इंटरनेटच्या जंजाळातून ‘निवडून’ नक्की वाचावं, असं काही...
मनाला शिस्त लावायला शिकवणारी एक वेबसाइट..
नवीन वर्ष आलं. उलटलेही पहिले पंधरा-सोळा दिवस. एव्हाना आपण केलेले बरेच संकल्प थंडीत गारठून बारगळलेही असतील. वाईट वाटून घेऊ नका, जगात जास्तीतजास्त लोकांचं हे असंच होत असतं!
पण असं का व्हावं असा विचार केलाय कधी?
यावर उत्तर शोधून काढलं आहे माइंड टूल्स या गटानं.
जगण्यासाठी, शिकण्यासाठी लागणाऱ्या आपल्या क्षमता कशा वाढवायच्या, आपल्या बुद्धीला धार कशी करायची, विसराळूपणा कसा कमी करायचा, एखादा प्रकल्प उत्तम रीतीने पार कसा पाडायचा याबद्दल काही सोपे उपाय दिले आहेत. ही वेबसाइट नियमित वाचा.
वाचन म्हटलं की पुस्तकंच वाचणं ही संकल्पना गेली. आता आपण पोर्टल, वेबसाइट्स, ब्लॉगही वाचायलाच पाहिजेत.
तशीच ही एक वाचनीय वेबसाइट. ही वेबसाइट नुस्तं वाचण्यापुरतं काही देत नाही, तर शिकवते. नेतृत्व कौशल्य, गटाचं व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, समस्या सोडवण्याचं कौशल्य, कामाचं व्यवस्थापन, ताणाचं नियोजन, संपर्क कौशल्य, करिअरचं व्यवस्थापन आणि नवीन नवीन गोष्टी लवकर कशा आत्मसात करायच्या याचं कौशल्यही शिकवते. (अर्थात बेसिक गोष्टी. पुढे स्पेशल काही शिक्षण हवं असेल तर ते पैसे मागतात काही गोष्टींसाठी, पण फुकटही पुरून उरेल एवढं वाचनीय आहे.)
त्यांनी आपल्या वाचकांसाठी एक आठ कलमी कार्यक्र म दिला आहे. तोही भन्नाट आहे.
१. तुमच्या संकल्पाशी बांधील राहा! जर तुम्ही व्यायाम करायचं ठरवलं असेल तर रोज किमान १० मिनिटं तुम्हाला त्यासाठी मिळतील असं बघा.
२. वास्तवाचं भान असूद्या. उगाच रोज टेकडी चढीन म्हटलं की तिसऱ्या दिवशी बुट्टी मारलीच जाईल, हे मान्य करा.
३. स्वत:कडून अति अपेक्षा ठेवू नका. स्वत:ला ओळखून मगच स्वत:वर नियम घाला.
४. स्वत:ला एक कार्यक्र म द्या. नुसतं ठरवून उपयोगाचं नाही. त्यासाठी एखादा कृती कार्यक्र म तयार करा.
५. त्यामध्ये लवचिकता ठेवा. एखादा दिवस काही कारणानं नाही जमलं तर सगळंचं संपलं असं नसतं. पुन्हा सुरू करा. सकाळी व्यायाम करणार असाल आणि वेळ नाही मिळाला, लागली झोप एखाद दिवस तर ठीक आहे. संध्याकाळी जा!
५. वेळोवेळी या संकल्पाची आठवण राहील असं काहीतरी करा. म्हणजे तुमच्या डायरीमध्ये त्याबद्दल लिहून ठेवणं, एखादं पोस्टर करून तुमच्या खोलीत लावणं वगैरे.
६. तुमची प्रगती ट्रॅक करा.
७. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला बक्षीस द्या!!
हे नियम वापरलेत तर बरंच काही जमावं! निदान वाचा तरी, माइंड टूल्स ही वेबसाइट..
जे प्रत्यक्ष दिसणं अवघड,
ते ‘अनुभवण्या’साठी...
पूर येण्यापूर्वी..
लिओनार्डो द’केप्रिओची भन्नाट डॉक्युमेण्टरी
टायटॅनिक. आपण पाहिलेला भन्नाट सिनेमा. त्यातला जेक हा आपल्याला किती आवडला होता. तोच लिओनार्दो द’केप्रिओ. तो आता युनायटेड नेशन्सचा शांतिदूत म्हणून काम करतो आहे. आणि यासाठी तो जगभरामध्ये हवामान बदल आणि त्यामुळे झालेले परिणाम याचा शोध घेतो फिरतो आहे. त्याच्या प्रवासामध्ये त्यानं पाच खंडांमध्ये प्रवास केला आणि हवामानातला बदल म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेतलं.
लिओनार्डो या प्रवासादरम्यान अनेक शास्त्रज्ञांना भेटला. त्यांच्याकडून त्याने या बदलांमागचं सत्य आणि शास्त्र समजून घेतलं. तो अनेक राजकीय नेत्यांनाही भेटला, की जे याबद्दलच्या कृतिशून्यतेविरुद्ध आवाज उठवत आहेत. या प्रवासामध्ये तो भारतामध्येही आला होता.
त्यातून आकारास आली एक डॉक्युमेण्टरी.
बिफोर दी फ्लड.
ही डॉक्युमेण्टरी म्हणजे एक जगभराचा प्रवास आहे.. बदलत्या वातावरणाचा. वातावरण बदलामागचं शास्त्र या डॉक्युमेण्टरीत उलगडलं जातं.
ही डॉक्युमेंटरी नॅशनल जिओग्राफिकने प्रसिद्ध केली आहे आणि ती सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे.
- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com