- अनिल भापकर
आपण एवढे फोटो काढतो, व्हिडीओ शूट करतो, साऱ्या आठवणी डिजिटल रूपात साठवून ठेवतो. आपल्या माणसांना असं ‘लाइव्ह’ स्वत:जवळ ठेवतो. पण ‘मेमरी’ संपते त्याचं काय?
हे सारं स्टोअरेज करायचं कुठं? आणि उडालंच की हळहळत बसण्याशिवाय दुसरं काही हातात नसतंच. त्यावर पर्याय काय?
एसएसडी अर्थात सॉलिड स्टेट ड्राइव्ह. ज्याकडे भविष्यातील स्टोअरेजचे नवीन माध्यम म्हणून सगळे जग बघत आहे.
एसएसडी म्हणजे काय?
एसएसडी अर्थात सॉलिड स्टेट ड्राइव्ह. हे फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानावर काम करतं. मेमरी चीप यात डेटा स्टोअरेजसाठी वापरल्या जातात. त्यामुळे एसएसडी असलेला लॅपटॉप काही सेकंदात बूट होतो, तर त्याच क्षमतेच्या हार्ड डिस्क असलेल्या लॅपटॉपला बूट होण्यास काही मिनिटे लागतात. त्याचप्रमाणे एसएसडी लॅपटॉपवरील अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरसुद्धा तुलनेने फास्ट काम करतात. ज्या ठिकाणी स्पीड महत्त्वाचा असतो अशी मंडळी हल्ली एसएसडी वापरण्यावर भर देताना दिसत आहेत.
एसएसडी ही हार्ड डिस्कच्या तुलनेत जास्त वर्षे टिकते कारण एसएसडीमध्ये कुठलेही मूव्हिंग पार्ट नसतात. हार्ड डिस्कमध्ये प्लॅटरवरील डेटा रीड करण्यासाठी स्प्लिंडल आणि प्लॅटरला फिरविण्यासाठी छोटी मोटर वापरली जाते. काही कारणास्तव किंवा हार्ड डिस्कला जोराचा धक्का बसला तर ही मोटर खराब होऊ शकते. पर्यायाने हार्ड डिस्क खराब होते. असा कुठलाही धोका एसएसडीमध्ये नसतो.
हार्ड डिस्कमध्ये प्लॅटरवरील डेटा रीड करण्यासाठी स्प्लिंडल आणि प्लॅटरला फिरविण्यासाठी छोटी मोटर वापरली जाते. त्यामुळे हार्ड डिस्क ची साइज (जाडी) एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी करता येत नाही. मात्र याउलट एसएसडीमध्ये मेमरी चीप या डेटा स्टोअरेजसाठी वापरल्या जातात, त्यामुळे दिवसेंदिवस एसएसडीची साइज अधिक कमी कमी होत चालली आहे. आजघडीला एसएसडीची किंमत हार्ड डिस्कपेक्षा निश्चितच जास्त आहे; मात्र जसजसा एसएसडीचा वापर वाढेल, तसतशी एसएसडीची किंमत कमी होईल, यात काही शंका नाही.