं स्वप्न साकार झालं होतं.एका रोबोटनं ही जादू केली नाही तर पालकांनाही वाटू लागलं, आपल्या लेकी गुणाच्या आहेत. बदलाला अशी सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि तिथली स्पर्धा हा पुढचा टप्पा आहे.
************
आता या मुली 29 एप्रिल रोजी अमेरिकेत डेट्राइट इथे पार पडणार्या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीसाठीची तयारी करत आहेत. याच विषयावरचा नवा रोबोट बनवणं, इंग्रजीचा सराव करणं (अमेरिकेतल्या स्पर्धेत संपूर्ण सादरीकरण हे इंग्रजीतून असणार आहे), रोबोटसाठी किट्स, मुलींसाठीचा ड्रेसकोड, विमानप्रवासाचं भाडं असा 40 लाख खर्च येणार आहे. पैशांची जुळवाजुळव हीदेखील मोठीच तयारी आहे. या दोन्ही पातळींवरचा लढा आता नव्या दमानं सुरू झालेला आहे. या टप्प्यावरही त्यांना हरण्याची भीती नाही. उलट आपल्याला हे करायला मिळतंय याचा आनंदच जास्त आहे.
**************
त्या 14 जणी
रोबोट साकार करून अमेरिकेत स्पर्धेसाठी निघालेल्या 14 मुली. मराठी माध्यमात शिकणार्या. ग्रामीण भागातल्या. गरीब कुटुंबातल्या. कुणाचे आईवडील शेतमजूर, कुणाचे शेतकरी, तर कुणाचे नोकरदार. आर्थिक चणचण आणि कष्ट या मुलींना नवे नाहीत. मात्र त्यांच्या डोळ्यातली जिद्द, मेहनत आणि गुणवत्ता या जोरावर त्यांनी रोबोटिक सायन्ससारखा अवघड विषयही सोपा करून प्रत्यक्षात उतरवला आहे. त्या 14 जणी आहेत.रुचिका मुंडाले, निकिता वसतकार, स्नेहल गवई, अर्पिता लंगोटे, सानिका काळे, गौरी झामरे, आंचल दाभाडे, पूजा फुरसुले, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, समीक्षा गायकवाड, प्रांजली सदांशिव, गायत्री तावरे व प्रणाली इंगळे.
(काजल रोबोट स्पर्धा विजेत्या मनूताई किट्स एंजल्स ग्रुपच्या मार्गदर्शक आणि अकोल्यातील काजल इनोव्हेशन अॅण्ड टेक्निकल सोल्यूशन कंपनीच्या सीईओ आहेत.)पूरक माहिती- नितीन गव्हाळे