अंगात काही कौशल्य असलं की त्याला वाव आणि संधी मिळाली की ते फळास येतं असं म्हणतात. अर्थात, त्यासाठी कष्ट, प्रयत्न, जीवतोड मेहनत याला पर्याय नसतोच. आणि का असावा? मेहनतीनं आलेलं यश हे मनापासून साजरं करता येतं, अभिमानानं चारचौघांना सांगता येतं.
पण अंगी कौशल्य असूनही, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली असतानाही जेव्हा अपयश येतं आणि तेही विश्वासघातातून तर मग हे अपयश ना कोणाला सांगता येतं ना लपवता येतं.
माङया जवळच्या मित्रचा हाच अनुभव. तो चांगला सिनेमेटॉग्राफर. सामाजिक क्षेत्रतले माहितीपट बनवण्यात त्याला मोठा रस. इतरांच्या मदतीला तर एका पायावर तयार. त्याची या क्षेत्रतली महत्त्वाकांक्षाही जबर. पण म्हणून त्यानं कोणाच्या मानगुटीवर पाय दिला नाही.
पण त्याला असा एक माणूस भेटलाच. तो माणूस या मित्रच्या ओळखीतला, माहितीतलाच होता. त्याला दिग्दर्शक व्हायचं होतं. त्याच्या डोक्यात एक चांगली कल्पना होती. त्यावर चित्रपट बनवायचा होता. त्यानं ही कल्पना माङया मित्रला सांगितली. माझा मित्रही एका पायावर तयार झाला. त्याला स्क्रिप्ट लिहून द्यायलाही मदत केली. स्क्रिप्टिंगचं, शूटिंगचं सगळं काम मित्रनं एकदम प्रोफेशनली करून दिलं. शूटिंग क्वालिटी चांगली यावी म्हणून हायली प्रोफेशनल कॅमेरा हायर केला. त्यासाठी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च केले. मित्रला वाटलं की काम चांगलं झालं तर दिग्दर्शकाचं नाव जितकं होईल तितकं आपलंही होईल. आपणही या क्षेत्रत एस्टॅब्लिश होऊ.
या इच्छेपोटी एक पैसाही न घेता 20 दिवसांचं शूटिंग शेडय़ूल पूर्ण करून दिलं. दिग्दर्शकसाहेबांच्या एक एक अपेक्षा वाढतच होत्या. त्यांना आता फिल्म एडिट करायला एडिटिंग सिस्टीमही हवी होती. माङया मित्रकडे तीही होती. तीही त्यानं महिनाभर त्यांना फुकट वापरायला दिली. अशा प्रकारे फिल्म तयार झाली. आणि जेव्हा फिल्म प्रमोशन आणि रिलीजचा विषय निघाला नेमका तेव्हाच मित्रच्या त्या दिग्दर्शक मित्रनं खो दिला.
कौटुंबिक कारणासाठी घरी जाऊन येतो असं म्हणाला. तो तीन महिने उलटूनही तोंड दाखवायला तयार नाही. इकडे मित्र अस्वस्थ, की फिल्मचं काय झालं. त्याला पैशाची अपेक्षा नव्हतीच. फक्त आपण केलेल्या कष्टावरची या क्षेत्रतल्या जाणकारांची प्रतिक्रिया हवी होती. पण दिग्दर्शक मित्रचा पत्ता कुठे होता?
कौटुंबिक कारणासाठी म्हणून गावाकडे जातो असं म्हणून गेलेले ते दिग्दर्शकराव सुभाष घईंच्या प्रॉडक्शनर्पयत जाऊन पोहोचले. हातात माङया मित्रच्या मदतीनं केलेली फिल्म होती. घई प्रॉडक्शनमधील त™ज्ञांनी ती बघितली. त्यातल्या छायाचित्रणाचं खूप कौतुकही केलं. पण हे सर्व त्या दिग्दर्शकानं स्वत:च्या नावावर खपवलं. त्या प्रॉडक्शनमध्ये काम करण्याची त्याला पुढे संधीही मिळाली.
इकडे मित्रला हे सर्व कळाल्यावर तो सैरभैर झाला. या फसवणुकीतून त्याची रात्रीची झोप उडाली. त्याची धडपड, त्याचं प्रोफेशनल क्वॉलिटीचं काम, त्याचा साधा स्वभाव, मदतीची वृत्ती हे सर्व जवळून पाहत होतो मी. या गोष्टीला आता झालीत सहा- सात र्वष. आता मित्रनं त्याच्या क्षेत्रत बरंच नाव कमावलं आहे. पण संघर्षाच्या काळात झालेल्या फसवणुकीमुळे आजही तो या क्षेत्रत चटकन कोणावर विश्वास ठेवत नाही.
मागील आठवडय़ातील स्ट्रगलर्सवरचा लेख वाचला आणि आठवणींच्या कप्प्यात मिटून असलेला मित्रचा हा दुखरा अनुभव जागा झाला.
- राहुल भांगरे, नाशिक