शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

31 देश आणि 24 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणारा एक योगी

By समीर मराठे | Published: September 06, 2018 6:00 AM

नाशिकचा एक तिशीतला तरुण, योगेश गुप्ता, 31 देशांची सायकलवारी करून तो नुकताच त्याच्या घरी नाशिकला परतलाय.

ठळक मुद्दे18 ऑगस्ट 2016 ला योगीनं आपली सायकल यात्रा पोर्तुगालपासून सुरू केली. साधारण दीड वर्षात त्यानं सायकलवर पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, मोनॅको, इटली, व्हॅटिकन सिटी, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बोस्निया, मॉन्टेनेग्रो, अल्बानिया, मॅसेडोनिया, सर्बिया, बल्गेरिया, जॉर्जिया, अर्मेनिया, अझरबैजान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजि

- समीर मराठे

अतिशय सर्वसामान्य घरातला एक मुलगा. शिक्षण होईर्पयत कधीच घराबाहेर पडला नाही. एकुलता एक मुलगा असल्यानं ‘ओव्हर प्रोटेक्टेड’. घरच्या जबाबदार्‍याही काहीच नाहीत. घराबाहेर पडल्यावर आपण हरवू की काय, अशी भीती त्याच्या मनात कायम दडलेली. पण हाच ‘लाजाळू’, ‘घाबरट’ मुलगा परदेशात जातो, तिथे उच्चशिक्षण घेतो, परदेशातच काही र्वष नोकरी करतो, अचानक त्याचा आतला आवाज त्याला काही सांगतो. तो नोकरी सोडतो, बाईक घेतो, वाटेल तिथे भटकतो, नंतर एक साधी सायकल घेतो आणि जगभ्रमंतीला निघतो. काहीच प्लॅन नाही, सोबतीला कोणीच नाही. 31 देश आणि तब्बल 24 हजार किलोमीटरचा सायकलप्रवास करून तो भारतात परत येतो.या प्रवासात तो कधी इटलीच्या जंगलात राहिला, कधी क्रोएशियाच्या ओसाड घरात रात्र काढली, बोस्नियात हॉटेलच्या गार्डनमध्ये आसरा घेतला, कधी उझबेकिस्तानच्या रस्त्यावर सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटच्या शेडचा सहार घेतला, चीनमध्ये तलावाच्या काठी तर अल्माटी येथे नदीकाठीही त्यानं आपला पडाव टाकला. अक्षरशर्‍ थक्क करणारा प्रवास.या अवलिया तरुणाचं नाव आहे योगेश गुप्ता. घरचे आणि मित्रमंडळींसाठी तो ‘योगी’ आहे. 31 देशांची सायकलवारी करून तो नुकताच त्याच्या घरी नाशिकला परतलाय.त्याच्या या जगावेगळ्या प्रवासाची कहाणी जाणून घेण्यासाठी योगेशची भेट घेतली तेव्हा एक मोठा पटच समोर उलगडत गेला. त्याला ‘योगी’ का म्हणतात तेही कळलं. बुद्धांची शिकवण तो शब्दशर्‍ आचरणात आणतोय असं त्याच्याशी बोलताना सारखं वाटत राहतं. त्याला कसलाच मोह नाही, कुठली अ‍ॅम्बिशन्स नाहीत, कोणाशी वैर नाही. राग, लोभ. काहीही नाही. इतकंच काय, गरजेशिवाय आणि प्रश्न विचारल्याशिवाय तो फारसं बोलतही नाही. अशा तरुणानं एकटय़ानं जगभर सायकलवारी कशी केली असेल याचं कोडं आपल्याला सारखं पडत राहतं. तुला एकदम जगप्रवासाची हुक्की का आली, असं विचारल्यावर योगी सांगतो, माझ्या अंतर्मनानं कौल दिला आणि मी निघालो. पण कदाचित माझ्या वडिलांनी तरुणपणीच आपला प्रदेश सोडला आणि ते घराबाहेर पडले. तेच बीज, तोच वारसा कदाचित माझ्यात उतरला असावा.सुरुवातीपासूनच कोषात वाढलेल्या योगीला प्रवास म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. अगदी नाशिकला कॉलेजला असेर्पयत दोन-तीन किलोमीटरपेक्षा जास्त कधी तो एकटय़ानं बाहेरही पडला नाही. योगी सांगतो, बाहेर पडलो की मला भीती वाटायची. सगळं काही अनोळखी वाटायचं.पेट्रोलियम इंजिनिअरिंगसाठी योगी पुण्याला गेला, तेव्हा त्याला वाटलं जणू आपण परदेशातच आलोय. कोणीच ओळखीचं नाही, कोणतीच जागा परिचयाची नाही. योगी सांगतो, इथेच माझा आत्मशोधाचा प्रवास सुरू झाला असावा.पुण्यात इंजिनिअरिंग केल्यानंतर योगी गेला ते थेट कतारमध्ये. जॉबसाठी. तिथे तीन र्वष नोकरी केल्यानंतर मास्टर्स डिग्रीसाठी त्यानं लंडन गाठलं. त्यानंतर जॉबसाठी नेदरलॅण्ड्स ! योगीनं तब्बल पाच र्वष इथे काढली. पण नोकरीतला त्याचा रस आता संपत आला होता. बाहेरचं जग त्याला खुणावत होतं.योगी सांगतो, मी छोटय़ा छोटय़ा ट्रीप करायला सुरुवात केली. एकटय़ानंच. खूप बरं वाटायचं. आपण नोकरीत जे काही करतोय, त्यात काहीच मजा नाही, आनंद नाही असं मला सारखं वाटायचं. एक दिवस मी माझ्या बॉसला सांगितलं, मला चार महिन्यांची सुट्टी पाहिजे !बॉसला आश्चर्य वाटलं, त्यानं आढेवेढे घेतले; पण योगीला सुट्टी मिळाली !योगी सांगतो, मला जिथे कोणीच ओळखत नाही, तू इथे काय करतोयस, का आलास?. असे कुठलेही प्रश्न मला कोणी विचारणार नाही आणि निवांतपणे फिरता येईल,  जग पाहता पाहता आत्मशोधही घेता येईल. अशा ठिकाणी मला जायचं होतं.जॉबवरून सुटी घेतल्यानंतर योगी विमानतळावर गेला. तिथे पहिली फ्लाइट होती काठमांडूची. त्यानं तिकीट काढलं आणि विमानात बसून काठमांडू ! नेपाळला फिरला. ट्रेकिंगची कधीच सवय नव्हती; पण एव्हरेस्टला जाऊन आला. जिथे वाटेल तिथे योगी मुक्त भटकत होता.योगीच्या घरच्यांना हे कळल्यावर त्यांना वाटलं, या पोराचं डोकंबिकं फिरलंय की काय, ते त्याला भेटायला गेले. योगीनं त्यांना त्याच्यापरीनं समजावून सांगितलं. मी सुखरूप आहे आणि मी जिथे कुठे असेन, तुम्हाला कळवत राहीन. नेपाळमधून योगी गेला ते व्हिएतनामला. तिथे एक महिना राहिला. मोटरबाइकनं भरपूर फिरला. तिथेच त्याला त्याची जुनी मैत्रीण भेटली. ती जपानची. तिच्याबरोबर मग जपानला गेला. जपान पिंजून काढलं. त्यानंतर परत व्हिएतनाम गाठलं. सुटीचे चार महिने संपले.योगी जॉबवर रुजू झाला. पण त्याचं मन त्याला बाहेर, मुक्त जगात ओढत होतं. तो परत आपल्या बॉसकडे गेला, म्हणाला, मला आता चार नाही, आठ महिन्यांची सुट्टी पाहिजे ! बॉसनं सांगितलं, शक्य नाही. योगीनं शांतपणे राजीनामा लिहिला.बॉस म्हणाला, तुझ्यासारख्या लोकांची कंपनीला गरज आहे. योगीचा राजीनामा त्यानं नाकारला. योगीला आता आठ महिन्यांची रजा मिळाली !योगी सांगतो, कुठे जायचं, का जायचं, काय करायचं?. काहीही माहीत नव्हतं. एक फक्त नक्की होतं, आपला आतला आवाज जे काही सांगेल, ते करायचं. मी तेच केलं. पैसे संपले किंवा जगण्यासाठी पैसे हवे असले की मी ॅजिथे असेल तिथल्या अनाथालयात जायचो. व्हॉलण्टिअर म्हणून काम करायचो. डोक्याखाली छत, खूप समाधान आणि थोडे पैसे मिळायचे. प्रवास पुढे सुरू !.योगीनं आता मोटरबाइक घेतली. साऊथ अमेरिकेला गेला. भटक भटक भटकला. स्पॅनिश शिकला. पैसे संपत आल्यावर अनाथालयात गेला. योगी सांगतो, आपल्या मनातलं भयच आपल्याला परत परत रुटिन काम करायला, परत जॉबवर जायला प्रवृत्त करतं, हे लक्षात आलं. एव्हाना रजेचे आठ महिनेही आता संपत आले होते. मी तिथूनच मेलनं राजीनामा पाठवून दिला. शेवटचं बंधनही तोडून टाकलं.वास्को द गामानं जसा भारत शोधून काढला, तसं आपण रस्ते मार्गानं भारत शोधून काढू असा विचार त्याच्या डोक्यात आला. पोर्तुगालपासून सुरुवात करायची असं ठरवलं. त्यामुळे नेदरलॅण्ड्सहून तो फ्लाइटनं पोतरुगालला आला. तीन महिन्यांत त्याला युरोप क्रॉस करायचा होता. कारण त्याच्याकडे आता तीन महिन्यांचाच व्हिसा उरला होता. जहाजानं गेलो तरी युरोप क्रॉस करायला तेवढाच वेळ लागेल आणि सायकलनं गेलो तरी तितकाच वेळ लागेल असं त्याच्या लक्षात आलं आणि योगीनं ठरवलं, मग सायकलनंच का जाऊ नये?

योगी जॉबला लागला त्यावेळी कंपनीनंच त्याचं पुण्यातलं सगळं सामान उचलून आणलं होतं. त्यातच त्याची जुनी सायकलही होती. तीच त्यानं साफसुफ केली. दोन ड्रेस सोबत घेतले, एक टेन्ट, एक स्लिपिंग बॅग, टॉयलेटरीज, थोडे पैसे, थोडा शिधा आणि सायकल दुरुस्तीचं सामान. हे बोचकं सायकलीला मागे बांधलं आणि निघाला !रस्त्यानं इतके देश लागणार, कोणीच ओळखीचं नाही, कोणाची सोबत नाही, त्या देशांची भाषा माहीत नाही, त्या देशांचे व्हिसा नाहीत, दोन-पाच किलोमीटरपेक्षा जास्त कधी सायकलही चालवली नाही, तुला भीती नाही वाटली?. योगीला विचारलं.योगीचं उत्तर होतं, ही भीतीच तर मला मनातून काढायची होती. मला हवं तसं आयुष्य जगायचं होतं. आपल्या जगण्याचा, अस्तित्वाचा अर्थ शोधायचा होता.योगी कायम अशीच उत्तरं देतो, एखाद्या योग्यासारखी!जग फिरायला निघाला; पण योगीकडे साधा कॅमेराही नव्हता. आजही नाही. आधी तर फोनही नव्हता. नेपाळला गेला, तेव्हा वडिलांनी घेऊन दिला. तोच त्याचा कॅमेरा. तेच त्याचं संपर्कमाध्यम.योगी सांगतो, मला कसलीच घाई नव्हती. कोणतीच काळजी नव्हती. घरच्यांनाच माझी काळजी होती. त्यामुळे फक्त वाटेत माझ्या मोबाइलनं फोटो काढायचो. फेसबुकवरून त्यांना पाठवायचो. ‘मी आहे’, हे त्यांना कळावं यासाठी!निवांतपणे जायचं असल्यानं योगीनं रस्ताही मुद्दाम निवडला तो आतला. वेगवेगळ्या देशांच्या मधून जाणारा. हमरस्ता टाळणारा. जग दिसेल, माणसं भेटतील यासाठी. एकामागून एक देश त्यानं पालथे घातले. जिथे वाटलं, तिथे थांबायचं. नंतर पुन्हा पुढे निघायचं. पैसे संपले की आहे त्या देशातलं एखादं अनाथालय गाठायचं, तिथे काम करायचं. अनुभवांची, माणुसकीची श्रीमंती मिळवायची आणि समृद्ध समाधानानं पुढच्या रस्त्याला लागायचं.जग किती छोटं आहे हेही या प्रवासात योगीला कळलं. त्याबद्दलचा त्याचा अनुभवही विलक्षण आहे. जे मित्र, मैत्रिणी वर्षानुवर्षे कधी भेटले नाहीत, ज्यांची रस्त्यांत ओळख झाली, तेच लोक वेगवेगळ्या देशांत वेळोवेळी त्याला भेटले. अनेक जण तर अगदी अचानक. तो ज्या देशात आहे, ज्या शहरात आहे तिथेच. त्यांच्याबरोबरही योगीनं मग मनसोक्त भटकंती केली.योगीला काहीही विचारा, कोणत्याही प्रश्नाचं सकारात्मकच उत्तर त्याच्याकडून मिळतं. अतिशय शांतपणे तो आपलं म्हणणं मांडतो.योगीला या संपूर्ण प्रवासात वारंवार विचारला गेलेला एकच प्रश्न होता, तो म्हणजे तुझा धर्म कोणता?तू काय सांगितलंस, असं विचारल्यावर योगी सांगतो, खरंच माझा कोणताच धर्म नाही, तर मी त्यांना काय सांगू? माणुसकी हाच माझा धर्म आहे, असं मी त्यांना सांगायचो. बरेच जण अगदी खोदून खोदून विचारायचे, तेव्हा मीच त्यांना विचारायचो, तुम्हीच सांगा, तुम्हाला कोणता धर्म हवा आहे? मी त्याच धर्माचा !योगी म्हणतो, जग खरोखरच खूप सुंदर आहे. सगळी लोकं प्रामाणिक आणि छान आहेत. प्रत्येकाकडे देण्यासारखं काहीना काही असतं. आपल्याला फक्त ते घेता आलं पाहिजे. त्यामुळे इतक्या 24 हजार किलोमीटरच्या सायकल प्रवासात सांगण्यासारखा एकही वाईट प्रसंग योगीकडे नाही. अझरबैजान या देशाचा एक अनुभव योगी सांगतो. हा देश जरा आडबाजूला आहे. कोणीच पर्यटक या देशात जात नाही. पण योगीला तिथे आणि तेही सायकलवर पाहिल्यावर तिथल्या लोकांचं आश्चर्य त्यांच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यांत सहजपणे त्यानं वाचलं. तिथल्या चॅनेलवाल्यांनी त्याची मुलाखत घेतली. एका श्रीमंत माणसानं फाइव्ह स्टार हॉटेल त्याच्यासाठी बुक केलं. हट्टानं एखाद्या राष्ट्रप्रमुखासारखी सगळी सेवा पुरवली. त्याच दिवशी थोडय़ा वेळात त्या चॅनेलनंही त्याची मुलाखत प्रसारित केली. त्यानंतर योगी जेव्हा सायकलवरून परत आपल्या वाटेला निघाला, त्यावेळी दुतर्फा लोकं त्याच्या स्वागतला उभे होते !योगी चीनमध्ये पोहोचला, त्यावेळी डोकलाम वादावरून भारत आणि चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. योगीही चीनमध्ये ज्या ज्या शहरात पोहोचला, त्या त्या ठिकाणी पोलीस तिथून त्याला उचलत होते, दुसर्‍या ठिकाणी, दुसर्‍या शहरात जा, अमुकच हॉटेलात राहा असं बजावत होते.पण योगी सांगतो, माझा तिथलाही अनुभव खूपच चांगला आहे. सर्वसामान्य लोक खूपच प्रेमळ आहेत. जगात युद्ध कोणालाच नको आहे. चिनी लोकांनाही. त्यामुळे मीही तिथे माझ्या सायकलवर चिनी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेला बोर्ड घेऊन फिरत होतो. ‘नो वॉर’! आणि लोकांचाही त्याला तितकाच प्रतिसाद मिळत होता !जग पाहिलेला हा योगी योग्याच्याच भाषेत आपल्याला सतत सांगत असतो. जगात कोणीच वाईट नाही, कोणताच वाईट अनुभव मला आजवर आलेला नाही. निराशेनं मला कधीच घेरलं नाही. माझं कधीच कुणाशी भांडण झालं नाही. चांगुलपणावरचा माझा विश्वास कधीच उडाला नाही. जग हेच आपल्या सर्वाचं घर आहे. नोकरी, जॉब ही अनैसर्गिक गोष्ट आहे. पिअर प्रेशर, परंपरा आणि सीमांनी आपण स्वतर्‍लाच बांधून घेतलं आहे. मुक्त करा स्वतर्‍ला त्यातून. बिझी असणं ही फॅशन आहे. स्लो डाउन करा. कुणाशीच स्पर्धा करू नका. जेव्हा आपण दूरच्या प्रवासाला निघतो, तेव्हा अन्न आणि निवारा या बेसिक गोष्टीच फक्त आपल्याला लागतात. अनावश्यक गोष्टींनी आपलं आयुष्य बेचव करून टाकलं आहे.योगीला कितीही खोदून खोदून विचारा, अरे बाबा, तुला या जगप्रवासाला खर्च किती आला, तर तेही तो सांगत नाही, तो म्हणतो, त्यासाठी खरंच फार खर्च येत नाही आणि मी तो काढलाही नाही. तो जर काढला आणि सांगितला, तर काही जण कदाचित तोच आकडा मनात धरून बसतील, जगप्रवासाला इतके पैसे लागतात आणि त्यांच्यासाठी तेही एक ‘कारण’ होईल!आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याचा प्रवास आता त्याला करायचा आहे; पण तत्पूर्वी आपल्या शेजारी देशाच्या लोकांना बरोबर घेऊन सायकलवारी त्याला करायची आहे. माणसांनी माणसांना भेटावं परस्पर संवाद वाढावा यासाठी!.त्याचीच तयारी तो आता करतो आहे.

इराणी तरुणीनं घातली लग्नाची  मागणी !

योगीनं त्याच्या साध्या सायकलवर जग पालथं घातलं; पण त्याला सगळ्यात आवडलेला देश म्हणजे इराण. इथल्या खाद्यपदार्थानी त्याला भुरळ घातली, काहीही संबंध नसताना इथल्या लोकांनी त्याला बळजबरी स्वतर्‍च्या घरात ठेवून घेतलं,  इथल्या संस्कृतीनं त्याला मोहवून टाकलं, इथल्या माणसांनी त्याच्यावर मोहिनी घातली, इतकंच काय, अत्यल्प परिचयात इथल्या तरुणीनंही त्याला लग्नासाठी मागणी घातली. तिच्या वडिलांनी भारतात योगीच्या आईवडिलांशीही त्यासाठी संपर्क साधला. पण योगी म्हणतो, तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी नकार दिला. तिला इंग्रजी येत नाही, मला फारसी. एका जागी राहायची मला सवय नाही. कुठल्याही अपेक्षांचं बंधन मला मानवत नाही. माझ्याकडून तिच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये म्हणूनच मी तिला नाही म्हणालो !

(लेखक लोकमत वृत्तपत्र समूहात उपवृत्तसंपादक आहेत.)

sameer.marathe@lokmat.com