ज्यानं जोकोविचला बॅडपॅचमधून बाहेर खेचून काढलं आणि प्ले कोर्टाचा बादशाह बनवलं, तो म्हणजे हा मोजो. पण तो नक्की आहे कोण? कुठली बुटी की मुळी, ताईत की गंडा? हा मोजो आपल्याकडे असला तर म्हणे अपनी भी नय्या पार लगती है आणि जिंदगी की बुलेट ट्रेन सुसाट दौडती है ! पण मग कुठे शोधायचा हा मोजो? जगभरातल्या तरुणांच्या तोंडी रुळलेल्या या शब्दाचा नक्की अर्थ काय?
क्रिकेट सोडून इतर खेळांची कॉमेंट्री कधी कान देऊन ऐकलीये? स्पेशली रग्बी, फुटबॉल आणि टेनिसची? शक्यता कमीच ना ! कारण हे खेळ ऐकायचे कमी आणि पाहायचे जास्त असतात. (महिला टेनिस तर फारच प्रेक्षणीय !!) या खेळांचा थरार एवढा रोमांचकारी असतो की प्रेक्षक खुर्चीला खिळून बसणारच ! सलग दोन ते तीन तास प्रेक्षकांना जराही हालचाल न करू देणारे हे खेळाडू जादूगारच म्हणायला हवेत आणि ते तसे जादूगार असतातही, कारण त्यांच्या मागे भक्कमपणे उभा असतो त्यांचा जादूई ‘मोजो’ ! या मोजोचं अगदी अलीकडचं आणि धडधडीत उदाहरण म्हणजे नोवाक जोकोविचचा फ्रेंच ओपनमधील अॅण्डी मरे विरुद्धचा शानदार विजय. जोकोविचच्या सक्सेसनंतर जगभरातल्या वृत्तपत्रांच्या आणि चॅनेल्सच्या तोंडी एकच विषय होता.. जोकोविचचा मोजो ! तो मोजो ज्यानं जोकोविचला बॅडपॅचमधून बाहेर खेचून काढलं आणि प्ले कोर्टाचा बादशाह बनवलं ! पण हा मोजो म्हणजे नक्की काय भानगड आहे? कुठली बुटी की मुळी, ताईत की गंडा? हा मोजो आपल्याकडे असला की ‘अपनी भी नय्या’ पार लगती है आणि जिंदगी की बुलेट ट्रेन सुसाट दौडती है असं म्हणतात. पण मग कुठे शोधायचा हा मोजो? जगभरातल्या तरुणांच्या तोंडी रुळलेल्या या शब्दाचा अर्थ काय? अगदी सोपाय ! लोकांना आकर्षित करण्याची आणि यशस्वी होण्याची एखाद्या व्यक्तीतली ताकद म्हणजे त्याचा मोजो अर्थात त्याचं मॅजिक ! ते कुणी कुणाला आणून देत नसतं. स्वत:च स्वत:लाच हा ‘मोजो’ शोधावा लागतो ! मूळचा आफ्रिकन असलेला हा शब्द अमेरिकेत प्रचलित झाला तो एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. अमेरिकेत गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या कृष्णवर्णीयांनी तो लोकप्रिय केला. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत त्या देशातल्या जवळपास सर्वच कृष्णवर्णीयांच्या तोंडी हा शब्द चांगलाच रुळला. मोजोचा आफ्रिकन भाषेतला अर्थ आहे जादू, ताईत किंवा अशी किमया जी साऱ्या सुखांना तुमच्या पायाशी लोळण घ्यायला लावेल. पण कालांतराने या शब्दाला सुसंंगत आणि काहीसा आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाला. मोजो म्हणजे ती किमया ज्यानं तुमचं संपूर्ण बदलतं. स्वत:मधे असणारी ती शक्ती जी माणसाला यशाकडे घेऊन जाते. पुढे पुढे त्याला सेक्स अपील, पॉवर, एन्फ्लूएन्स असेही अर्थ चिटकले. असा शब्द तरुणांमधे पॉप्युलर न होता तर नवलच ! आजमितीला ह्या शब्दाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. संगीत, सिनेमा, कला आणि खेळाच्या क्षेत्रात तर या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या गायकाला गाणं मनासारखं जमलं नाही किंवा सलग काही सामन्यांमधे एखाद्या खेळाडूला सूर गवसला नाही की, ‘शी ! ही हॅज लॉस्ट हर। हीज मोजो’ अशा कमेण्ट्स व्हायरल होतात. इनफॅक्ट बऱ्याचदा असे खेळाडू वा कलाकार आपला मोेजो हरवला आहे अशी जाहीर कबुलीही देऊन टाकतात. म्हणजे सगळ्या अपयशाचं खापर मोजोच्या किंबहुना हरवलेल्या मोजेच्या बोडक्यावर ! पण मोजो म्हणजे फक्त इहवादी यश किंवा लोकांना आकर्षित करायची क्लृप्तीच का? की आणखीही काही गुपितं ह्या मोजोच्या अंतरंगात दडली आहेत? याचं उत्तर देताना ख्यातनाम अमेरिकन लाइफस्टाइल कोच आणि मॅनेजमेंट रायटर म्हणतो की, ‘मला कायम वाटायचं की मोजो म्हणजे आपल्याला यशाकडे नेणारी गती आहे. ग्रेट मोजो असणारी माणसं सतत काही ना काही साध्य करत असतात. पण कालांतराने मला दिसलं की काही कुठलाही मोठा बदल न घडवता आपलं आयुष्य सुखनैव कंठणाऱ्यांचाही मोजो ग्रेट आहे. मग माझी आधीची व्याख्या चुकीची वाटायला लागली. आज मी म्हणतो की, ‘मोजो म्हणजे आपण जे जे करतो त्याप्रती असणारी सकारात्मक ऊर्जा आहे, जी आपल्या अंत:करणात उगम पावते आणि हळूहळू आपल्या सभोवताली पसरत जाते.’ मोजो या नावातच असा मोजो आहे की कित्येक व्यक्तींनी स्वत:च्या नावात हा शब्द अॅड केला आहे. मोजो हे नाव असणारे वा त्यावरून सुरू होणारे हजारो वेबपेजेस, मॅगझिन्स, गेम्स, उद्यान, हॉटेल्स, टीव्ही चॅनल्स, म्युझिक व्हिडीओ, चॉकलेट्स, बाइक्स, फॅशन ब्रॅण्ड्स सगळं सगळं ओसंडून वाहतंय ! नुसतं नावच त्याच्या अर्थाप्रमाणे जादू करेल असं वाटणाऱ्यांचीच संख्या अधिक. उद्या आपल्याही आपल्या गाडीचं, गिटारचं किंवा पेनचं नाव मोजो ठेवावंसं वाटलं तरी काही हरकत नाही; पण जग बदलवायचा मोजो मात्र स्वत:ला तासून, तपासून आणि बदलूनच सापडेल. नाहीतर ‘मा मोज्जो’ करत फुकटच टेन्शन देत फिरणाऱ्यांच्या मांदियाळीत आणखी एकाची भर पडेल !! गॉट माय मोजो वर्किंग कलेत, संगीतात आणि साहित्यात मोजो ह्या शब्दाचे उल्लेख नवे नाहीत. पण ज्या गाण्याने ह्या शब्दाला घराघरात पोहोचवलं ते गाणं होतं मडी वॉटर्सचं (मॅक्किंगले, मार्गनफिल्ड). १९५७ सालातलं ‘गॉट माय मोजो वर्किंग’ या कृष्णवर्णीय गायकाचं हे गाणं आज ‘क्लासिक ब्लूज’ ह्या संगीत प्रकारात गणलं जातं. आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करायच्या प्रयत्नात असणारा तरुण मडीने या गाण्यात चितारला आहे. हा तरुण म्हणतोय की, मी माझा मोजो तर कामाला लावलाय, पण त्याचा तुझ्यावर काहीच असर होत नाहीये. बाकीच्या पोरी पटतील कदाचित, तूच बरी कशी पटत नाहीयेस? मोजो हरवलाय? परत मिळवा! असं कधी झालंय की लाइफमधे काहीच मनासारखं घडत नाहीये? काही नवीन करायला घेतलं की अपयशच पदरी पडतंय, रोजच्या जगण्यातल्या ‘तेच ते आणि तेच ते’ चा प्रचंड कंटाळा आलाय पण ह्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाहीये? ह्याचा अर्थ सरळ आहे की, तुमचा मोजो हरवला आहे. तो परत मिळवायचा असेल तर थोडी मेहनत तो करनी पडेगी !
या काही टिप्स तुम्हाला तुमचा मोजो परत मिळवण्यात नक्की मदत करतील.
१) मेंदूला सकारात्मक विचारांची, खरंतर सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. त्यात काय विशेष, त्यानं काय होणार असं रडगाणं बंद करा.
२) मोठी गोष्ट साध्य होत नसेल तर छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. छोट्या छोट्या गोष्टी ठरवा. आणि त्या पूर्ण करा. अगदी छोट्या. म्हणजे ४ वाजता आलं घालून चहा करून प्यायचा. चार वाजले की करा, प्या. आपण ठरवतो तेच होतं हे घडण्याची मेंदूला सवय लावा.
३) स्वत:चे चोचले पुरवायला काहीच हरकत नाही. चांगलं चुंगल खा. स्टायलिश राहा. मस्त फ्रेश राहा. छान दिसा. यानेही कॉन्फिडन्स वाढायला मदत होते.
४) दररोज थोडावेळ स्वत:ला आनंद वाटेल अशा अॅक्टिव्हिटीसाठी द्या. वाचा, चित्र काढा, गाणं म्हणा किंवा अजूनही बरंच काही करण्यासारखं आहे ते शोधून काढा. आपल्याला जे करायला आवडतं ते रोज थोडा वेळ कराच. अगदी न चुकता करा, म्हणजे मला जे आवडतं ते करताच येत नाही असं रडगाणं गायला स्कोप राहणार नाही.
५) न चुकता एखादी ट्रीप काढा. मनसोक्त भटका. नव्या लोकांना भेटा, नव्या गोष्टी शिका, नवे अनुभव जमवा. एकट्यानं फिरा. लांब जाता येत नसेल तर तुमच्या आसपास, शहरात, गावात फिरा. बसने, उपाशीतापाशीही फिरलात तरी चालेल. तुमचं रुटीन जगणं सोडून नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करा.
६) आणि मग जे काम तुम्ही करताय ते मनापासून करा, जीव तोडून आणि आवडीनं करा. हे एवढं जरी केलं तरी आपल्यात असलेला आपलाच मोजो जागा होईल आणि आपल्यालाही यशाच्या शिखरावर जाणारी वाट दाखवेल! - अनादी अनंत