- धनंजय वाखारे
कमरेला अडकवलेल्या ढोलच्या पानावर हातातील टिपरूनं बेभान होऊन वाजवणारी सोनाली.लग्न झालं, सासरी गेली पण तरीही न चुकता गणेशोत्सवात ढोलवादनासाठी ती येते. सासरचेही तिला या छंदासाठी प्रोत्साहन देत असतात. तिच्यातील तो उत्साह, ऊर्जा पाहिल्यानंतर सोनालीला विचारलं, ‘कसं जमतं हे तुला?’ ती पटकन म्हणाली, ‘आपली भाषा-आपली नशा, फक्त ढोल-ताशा’!ढोलवादनाची ही खाजच नव्हे तर त्यासाठी अंगात माजही असावा लागतो हे नाशिक ढोल वेडय़ा तरुणतरुणींना भेटलं की खरं वाटायला लागतं. ‘नाशिक ढोल’चं हे गारुड तरुणाईमध्ये इतकं भिनलं आहे की, ढोलवादनाची कला आत्मसात करण्यासाठी अनेक उत्साही दरवर्षी सरावाला येतात. पुन्हा ही कला शिकायची तर कसल्याही डोनेशनची गरज नाही ना कसल्या पात्रतेची. गणेशोत्सवाची चाहूल लागली की, महिना-दीड महिना अगोदरपासूनच सुरू होतो तो ढोलवादनाचा सराव. दिवसभर आपला व्यवसाय-नोकरी-घरकाम सांभाळून तरुण-तरुणींसह अनेक तरुण उत्साही विवाहितही सरावाला हजर होतात. दिवसभरच्या श्रमानंतर शिणलेल्या चेहर्यांवर ओसंडून वाहणारा उत्साह, उजळपणा ‘नाशिक ढोल’च्या तालाची अधिक रंगत वाढवत नेतो.नाशिक ढोल हा शब्द आताशा भारतभर गाजतोय, स्थानिक पारंपरिक वादनाऐवजी अगदी केरळ, तामिळनाडूतही नाशिक ढोल विविध धार्मिक कार्यक्रमप्रसंगी वाजवले जाऊ लागलेत. ढोल पथकं तर महाराष्ट्राला नवीन नाहीतच. आताशा सगळीकडेच ढोलवादनाचा आणि त्या सरावाला बोलबाला दिसतो. पुण्यात तर काही कार्पोरेट कंपन्याही आपल्या सहकार्यांना टीम बिल्डिंगचा आणि स्ट्रेज रिलिजचा भाग म्हणून या वादनात सहभागी व्हायला प्रोत्साहन देऊ लागल्याच्या बातम्या आहेत.मात्र या सार्यात ढोल वाजण्यातही ‘नाशिक ढोल’ची नजाकत, वेगळेपण म्हणजे ताल ! नाशिक ढोलमध्ये ढोलवादनातील सिन्क्रोनायझेशन अर्थात वाद्यातील समन्वय आणि लय ज्या अचूकतेने राखली जाते, तेच त्याच्या लोकप्रियतेचं गमक आहे. ढोल या चर्मवाद्याचं मूळ पर्शियन संस्कृतीत असलं तरी, त्याची नाळ शिवकाळापासून महाराष्ट्राशी घट्ट जुळलेली आहे. मावळढोल, रणवाद्यं अशी त्याची निरनिराळी रूपे असली तरी, गेल्या पाच दशकांपासून ‘नाशिक ढोल’ने निर्माण केलेलं साम्राज्य आश्चर्यकारक आहे. आता सोशल मीडियाला सरावलेल्या पिढीमुळे ‘नाशिक ढोल’चा नाद देशाच्या सीमा कधीच ओलांडून गेला आहे.
*****
गणेशोत्सवात सहभागी होणार्या ढोल पथकांकडून केवळ ढोलवादनावरच नव्हे तर वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरदेखील प्रबोधनावर भर दिला जात आहे. एकप्रकारे ही ढोल पथकं आता सामाजिक चळवळही बनू पाहत आहे. ढोल पथकात मुलं-मुली स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. अनेक पथकांत त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन दिलं जात नाही अथवा प्रवेशशुल्कही आकारलं जात नाही. मात्र आता प्रायोजक तसेच विविध संस्था-मंडळांकडून मिळणार्या बिदागीचा पैसा मग जातो कुठे, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो.परंतु, बर्याच ढोल पथकांकडून पथकातील सहभागी सदस्यांसाठी आरोग्य शिबिरे, सहलींचे आयोजन केलं जातं. महिला व मुलींना आत्मसंरक्षणासाठी मर्दानी खेळ म्हणजेच दांडपट्टा, लाठी-काठी, चक्री, तलवारबाजी यांसारख्या खेळांचेही प्रशिक्षण दिलं जातं. त्यासाठी खास प्रशिक्षक मागविले जातात. ढोल खरेदीसाठीही मोठा खर्च येतो. त्याचीही अशाच प्रकारे जमवाजमव केली जाते.
**
‘नाशिक ढोल’च्या जन्मकथेबाबत ठोस पुरावे हाती नसले तरी मुस्लीम समाजातील अन्सार बांधवांकडून ही परंपरा किंवा वादन आल्याचं सांगितलं जातं. डबे वादन करता करता ढोल गळ्यात अडकले गेले आणि ढोलवादन ही अन्सार समाजाची ओळख बनली. यातूनच ढोल पथक उदयास आलं आणि 1969च्या सुमारास त्याची सुरुवात साध्या पद्धतीने झाली. नाशकात ढोल पथक उभे करण्याचे श्रेय जातं ते काजी गुलाबखान यांच्याकडे. पुढे ‘बडे ढोलवाले’ हीच त्यांची ओळख सर्वत्र पसरली. काजी गुलाबखान यांनी ढोलवादनाला जोड दिली ती साहसी खेळांची. त्यामुळे, ढोलवादनाबरोबरच मानवी मनोरे रचून होणारे साहसी खेळ लक्षवेधी ठरू लागले. ‘नाशिक ढोल’चा एक वेगळा बाज आहे, ताल आहे. त्याच्या वैशिष्टय़पूर्ण वादनामुळेच तो लोकप्रिय ठरत गेला. नाशिक ढोलमध्ये पारंपरिक पद्धतीने वाजवल्या जाणार्या कावडी, घोडा, धमाल, राम-लखन यासारख्या वैविध्यपूर्ण ताल प्रकारांवर ठेका धरल्याशिवाय, कुठल्याही उत्सवाची मिरवणूक पूर्ण होऊच शकत नाही, इतकी भुरळ नाशिक ढोलने पाडली आहे.
आजवर वेगवेगळ्या रेकॉर्ड बुकमध्येही नाशिकच्या ढोल पथकांची नोंद झालेली आहे. नाशिकच्याच शिवराय ढोल पथकाने स्थानिक कलागुणांना वाव मिळावा, आपल्या संस्कृतीची जोपासना व्हावी आणि जीवनाचा अर्थ सांगणार्या वेगवेगळ्या ोकांचे महत्त्व आजच्या पिढीला कळावे यासाठी ‘एक ताल, एक ोक’ असा अभिनव प्रयोग गेल्यावर्षी सादर केला होता. त्यात तब्बल 51 प्रकारच्या कलांचे सादरीकरण झालं होतं. त्यामुळेच या उपक्रमाची नोंद जीनिअस बुक, एशिया बुक व वल्र्ड रेकॉर्ड बुक इंडिया व वंडर बुक ऑफ लंडन यामध्ये झालेली आहे. ‘नाशिक ढोल’च्या सीडींना तर मोठी मागणी असते.
**
ढोल पथक तयार करणं ही खर्चिक बाब आहे. एकेका ढोल पथकात 250 ते 300 सदस्यांचा सहभाग असतो. गणेशोत्सवाच्या पूर्वी दीड ते दोन महिने अगोदर ढोलवादनाचा सराव केला जातो. दिवस मावळतीला आल्यानंतर रोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ढोलवादनाचा सराव होतो; परंतु अलीकडे शहरांमध्ये वाढत चाललेली ढोल पथकांची संख्या पाहता त्यांना सरावासाठी लागणार्या जागेचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावतो आहे. उत्सवाच्या मिरवणुकीत ढोलवादनाचे कौतुक होते; परंतु सलग दोन महिने सरावाच्यावेळी होणार्या वादनाला बरेचदा आसपासच्या रहिवाशांकडून विरोधाचाही सामना पथकांना करावा लागतो. त्यामुळे गावाबाहेरच्या मोकळ्या जागांवर ही ढोल पथके सराव करताना दिसून येतात. बव्हुंशी ढोल पथकांचे कमर्शिअलायझेशन झालेले आहे. बिदागी नव्हे तर ढोलवादनासाठी सुपारी घेण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. कोणत्या मिरवणुकीत वादन करायचं आहे, मिरवणुकीसाठी लागणारा वेळ, मिरवणुकीचे अंतर याचा विचार करून ढोल पथकांतील तरुणांची संख्या, ढोलची संख्या यावर सुपारी निश्चित केली जाते. त्यातून पथकातील सहभागी वादकांना उत्सवकाळात चार पैशांची कमाई होत असते.
(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)