- डॉ. मारोती तेगमपुरे
स्थलांतर मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतं. स्थलांतरामुळे स्थलात्मकच नव्हे तर सर्वांगीण पातळींवर बदल संभवतात. भाषा, संस्कृती, खानपान, या सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण स्वरूपाचे बदल घडून येतात हे सारं आपण वाचतो. पण मी हे सारं स्वत: जगलोय.माझे प्राथमिक शिक्षण गावापासून तीन किलोमीटर (उच्छा (बु), ता. मुखेड, जि. नांदेड ) अंतरावर असलेल्या बेटमोगरा जिल्हा परिषद शाळेत झालं. आठवीसाठी नांदेड येथील खालसा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गावापासून ८० किलोमीटर असलेले हे अंतर १९८९-९० साली फार मोठं वाटायचं. एकदा नांदेडला आलं की गावाकडे संपर्क होत नसे. त्यावेळी आत्ताच्यासारखी संपर्काची प्रभावी माध्यमं नव्हती, आमच्या गावात साधं पोस्ट आॅफिस नव्हतं. आजही नाही. अर्थात घरी पत्र तरी कुणाला वाचता येत होतं? मोठे बंधू शिकलेले; परंतु तेही रोजगाराच्या शोधात बाहेरच होते. अशा परिस्थितीत शहरातील मगणपुरा (नवीन मोंढा) परिसरात असलेल्या डेस्टिट्यूट चिल्ड्रन होममध्ये मी आणि माझा लहान भाऊ ओमनाथ राहू लागलो. तो त्यावेळी साधारणत: इयत्ता दुसरी-तिसरीत असेल. खऱ्या अर्थानं गावापासून माय बाबा यांच्यापासून दूर जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. याठिकाणी जे जेवण दिलं जाई, त्यास जेवण कसं म्हणावं; पण त्यावेळी त्याच अन्नानं जगवलं. याकाळात अनेक बरेवाईट अनुभव आले, जिवाभावाचे मित्र मिळाले, त्यातील नीलकंठ यमूनवाड यास कधीच विसरू शकत नाही. त्याकाळात कळलं माणसं महत्त्वाची, जातधर्म हे काही खरं नाही.महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी उस्मानाबाद गाठलं, मोठे बंधू संभाजी ग्रामसेवक म्हणून तिथं रुजू झाले होते. पुढील शिक्षणासाठी मला त्यांनी तिथं बोलावून घेतलं. हे दुसरं स्थलांतर.उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयात मी बी.ए.साठी या काळात महाविद्यालयात डॉ. काझीसर भेटले. त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करणाºया प्रेमळ मार्गदर्शनाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आरपार बदलून गेला. डॉ. कल्याण गडकर, डॉ. डी.बी. मोरे यांचं अर्थशास्त्रीय विवेचन आजही प्राध्यापक म्हणून वावरत असतानाही अनेकदा मदतीला धावून येतं. या गुरु जनांनी सुचवलं. एम.ए.साठी विद्यापीठातच जा. त्यांनी मला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाठवलं. स्वत: हिंदी विषयाचे प्राध्यापक असूनही मी एम.ए. अर्थशास्त्र करावं म्हणून डॉ. काझीसर विद्यापीठात नाव नोंदणी करण्यासाठी सोबत आले. विद्यापीठात डॉ. बी.बी. कवडे, डॉ. आर. एस. सोळुंके, डॉ. बी.एस. म्हस्के, डॉ. वंदना सोनालकर, डॉ. र. पु. कुरुलकर, यांच्यासारखे शिक्षक मला लाभले. नंतरच्या काळात तर डॉ. बी. एस. म्हस्केसरांकडे मला पीएच.डी. करण्याची संधी प्राप्त झाली, याकाळात मला जे शिकायला मिळाले ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे.याचकाळात एसएफआयसारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणाºया व भगतसिंगांना आदर्श मानून काम करणाºया विद्यार्थी संघटनेत/चळवळीत मी कधी ओढला गेलो ते समजलेच नाही. संघटनेत कार्यकर्ता म्हणून/ पदाधिकारी म्हणून वावरताना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं; पण याच काळात आपण जेथे चुकत आहोत तेथे स्पष्टपणे सांगणारे, आपल्याला दुरुस्त करणारे मित्रही भेटले. म्हणतात ना ज्ञान तीनच माध्यमातून प्राप्त होते, वाचन, चिंतन/अनुभव आणि प्रवास. पीएच.डी. करून मी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून रु जू झालो.आज वाटतं शिक्षणासाठी अनेकवेळा स्थलांतर करावं लागलं त्या स्थलांतरानं कठीण परिस्थितीत उभे राहण्याची ऊर्जा दिली. ती ऊर्जा घेऊनच मी वाटचाल करतो आहे.अर्थशास्त्र विभागप्रमुख,गोदावरी कला महाविद्यालय, अंबड, जि. जालना