नागनाथ खरात
रानोमाळ गुरांमागं, मेंढरांमागं फिरताना आभाळातून जाणाºया विमानाकडं डोळे फाटोस्तोवर पाहायाचो. तरवडाच्या फुुलांच्या माळा करून, रुईटीच्या पानाचे पैसे करून लहानपणी दोस्तांसोबत खेळायचो. आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती की, आपणही एक दिवस त्या वेगळ्याच ‘भूगोलाच्या प्रदेशात’ प्रवेश करू...चौथीत असताना आग्हाला ‘साकव’ नावाचा धडा होता. तो धडा वाचला की, त्या धड्यातल्या ‘सुलभाबरोबर’ शहरातली सफर केल्याचा आनंद मिळायचा...माझ्या ‘दिसाड दिसं’ नावाच्या शॉर्टफिल्ममधला सीन कदाचित याच मुरलेल्या आयुष्यातून घडलेला असावा. दूरपर्यंत पसरलेली माळरानं. वाºयाचा आवाज सोडला तर दूरपर्यंत पसरलेला सन्नाटा. आणि अशा वातावरणातून या फिल्ममधले अब्बास, अशोक, शीतल येताहेत. तेवढ्यात भलामोठा आवाज करत एक विमान त्यांच्या डोक्यावरून जातं. मात्र त्यांना ते दिसतच नाही. (त्यांना वाटत असतं की कोणतरी दुष्काळी भागाची विमानाने पाहणी करताहेत)...भारतातील लोकांच्या जगण्यातल्या या दोन अवस्था आहेत. माझ्याही होत्याच.***अरेबियाची विशाल वाळवंट मागे पडत होती. रेती रेतीच्या मधून जाणारे भलेमोठे रस्ते विमानातून पेनाने ओढलेल्या रेषांइतके लहान दिसत होते. विमानाच्या खिडकीतून खाली पाहताना माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मनात उगीचच भीती दाटून राहिली होती. जेमतेमच इंग्रजी बोलता येतं आपल्याला असं मनात होतंच. त्यात निघताना विमानतळावरच ‘डिपार्चर टाइम’ऐवजी ‘डिप्रेचर टाइम’ असा उल्लेख मी केल्यानं एक माणूस मला खालून वरून न्याहाळत होता ते आठवलंच...विमान उतरलं. बोस्नियाच्या साराजेवोच्या साध्याच पण तितक्याच आकर्षक विमानतळावर आम्हाला फेस्टिव्हलला न्यायला आयोजक आले होते. डोंगरात वसलेलं शहर. मला हिंदी सिनेमात पाहिलेल्या ‘दार्जिलिंग’ची आठवण झाली; पण लक्षात आलं आजूबाजूला सगळेच लोक गोरे. त्यात माझं काळेपण उठून दिसत होतं असं उगीच वाटलं. परंतु हॉटेलवर गेलो तर सगळ्यांनी दिलखुलास केलेलं स्वागत मनात खूप आनंद भरणारं होतं...माझ्या रूममध्ये आॅस्ट्रेलियाचा मार्क, इराणचा इब्राहिम असे दोन फिल्ममेकर्स होते, तर शेजारच्या रूममध्ये पोलंडची गोषा (तिने श्रीलंकेत दोन महिने राहून फिल्म बनवली होती. तेही एकटीने.) तिचे मित्र, काही अरेबियन पत्रकार, महिला फिल्ममेकर्स, इटलीची व्हेलेनटिना, सल्वतोरे असे जगभरातील तरुण होते. ऐतिहासिक वास्तू आणि हेरीटेज दर्जा असलेलं ‘गेट आॅफ साराजेवो’ हे संपूर्ण हॉटेलच आयोजकांंनी बूक केलं असल्यामुळे आम्हाला कुठेही मुक्तपणे फिरता व राहता येत होतं...भाषेचा प्रश्न लवकरच निकाली निघाला. मी बºयापैकी चांगलं इंग्रजी बोलतो हे एव्हाना इथं माझ्या लक्षात यायला लागलं होतं.फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझी फिल्म होतीच. त्यात उद्घाटन समारंभ आणि शेवटी पुरस्कार, निरोप समारंभावेळी मी ब्लेझर घालायचं ठरलं होतं; (म्हणजे मित्रांनीच तसं ठरवलं होतं. अशा कार्यक्रमात ब्लेझर-कोट घालतात म्हणून..) परंतु आयुष्यात पहिल्यांदाच असा ड्रेस परिधान केल्यामुळे मला खूपच ‘आॅकवर्ड’ वाटलं. त्या कोटाखाली मी पोळ्याचा बैल सजवल्यासारखा मला वाटू लागलो. पण तिथं सगळे चांगला दिसतोय म्हणत होते...बोस्नियाची राजधानी साराजेवो हे पहिल्या महायुद्धाची सुरुवात झालेलं ठिकाण. पहिल्या रात्री मी एकटाच शहरात पायी फिरून आलो. हंगेरीयन, पोलंड, सार्बियन पद्धतीच्या वास्तू बºयाच ठिकाणी होत्या. पर्यटकांची संख्या (विशेषत: जपान-कोरीयन) मोठ्या प्रमाणावर होती. पुण्याच्या फिल्म अर्काइव्हज आॅफ इंडियाच्या थिएटरमध्ये बसून बघितलेल्या कित्येक इटालियन, युरोपियन, बाल्कन संस्कृतीच्या सिनेमांतील दृश्यं (रस्त्यांना, मानवी पेहराव, मध्ययुगीनकालीन शहररचनेला) मी प्रत्यक्षात पाहत होतो. मध्यरात्री बराच वेळ भटकलो, तरी शहर जागंच होतं. पबमधील गाण्याचा आवाज येत होता. हॉटेलकडे जाताना घरची आठवण येत होती; पण नेमका फोन लॉक झाल्यामुळे कोणाशी (घरी, भारतात) संपर्कही करू शकत नव्हतो...या काळात माझी सगळ्यात मोठी अडचण झाली ती जेवताना. कारण, हातानं खायची सवय. अपवादात्मक चायनीज पदार्थ सोडले तर दोन चमचे वापरून जेवायची सवय अजिबातच नाही. त्यामुळे चमच्याने ब्रेडचिकनचा तुकडा तोडता तोडता मुश्किल. मी आजूबाजूला पहायचो तर बाकीच्यांचं बरचसं जेवण उकलेलं असायचं. मी उगीच खेळत बसायचो. पहिल्या दिवशी घडलेला प्रसंग पाहून इब्राहिमनं मला त्याच्यासारखं ‘एक हात, एक चमचा’ हा फॉर्म्युला सांगितला. मग सुरळीत झालं सगळं!‘दिसाड दिसं’च्या स्क्रीनिंगवेळी बरेचसे इंग्रजी न कळणारे बोस्नियन, सर्बियन लोक होते. मात्र त्यांनी मारलेल्या उस्फूर्त मिठ्या मला खूप भावुक करून गेल्या. दिवसभर भटकंती आणि सायंकाळी फिल्म स्क्रीनिंग अशा स्वरुपाचं नियोजन आयोजकांनी केल्यामुळे संपूर्ण साराजेवो शहर आम्हाला पाहता आलं...मार्क इब्राहिम, गोषा, व्हेलेंटिना आम्ही बºयाचदा रात्री रस्त्यावर बसून गप्पा मारत बसायचो. कित्येकदा सिनेमे, राजकीय या विषयाबरोबरच घरगुती खूप बोलायचो.‘दिसाड दिसं’मधल्या गावाविषयी ‘गोषा’ खूप आत्मीयतेने बोलत होती. मार्क तर जगभर फिरणारा भटका होता. गोषा तिच्या नवीन फिल्मविषयी मला सांगत होती. पुढच्या वर्षी ती भारतातही येणार म्हणाली. मीही सगळ्यांना निमंत्रणं दिली. आमची टेक्निकल सहायक आलिया आम्हाला इटालियन पबमध्ये घेऊन गेली. खरं तर अशा ठिकाणी जायची मला भीतीच वाटते. पण नंतर मार्क, गोषा, इब्राहिम आल्याने बिनधास्त होतो. आयुष्यात पहिल्यांदा हे अनुभवत होतो. पाच दिवस कसे गेले हे मला कळलंही नाही. आम्ही सगळेच जण एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. जणू की इथलेच नागरिक असल्यासारखे..शेवटच्या दिवशी ‘सीलबंद’ पाकीटबंद निकाल आला. ३० देशांतील फिल्मपैकी ६ ज्युरींनी दिसाड दिसंला ‘गोल्डन बटरफ्लाय’ अवॉर्ड जाहीर केला. माझ्यासाठी हे खूप अविश्वसनीय होतं..!खरं, पुरस्कार वगैरेंना मी फारसं मानत नाही. पण ती एक ऊर्जा देणारी गोष्ट ठरले. बोस्नियातील टीव्हीवर मुलाखती झाल्या. पेपरात फोटो आले. मी मात्र आतून अस्वस्थ होतो. आपण थांबलो तर नाही ना? मी माझ्याच खाणाखुणा तपासू लागलो. मोटेवाडीसारख्या एका खेडेगावात राहून मी फिल्म बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. भोगलेल्या, सहन केलेल्या अपमानावरची ही एक फुंकर होती. जखम तशीच आहे. अजून लय लांबचा पल्ला गाठायचाय, हेही आठवलं...परतीच्या विमानाने येताना वेळोवेळी मदतीला धावलेल्या हजारो हातांची आठवण झाली. शूटिंगदरम्यान मदत करणारे इन्नुस तांबोळी सर, अमोल कुलकर्णी सर हे प्राथमिक शाळेतील शिक्षक, दीपक शिंदे, प्रा. गणेश राऊत, रोहित पवार, पुणे विद्यापीठ यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता.परतीच्या उंचच उंच उडाल्या विमानातून इमारती मुंगीएवढ्या दिसत होत्या.माझं मन मात्र गावाकडंच घिरट्या घालत होतं..प्रिय, दिसाड दिस,तू फुलून आलीसमोहोर फुटल्या बाभळीसारखीजीर्ण सन्नाटा पसरलेल्या उन्हात..
हे मातीचे पाय मातीचेच राहू देयळकोट जगण्याचा...भेटू या नव्याने...