सतत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसत असाल तर स्वत:ला सांभाळा..तुमचा दिवस मोबाइलने सुरु होतो आणि मोबाइलनेच संपत असेल तर ही वेळ थोडं थांबून विचार करण्याची आहे. सकाळी मोबाइल, प्रवासातही मोबाइल, बाथरुम, जेवणाच्या टेबलवर मोबाइल, आॅफिसमध्ये कॉम्प्युटर, टॅब, पुन्हा मोबाइल असं दिवसरात्र करणं तुमच्या डोळ््यांसाठी घातक आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेटस्च्या अतिरेकी वापराचा परिणाम डोळ््यांशिवाय एकूण कामावर, तुमच्या झोपेवर आणि वर्तनावरही होतो. मायग्रेन, पाठ आणि मानदुखी, डोळ््यांची जळजळ असे विविध आजार सततच्या डिजिटल गॅजेटस्च्या वापरामुळे उद्भवतात. जी मुले सतत व्हिडिओ गेम्स खेळत असतात त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.डोळ््यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याची सतत उघडझाप होण्याची आवश्यकता असते. पापण्यांची उघडझाप झाल्याने ते कोरडे होत नाहीत आणि डोळे चांगले कार्यरत राहतात. पण सर्वेक्षणे आणि अभ्यासाद्वारे आता इलेक्ट्रॉनिक गॅजेटस्चा अतिरेकी वापर यामध्ये अडथळा ठरत असल्याचे दिसत आहे. सामान्य माणूस प्रत्येक मिनिटास सरासरी १५ ते १६ वेळेस पापण्यांची उघडझाप करत असतो. ही उघडझाप नकळत आणि नैसर्गिकरित्या होत असते. वाचनाच्या वेळेस ही उघडझाप मंदावून ती पाच ते सहा वेळेस होत असते मात्र जी मुले दिवसरात्र इलेक्ट्रॉनिक गॅजेटसना चिकटून राहतात त्यांच्या पापण्यांची उघडझाप प्रत्येक मिनिटास केवळ तीन ते चारवेळाच होते. पापण्यांची उघडझाप डोळ््यांमध्ये मॉइश्चरचे प्रमाण कायम ठेवतात, डोळ््यांचे बाहेरील त्रासदायक कमांपासून संरक्षण करतात, त्याचप्रमाणे डोळे स्वच्छ करुन दृष्टीलाही मदत करतात. पण हिच पापण्यांची उघडझाप कमी झाल्यामुळे डोळे कोरडे होतात याला ड्राय आय असं म्हटलं जातं. स्मार्टफोनचा अती वापर आजकाल तरुणांमध्ये वाढल्यामुळे ही ड्रायआयची समस्या तरुणाईमध्ये दिसून येत आहे. जी मुले स्मार्टफोन जास्त वापरतात त्यांच्यामध्ये ही समस्या जास्त असते असे निरीक्षण बायोमेड सेंट्रल संस्थेने नोंदवले आहे. या मुलांना काही महिने स्मार्टफोनपासून लांब ठेवल्यानंतर त्यांच्या डोळ््यांच्या स्थितीत सुधारणा झाल्याचेही या संस्थेने निरीक्षणामध्ये नोंदवले आहे. कॉम्प्युटर, टॅबलेट, स्मार्टफोन आपण वापरतो तेव्हा संपुर्ण दृष्टी एकाग्र करतो आणि आपली नजर त्यावरुन हटवत नाही. यामुळे आपल्या बुबुळांवर असणारी टीअर फिल्म म्हणजेच पाणीदार पडदा सुकत जातो, त्याची जाडी कमी होत जाते. ही टीअर फिल्म अशीच सुकत राहिली की ड्राय आयचा धोका संभवतो. ड्राय आय या स्थितीमध्ये आपले डोळे अश्रूंची निर्मिती योग्य प्रमाणात करु शकत नाहीत. डोळे लाल होतात आणि सुजतातही. बायोमेड सेंट्रलने कोरियामधील ९१६ मुलांच्या डोळ््यांसाठी वेगवेगळ््या चाचण्या घेतल्या. ही सर्व मुले ७ ते १२ या वयोगटातील होती. यामधील ६.६ टक्के मुलांना ड्राय आयचा त्रास असल्याचे दिसून आले. दिवसभरात साधारण तीन-सव्वातीन तास स्मार्टफोन वापरणाऱ्या ९७ टक्के मुलांना डोळ््यांच्या विविध तक्रारी होत्या. डोळे कोरडे होण्यामागे इलेक्टॉनिक गॅजेटस्बरोबर इतरही कारणे असतात. तुम्हाला डोळ््यांचे सतत त्रास होत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून ते तपासण्याची गरज आहे.दृष्टी मंदावण्याआधी काय कराल?१) पापण्यांची उघडझाप सुरु करा२) स्मार्टफोन, लॅपटॉपचा वापर कमी करणे हा डोळ््यांचे आरोग्य राखण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय आहे.३) रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी फोन, लॅपटॉप बंद करा.४) संगणकावर काम करताना प्रत्येक अर्ध्या तासाने विश्रांती घ्या, डोळ््यांची उघडझाप होण्यासाठी सतत संगणकाच्या स्क्रीनवर रोखून पाहू नका.५) डोळ््यांच्या आरोग्यासाठी मोबाइलपासून दूर राहून मोकळ््या हवेत तसेच घराच्या आणि आॅफिसच्या बाहेर जाणं सुरु करायला हवं.- प्रतिनिधी
मोबाईलनेच दिवस सुरू होतो आणि संपतोही? - सावधान!
By admin | Published: April 08, 2017 6:43 PM