- डॉ. भूषण मनोहर देव
मेडिकलची डिग्री घेतल्यावरपीजी करायचं, नोकरी करायचीकी दवाखाना टाकायचा?..- सगळ्यांना पडतो तोच प्रश्नमलाही पडला होता.त्याच काळात ‘निर्माण’बरोबरवर्षभर खेड्यापाड्यांतआरोग्यसेवेचं काम केलं आणिमाझ्या गावात परत आलो.मला माझी वाट मिळाली आहे..जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील तापीच्या तीरावर वसलेलं अंतुर्ली हे माझं गाव. बारावीपर्यंतचं शिक्षण अंतुर्लीलाच झालं. पुढे मी नागपूरला बीएएमएस पूर्ण केलं. मेडिकलच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की डिग्री झाली आता पुढे काय करू? पीजी, की नोकरी, की स्वत:चा दवाखाना?खरंच मोठाच प्रश्न आहे हा आणि मलाही तो सतावत होता. पण याचदरम्यान एक गोष्ट घडली : निर्माणचं शिबिर.डिग्री घेतल्यानंतर नेमकं काय करायचं, आपल्या जगण्याचं ध्येय काय, प्रायॉरिटीज कोणत्या.. माझ्या सर्व प्रश्नांचा शोध या शिबिरात पूर्ण झाला. मी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म (आरबीएसके) या सरकारी कार्यक्र मात मेडिकल आॅफिसर म्हणून काम करीत होतो. पुढे माझ्यासमोर ‘सर्च’ या ख्यातनाम संस्थेत मोबाइल मेडिकल युनिटमध्ये (एमएमयू) इन्चार्ज-मेडिकल आॅफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या जीवनातील एका नवीन शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीचा एक महिना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. योगेशदादाच्या मार्गदर्शनाखाली मी माझे क्लिनिकल स्किल अजून मजबूत केले.याचदरम्यान मी आदिवासी गोंडी भाषेचे धडेसुद्धा गिरवीत होतो. नायना म्हणजेच डॉ. अभय बंग यांनी मला प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याच्या आधी आॅफिसला बोलावून सांगितलं, तू आत्ता जे काही करतोहेस, त्याकडे केवळ एक नोकरी म्हणून बघू नकोस. मोबाइल मेडिकल युनिटच्या माध्यमातून ४८ आदिवासी गावांशी तुझा संपर्क येईल. या गावांना चांगली आरोग्यसेवा कशी पुरवता येईल या दृष्टीने या कामाकडे तू बघ. नंतर पुढे वर्षभर याच दृष्टीनं माझे सारे प्रयत्न राहिले. एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष फिल्डवर्कसुरू झालं. महिनाभरात ४८ आदिवासी गावं, तीन आश्रमशाळा आणि चार आठवडी बाजारांना आम्ही भेट द्यायचो. माझ्यासोबत एक डिस्पेंसरी बस, एक सपोर्ट व्हॅन आणि आठ सहकारी अशी संपूर्ण टीम मिळून आम्ही दररोज २ ते ३ गावांमध्ये जायचो. प्रत्येक गावात जाऊन रु ग्णांवर उपचार करणे, प्रतिबंधित उपचार, डायरिया, मलेरियासारखे जीवघेणे आजार होऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण, गरोदर स्त्रियांची तपासणी, हाय ब्लडप्रेशर, डायबेटीज, लकवा, इत्यादि आजारांवर विशेष उपचार, आश्रमशाळेतल्या आजारी विद्यार्थ्यांवर उपचार.. अशा अनेक गोष्टी आम्ही मोबाइल मेडिकल युनिटच्या माध्यमातून करीत होतो. हात कसे धुवावे, केव्हा धुवावे, कशाने धुवावे, मलेरियाचं प्रमाण फार असल्याने काळजी म्हणून मच्छरदाणीचा वापर कसा करावा, दातांची काळजी कशी घ्यावी इत्यादि सवयी लोकांना लावण्याचा प्रयत्न आम्ही केला. आठवडी बाजारात अनेक गावांमधील लोक येतात म्हणून आम्ही बाजारातसुद्धा दवाखाना करायचो. गडचिरोलीत तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण खूपच जास्त. या बाजारात आम्ही हाय ब्लडप्रेशर, डायबेटीज, कॅन्सर या रोगांच्या बाबतीत आरोग्य शिक्षण आवर्जून करायचो. मोबाइल मेडिकल युनिटसोबत वर्षभर मी काम केलं. प्रचंड रु ग्णसंख्या, दुर्मीळ व विविध प्रकारच्या आजारांवर उपचार मला या माध्यमातून करता व शिकता आले. गडचिरोलीत दरवर्षी मलेरियाची साथ येते. या साथीला नियंत्रणात ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी मला करता आली. असंसर्गजन्य व्याधींवर काम करण्यात विशेष रु ची निर्माण झाली. संशोधनाचं काम कसं चालतं तेही काही प्रमाणत ‘सर्च’मध्ये मला शिकता आलं. नंतर काही पारिवारिक जबाबदाऱ्यांमुळे मला माझ्या गावी परत जावं लागलं. ‘सर्च’मधील कामाच्या अनुभवाची पूर्ण शिदोरी व सेवाभाव घेऊन मी गावाकडे परत आलो.वर्षभर खेडोपाडी काम केल्यामुळे गावी आल्यावर असंसर्गजन्य व्याधींवरच अधिक काम करायचं मी ठरवलं. सध्याची ती मोठी गरजही आहे. जागतिक आरोग्य संघटनेचंही तेच म्हणणं आहे. त्याची सुरुवात म्हणून मी जळगाव व अंतुर्ली येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू केला. माझं शिक्षण आयुर्वेदात झालं असल्यानं आयुर्वेदाच्या माध्यमातून मला अधिक प्रभावीपणे काम करता येणार होतं. अंतुर्ली व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या दृष्टीने मी काम सुरू केलं आहे. रु ग्ण उपचारासोबत संशोधनाची जोड या कामाला दिली आहे. सूर्यकन्या तापिकेश्वर बहुद्देशीय ट्रस्टच्या माध्यमातून गावोगावी आरोग्यविषयक शिबिरं व आरोग्य शिक्षणासाठी व्याख्यानंही घेतो आहे. ‘सर्च’मध्ये राहून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला कळली, व्याधींवर नुसता उपचार करून आपली जबाबदारी संपत नाही, तर ते होऊ नयेत म्हणून काय करायला हवं हे सांगणंसुद्धा आपलं परमकर्तव्य आहे. त्यादृष्टीनेसुद्धा मी काम सुरू केलं आहे. आपल्यासोबत आपलं वातावरणही निरोगी असावं यादृष्टीनंही आम्ही काम करीत आहोत. त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं. आपण जे अन्न खातो त्याचासुद्धा आपल्या आरोग्यावर चांगला/वाईट परिणाम होतच असतो. ‘निर्माणचा माझा मित्र मंदार देशपांडे यादृष्टीने सेंद्रिय शेतीवर काम करतो आहे. त्याच्या मदतीने आम्ही घरच्या शेतात सेंद्रिय धान्य पिकवतो आहे. सेंद्रिय अन्नधान्याचा प्रचार, प्रसार करण्याचं काम हाती घेतलं आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागात काम करणं खूपच आव्हानात्मक होतं. पण यापेक्षाही मोठी आव्हानं आपल्यासमोर आहेत हे मला आज कळतंय. त्याविरुद्ध लढण्याची ताकदसुद्धा मला वर्षभर खेड्यापाड्यांत घेतलेल्या अनुभवातून मिळते आहे. ‘निर्माण’मधून घेतलेलं सत्कार्याचं/सेवेचं प्रकाशबीज मी आता इकडे, माझ्या गावी, माझ्या परिसरात रुजवण्याचा, चांगल्या बदलाची वाट रूळवण्याचा प्रयत्न करतो आहे. (वर्षभर खेड्यापाड्यांत आरोग्यसेवेचं काम केलेला भूषण डॉक्टर झाल्यावरही आपल्या ‘मातीत’च काम करण्याला प्राधान्य देतो आहे.)