- स्वदेश घाणेकर
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग (जस्ट एंट्री झालेला), व्हीव्हीएस लक्ष्मण हे पाच दिग्गज भारतीय पुरुष क्रिकेट संघात असताना क्रिकेटचा रोमांच किती टोकाचा असेल याची जरा कल्पना करा. भारतीय क्रिकेटनं जागतिक क्रिकेटवर आपली दादागिरी चालवायला सुरुवात केली तो हा काळ. एकसेएक खेळाडू. त्यांचे डोंगराएवढे विक्रम असं सारं सुरू होतं. भारतीय संघाची यशस्वी सलामीची जोडी म्हटलं की तेंडुलकर-गांगुली ही नावंच समोर येणार. मधल्या फळीत द्रविड-लक्ष्मण यांची विकेट काढणंही अवघड. त्यानंतर आला सेहवाग. अखेरची षट्कं झोडून काढायला. या सार्यात भारतीय महिला क्रिकेटकडे आणि त्यातल्या खेळांडूकडे कुणाचं लक्ष जाणार होतं? मात्र त्याच काळात तिनं क्रिकेट पदार्पण केलं. त्यावेळी महिला क्रिकेटकडे ना पैसा होता, ना स्पॉन्सर्स, ना सामने लाइव्ह दाखवणं. पुरुष क्रिकेटपटूंच्या मक्तेदारीत तिला खेळाडू म्हणून, उत्तम क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख घडवणं फार अवघड होतं. आपला स्वतर्चा असा ठसा उमटवण्याच्या निर्धारानं आलेली ती सावळी, सडपातळ (हडकुळी म्हटलं तरी चालेल) अशी मुलगी. पण पदार्पणाच्या सामन्यात तिने ज्या आत्मविश्वासाने खेळ केला त्याचे दाखले आजही द्यावेसे वाटतात. आणि महिला क्रिकेटपटूच काय, पण पुरुषक्रि केटपटूंनाही काही न जमलेले विक्र म तिने मागील दोन दशकात स्वतर्च्या नावावर केलेत.मिताली राज. तिचं नाव मिताली की मिथाली हे सांगण्यापासून तिच्या वाटय़ाला संघर्ष आला. आर्यलड विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात 114 धावा तिनं चोपून काढल्या. 2002 मध्ये कसोटीत पदार्पण केले आणि तिसर्याच सामन्यात 214 धावांची मॅरेथॉन खेळी करून वर्ल्ड रेकॉर्डला तिनं गवसणी घातली. एखाद्या महिला क्रि केटपटूनं केलेली ती तेव्हाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्यानंतर रेकॉर्ड आणि मिताली यांची जणू गट्टीच जमली. नुकताच भारतीय महिल संघाचा आफ्रिकेविरुद्ध वन डे सामना झाला. त्यात मितालीनं एक विलक्षण विक्रम नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रि केटमध्ये 20 वर्षाहून अधिक काळ सक्रिय राहणारी ती जगातली पहिली महिला खेळाडू बनली. पुरुष क्रिकेटपटूंशी तुलना केली तर सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि जावेद मियांदाद यांच्यानंतर ती चौथ्या स्थानावर येते. गेली दोन दशकं ती भारतीय महिला क्रिकेट खेळत आहे आणि संघात आत-बाहेर होऊनही परफॉर्म करत आहे.खरं तर भारतीय महिला क्रि केटला एक ग्लॅमरस चेहरा होता तो मितालीच्या रूपाने मिळाला. पण हे ग्लॅमर रूपातून नव्हे तर कामगिरीतून मिळवलेलं होतं. महिला क्रि केटपटूंत वन डे क्रि केटमध्ये सहा हजार धावा करणारी ती पहिली खेळाडू.. ट्वेंटी-20 क्रि केटमध्ये (पुरु ष व महिला) 2000 धावांचा पल्ला पार करणारी पहिली खेळाडू. वन डेत सलग सात अर्धशतकं झळकावणारी पहिली खेळाडू.. वन डेत सर्वाधिक अर्धशतकं नावावर असलेली महिला खेळाडू. वर्ल्डकप स्पर्धेत 1000 धावा नावावर असलेली पहिली भारतीय असे अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत.पण याही पलीकडे मिताली बंडखोर म्हणूनही ओळखली जाते. तो तिचा मूळचा स्वभाव नाही; परंतु कधीतरी आडवाटेनं जावं लागलं. पुरु षांप्रमाणे महिला क्रि केटला महत्त्व जे आता दिले जात आहे, त्याचं श्रेय मिताली आणि तत्कालीन सहकार्यांना नक्की द्यायला हवं. पण सातत्यानं महिला क्रिकेटला दिल्या जाणार्या सापत्न वागणुकीवर तिने प्रहार केला. महिला क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा मुद्दा तिने उचलून धरला आणि तडीसही नेला..राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात वयाच्या 19 व्या वर्षापासून सुरू झालेला हा क्रिकेट प्रवास गेली 20 वर्षे सुरू आहे. शाळेत मोठय़ा भावासोबत तिने गिरवलेले क्रिकेटचे धडे आणि प्रसंगी नेट्समध्ये मुलांसोबत सराव करून दिग्गज क्रिकेटपटू बनण्याचा मितालीचा ध्यास मोठा होता. एवढा प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळताना दर्जा आणि फिटनेस सांभाळणं हे तिनं उत्तम साधलं आहे.येत्या 2021च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर मिताली निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे. भारतीय महिलांना वर्ल्डकप जिंकून द्यायचा हे तिचं स्वप्न आहे. बघूया ते तिला जमतं का? कारण आजवर फायटर म्हणूनच तिची ओळख आहे.