-राहुल पी पेंढारकर, अहेरी जि.गडचिरोली तुम्हाला मोगली आठवतं का ? लहानपणी मस्त टी. व्ही. समोर बसून मोगलीची कार्टून सीरीअल बघताना ज्या जंगलातील विश्वामधे स्वत:ला हरवून घ्यायचो आणि दिवसभर ‘जंगल जंगल बात चली है पता चला है.. चड्डी पहन के फूल खिला है..’ मनात वाजत रहायचं.त्याच मोगली बद्दल बोलतोय मी. असं म्हणतात, की १८३१ मधे मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एका ब्रिटिशाला वन्यप्राण्यांसोबत खेळत असताना छोटं बाळ दिसलं होतं. पुढे तो कोल्ह्यांसोबत गुहेत राहू लागला, ह्याबद्द्ल त्यानं आपल्या डायरीत लिहिलं असल्याचे पुरावे सापडतात. पुढे ह्याच डायरीचा आधार घेऊन विश्वविख्यात लेखक किपलिंग याने ‘जंगल बूक’ लिहिलं. ज्यामधे मोगली, बालू, बघीरा, दबाकी, शेरखान या पात्रांचा उल्लेख आढळतो. पण जंगल बूक मधील मोगली खरा-खुरा असू शकतो काय? असा कधी प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला?एक मोगली छत्तीसगढ़च्या बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्यातील गढ़बेंगाल गावचा रिहवासी होता. त्याचे नाव चेंदरु मंडावी. चेंदरु हा मूरिया जमातीतील आदिवासी मुलगा. तो लहान होता पण धाडशी होता. अंगावर चार बोटाची चीरोटी नेसून हातात तिरकामटा धरून तो गर्द रानात भटकंती करायचा. शिकार करायचा, तो तीरकामट्यानेच मासेही पकडायचा. कधी कधी गम्मत म्हणून पाखरे पकडून ते सोडून देखील द्यायचा. असा चेंदरु चा ठराविक दिनक्र म होता. एक दिवस चेंदरु घरी असताना, त्याच्या वडिलांनी एका टोपलीत वाघाच्या पिल्ल्याला घरी आणलं होतं. ते वाघाचं गोंडस पिल्लू बघून चेंदरु ला खूप आनंद झाला. ते पिल्लू खूप खोडकर होतं. चेंदरु त्या वाघाच्या पिल्लाबरोबर खेळायचा, जेवायचा आणि त्याच्या जवळच झोपायचा. चेंदरु आणि त्या वाघांत जीवाभावाची मैत्री झाली होती. हळूहळू चेंदरु बरोबर ते वाघाचं पिल्लू देखील मोठे होत गेलं. चेंदरु आणि वाघाच्या दोस्तीची चर्चा सगळीकडे पसरु लागली होती. ख्रिस्ती मिशनरी त्या भागात काम करत होते. स्वीडन येथील आॅस्करविजेते फिल्म डायरेक्टर आर्ने सक्सडॉर्फ यांना ही गोष्ट कळताच सक्सडॉर्फने चेंदरु वर फिल्म बनविण्याचं ठरवलं. आपल्या टीमसह शूटिंगसाठी भारतात दाखिल झाला. सक्सडॉर्फने चेंदरु लाच नायकाच्या भूमिकेसाठी निवडलं. फिल्मसाठी दोन रुपये प्रतिदिन चेंदरु ला दिले जायचे. अश्याप्रकारे अगदी दोन वर्षात ही फिल्म पूर्ण झाली. त्याकाळी पं. रविशंकर यांनी त्या सिनेमाला संगीत दिलं.दि जंगल सागा असं सिनेमाचं नाव ठेवण्यात आलं होते. ही फिल्म प्रथमता १९५८ मधे कान फिल्म फेस्टिवल मधे प्रदिर्शत करण्यात आली. चेंदरु व जंगलातील प्राण्यासोबत प्रदिर्शत झालेल्या ह्या फिल्मला खूप लोकप्रियता मिळाली. एका रात्रीत चेंदरु स्टार वगैरे झाला. फिल्म रिलीज होताच चेंद्रुला स्विडनसह अन्यदेशातही नेण्यात आले. लहानसा चेंदरु वाघाच्यापाठीवर बसून रानात हिंडतो आहे, हे बघण्यासाठी लोक धडपडत. आर्ने सक्सडॉर्फ आणि त्याची पत्नी एस्ट्रीड सक्सडॉर्फ हे दोघेही चेंद्रुला दत्तक घेण्याच्या विचारात होते; पण कालांतराने दोघात मतभेद होऊन वैवाहिक जीवनापासून दोघंही वेगळे झाले. बरेच दिवस स्वीडन मधे राहून चेंदरु गढ़बंगाल येथे परत आला. तो सतत स्वीडनच्या आठवणीत हरवला असायचा, एकाकी रहायचा, कमी बोलायचा, कुणाला विदेशी कपड्यात बघून तो जंगलात पडत सुटायचा. काळानुरूप चेंदरु आता म्हातारा होत चालला होता, डाइरेक्टर आर्ने सक्सडॉर्फ एकदा तरी चेंद्रुला भेटायला गढ़बेंगल येथे नक्की येईल,अशी त्याला अपेक्षा होती; पण ४ मे२००१ मधे आर्ने सक्सडॉर्फचा मृत्यु झाला ..२०१३मध्ये मधे पॅरालिसिसच्या अटॅक मुळे चेंदरु इतिहासाच्या पडद्याआड झाला...वाघ हरवला, वाघाला बाळं झाली अशा सगळ्या बातम्या अलिकडे वाचनात आल्या आणि हे सारं आठवत राहिलं..आपण वाघावरच काय माणसांवरही प्रेम करायला कधी शिकणार?
मोगलीचं जंगल, चेंदरुचा वाघ आपल्याला कसे भेटतील?
By admin | Published: April 01, 2017 5:57 PM