- श्रुती साठे
साडी.. वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या चालत आलेला, प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळचा प्रकार ! साडी नेसायची म्हटलं की त्याबरोबर ब्लाऊज, परकर, निऱ्या, पदर हे शब्द ओघाने आलेच ! हल्ली क्वचित कधीतरी साडी नेसणं होतं, त्यामुळे तेचतेच नेहमीचं ब्लाऊजचं डिझाईन, तीच काठापदराची सिल्क साडी या प्रकाराला थोडा ब्रेक द्या आणि करिना कपूर, शिल्पा शेट्टीने निवडलेला साडीचा लूक करून पहा.
काळी साडी, थ्री फोर्थ टॉप!करिनाने नेसलेली रॉ सिल्कमधली काळ्या रंगाची साडी- साधी आणि नेहमीची दिसली तरी वेगळ्या प्रकारच्या ब्लाऊजमुळे एक वेगळा लूक आला. नेहमीचा मोठा गळा, एम्ब्रॉयडरी, स्लिव्हलेस अशा ब्लाऊज्ना बगल देत तिने थ्री फोर्थ बाह्या आणि पुढे नॉट असलेल्या काळ्या रंगाच्या ब्लाऊज/टॉपला पसंती दिली. गुलाबी आणि लाल रंगाची पट्टी असेलली प्लेन काळी साडी या वेगळ्या प्रकारच्या ब्लाऊजमुळे खुलून दिसली. नेहमीच्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज स्टाइलला ब्रेक देत तुम्हीपण असा ब्लाऊज प्रकार करून पहा!
बिनापरकराची साडीकल्पना छान वाटते ना? नुकताच शिल्पाचा अगदी नवीन आणि वेगळाच साडी प्रकार पहायला मिळाला. आपल्याकडच्या नऊवारी साडीचा पायावर कसा फॉल दिसतो, अगदी तशाच फॉलचा; पण शिवलेला पायजमा आणि त्याला मॅचिंग ब्लाउज आणि त्यावर प्लेन पदर ! शिल्पाने त्यावर केलेली हेअरस्टाइल, मेक अप, वापरलेले झुमके या मॉडर्न साडीला अगदी साजेसे होते.तरु ण मुलींनी कॉलेजच्या ट्रॅडिशनल डेला किंवा अॅन्युअल डेला नक्की ट्राय करून पहावा, असा हा प्रकार आहे.
(लेखिका फॅशन डिझायनर आहेत.)