- चिन्मय लेले
कोणते आणि कसकसले डे आताशा साजरे होतील याचा काही नेम नाही.बरं ‘डे’ या साथीची लागण अशी की, तो ‘डे’ एखाद्या ठिकाणी गाजला की त्याची साथ बाजारपेठेच्या कृपेनं जगभर पसरते आणि मग जगात ‘अत्यावश्यक’ कॅटेगरीत हा ‘डे’ साजरा होऊ लागतो.तर आज आहे नोव्हेंबर महिन्याचा पहिला गुरुवार !आज काय आहे?तर आज तिकडं अमेरिकेत ‘मेन मेक डिनर डे’ साजरा होतोय?असा कुठं ‘डे’ असतो का?तर असतो. 2001 सालापासून म्हणजे गेली 17 वर्षे हा दिवस तिकडं अमेरिकेत काही हौशी साजरा करतात. ते साजरा करण्याचं कारण म्हणजे स्वयंपाक करणं हे महत्त्वाचं काम आणि कला असून, तो बायकांनीच करावा नी पुरुषांनी अजिबात करू नये किंवा त्यांना जमणारच नाही असं कुणी मनात आणू नये अशी जनजागृतीची भावना त्यामागे आहे. लिंगसमानतेचं मूल्य रुजवतानाच स्वयंपाकाला प्रतिष्ठा आणि पुरुष ‘हम भी कर सकते है’ टाइप प्राइड असं सूत्र या दिवसांत गुंफण्यात आलं आहे.आता नव्या सोशल मीडियाच्या काळात या दिवशी स्वयंपाक करून त्याचे फोटो सोशल मीडियात अर्थात विशेषतर् इन्स्ट्राग्रामवर हे फोटो टाकण्यात अनेकांना रस.पण पुरुष फक्त स्वयंपाक करणार असं नव्हे तर त्या म्हणजे जी कोणती डिश ते बनवतील त्यासाठी साहित्य, भाज्या आणण्यापासून ते ओटा आवरेर्पयत सगळं त्यांनीच करावं असं यात गृहीत धरलेलं आहे.वरकरणी ही सारी गंमत वाटत असली तरी हा विषय गमतीचा नाही.जगभरात आजही सर्व देशांत, सर्व संस्कृतीत महिलाच घरोघरी स्वयंपाक करतात. पुरुष स्वयंपाक करतात तो अपवाद किंवा कौतुक. तरुण मुलांना कुणी घरी स्वयंपाक कर किंवा शिक म्हणत नाही. उलट रोज जेवण्यासाठी आवश्यक असं महत्त्वाचं स्किल मुलांना शिकवलंच जात नाही. उलट ते काम कमीच लेखलं जातं.आत नव्या लिंगसमानता आणि समभाव वाढीस लागण्याच्या काळात पुरुषांनाही स्वयंपाक येणं आणि त्यांनी घरात आपली जबाबदारी उचलणं याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ‘रिअल मेन कुक’ असे उपक्रम नी हॅशटॅग चालवले जातात. एवढंच कशाला आपल्या बॉलिवूड फिल्म्समध्येही आता कधीमधी का होईना पुरुष स्वयंपाक करताना दाखवले जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉली एलएलबी सिनेमात अक्षय कुमारनं बायकोला गरमागरम फुलके करून खाऊ घालणं. एरव्ही बायको जेवायला बसली आहे नि नवरा पोळ्या करून वाढतोय हे दृश्य आपल्या सिनेमांना तरी झेपलं असतं का?एवढंच कशाला, अलीकडे पाकिस्तानातही एक मोठी ओरड झाली आणि प्राथमिक शाळेतली क्रमिक पुस्तकं मागे घ्यावी लागली. त्यात लिहिलं होतं की, अम्मी घरी असते, खाना पकवते आणि भांडी घासते, अब्बू बाहेर जातात, काम करतात पैसे कमावतात. लहानपणापासूनच मुलांच्या मनावर असे टिपिकल रोल ठसवण्याचं कारण काय म्हणून काही सुधारणावादी संघटनांनी आक्षेप घेतला आणि पुस्तकं मागे घेण्यात आली.मुद्दा काय, जगभरात आता असे बदल घडू लागलेत की, आपण स्वयंपाक करू शकतो हे तरुण मुलं अभिमानानं सांगू लागलेत. मुख्य म्हणजे स्वयंपाक करू लागलेत.आणि मुलामुलींमध्ये भेद करणार्या अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट निदान आपल्याला आपल्यापासून बदलता येईल.तेव्हा दिवाळीत जाऊन पहा, स्वयंपाक घरात, फराळाला मदत म्हणून.