- जिग्नेश शांताराम महाजन
लासुर. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं चोपडा तालूक्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं हे गाव. सातवीपर्यंत गावातच शिकलो. पुढं जरा मोठ्या गावात शिकावं असं मनात होतं. चोपड्याला प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण मुख्याध्यापक सांगत शाळेत जागाच नाही. तेव्हाच ठरवलं या जगात स्वत:साठी जागा तयार करायचीच.
खुप मेहनत करून मी दहावीच्या परीक्षेत ९६.५५ टक्के मिळवले. अकरावीला विज्ञान शाखेला कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, चोपडा इथं प्रवेश घेतला. बारावीला विज्ञान शाखेत दोन्ही ग्रुप ठेवुन ९०.३३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आलो. प्रश्न होताच इंजिनिअरींग की मेडिकल? शेवटी मी इंजिनिअरींगला मुंबई येथील आय.सी.टी. (इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी) येथे प्रवेश घेतला. त्याठिकाणी प्रथम वर्षापासुन पहिला क्रमांक मिळवत होतोच. माझी गुणवत्ता पाहुन मग महाविद्यालयाने प्लेसमेण्ट कोऑर्डिनेटर म्हणुन माझी नेमणुक केली. बी. टेक. (टेक्सटाईल) प्रथम क्रमांक तर मिळालाच पण सूवर्णपदकही मिळालं. राज्यपाल विद्यासागरराव यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं तो दिवस माझ्या जीवनात अविस्मरणीय आहे.
बीटेकनंतर मला अहमदाबादला जॉब मिळाला. परंतु आयआयटी दिल्लीला एमटेक करण्याचा मी निर्णय घेतला. तिथंही पहिल्या वर्षी मी पहिलाच आलो. इथंही गुणवत्ता पाहुन व मुलाखत घेऊन माझी प्लेसमेण्ट कोऑर्डिनटर म्हणून नेमणूक घाली. आता एमटेक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मी परदेशात जायचं ठरवलं आहे. या साºया प्रवासात माझे आई-वडील, भाऊ-वहिनी, मामा-मामी, माझे शिक्षक हे सारे सोबत आहेत. पहिलं येत आपली गुणवत्ता सिद्ध करत राहण्याचा प्रवास मी सुरुच ठेवणार आहे..
(सध्या दिल्ली आयआयटीत एमटेक करत आहे.)