चलता है रे, जरा गंमत असं म्हणत स्वत:सह इतरांनाच कॅज्युअली घेणारा एक विचित्र ट्रेण्ड
गेले अनेक दिवस स्मार्ट फोन हातात आल्यानंतर आपलं जगणं कसं बदललंय याविषयी आपण चर्चा करतो आहोत.
आणि त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे वेगवेगळे ग्रुप्स, फेसबुकवरचे आणि व्हॉट्सअॅपवरचे. दोन माणसं एकत्र आले की तीन ग्रुप्स करतात अशी त:हा आताशा दिसू लागली आहे.
आपल्यापैकी अनेकजणही वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये असतीलच. काही ग्रुप्समध्ये आपण स्वत:हून सामील झालेलो असतो तर काही ग्रुप्समध्ये कुणीतरी आपल्याला यायला भाग पडलेलं असतं. कधीतरी सहज स्वत:ला हा प्रश्न विचारून बघितला पाहिजे की मी या अमुक ग्रुपमध्ये का आहे?
अर्थात असे अवघड प्रश्न आपण इतरांना विचारू शकतो, स्वत:ला असे प्रश्न विचारून कोण कशाला त्रस करून घेईल?
पण खरंच आपण व्हॉट्सअॅपवर ढीगभर ग्रुप्समध्ये असतो, पण आपण त्या ग्रुपमध्ये का असतो?
कदाचित तो आपल्या नव्या, जुन्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप्स असतो, नातेवाइकांचा असतो, व्यावसायिक सहका:यांचा असतो किंवा हल्ली अजून एक प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे एका विचारधारेचे लोक एकत्र येऊन ग्रुप बनवतात. काही ग्रुप्स हे वैचारिक देवाणघेवाणीसाठीही बनवले जातात. सुरु वातीला सगळेच जण ग्रुपचे वेगळेपण टिकवण्यासाठी धडपडत असत; पण हळूहळू लक्षात येतं की त्याही ग्रुप्सना हळूहळू एकप्रकारचा सपकपणा यायला लागतो. वैचारिक देवाणघेवाणीचा किंवा एकमेकांशी कनेक्टेड राहण्याचा उद्देश संपून ग्रुपवर प्रामुख्याने दोन घडामोडी घडायला लागतात. एकतर स्तुतिपाठकांची संख्या प्रचंड बळावते. तू किती छान, मी किती छान, आपण सगळे किती छान छान या छापाच्या गप्पांना सुरुवात होते. दुसरं म्हणजे फॉरवर्ड शिवाय इतर काहीही अनेक ग्रुपमध्ये घडत नाही. आला मेसेज की कर फॉरवर्ड, याची एक धुंदी बहुतेक ग्रुपच्या सदस्यांवर चढते.
आणि अनेकदा जे फॉरवर्डस येतात, त्यातील मजकुराचा कसलाही विचार न करता किंवा त्यातील मजकूर खरा आहे की नाही याची काही शहानिशा न करता, फक्त फॉरवर्ड करण्यावरच भर दिला जातो.
आपण जे पुढे पाठवतो आहोत त्याला आपण जबाबदार आहोत हेच अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे पाचकळ जोक पुढे पाठवावा तसे फॉरवर्ड मारले जातात.
अगदी क्वचित असे ग्रुप्स असतात जिथं फॉरवर्डला बंदी असते. त्या ग्रुपचे सदस्य नो फॉरवर्ड हा नियम कटाक्षानं पाळतातही. पण हे अपवाद आहेत, बाकी सगळीकडे दे मार फॉरवर्डच काम चालतं! आणि त्यातून मिळतो तो केवळ आपण ‘अॅक्टिव्ह’ आहोत याचा पोकळ आनंद!
आणि यासा:यात एक गोष्ट हमखास घडते. फॉरवर्ड पाठवण्यात आणि कुठल्या ग्रुपवर काय चालू आहे हे बघण्यातच आपला पुष्कळ वेळ वाया जातो. पण यात एक वर्ग तर असाही असतो की जो अनेक ग्रुपवर असतो. पण तो बोलत काही नाही, फॉरवर्ड मारत नाही. अजिबात अॅक्टिव्ह नसतात, त्याची त्यांची म्हणून कारण असतात; पण ते काही बोलत नाहीत, मताच्या पिंका टाकत नाही म्हणजे त्यांचा वेळ जात नाही असं मुळीच नाही. उलट आलेले मेसेजेस वाचण्यात, कोण काय म्हणतंय याचे अर्थ लावण्यातही त्यांचा भरपूर वेळ वाया जातो. आणि त्यातून ते डोक्याला ताप करून घेतात तो वेगळाच.
हे सारं घडत असताना आपल्याही नकळत एक गोष्ट आपल्या अंगवळणी पडते आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. यासा:यातून एक वैचारिक सहजता, किंवा ‘चलता है’ असा अॅटिटय़ूड तयार होतो. जो अत्यंत हानिकारक असतो. एखादा मेसेज चुकीचा टाकला गेला तर टाकणा:याला आपण चुकलोय हे लक्षातच येत नाही. त्याची प्रतिक्रि या असते, ‘ठिकेना, इतकं काय? चलता है’।
हे ‘इतकं काय, चलता है, त्यात काय, अशी वृत्ती बळावली की योग्य आणि ख:या माहितीचा आग्रह हळूहळू संपत जातो. आणि एक कॅज्युअल अॅप्रोच घेऊन जो तो वावरू लागतो.
आणि मग ज्या साधनांचा, ग्रुपचा उत्तम वापर करता यायला हवा, ते साधनच डोक्याला ताप बनत अनेकांच्या आयुष्यात केवळ ‘न्युसन्स’ म्हणजेच वैताग ठरू लागतो..
तुम्ही कुठल्या ग्रुपमधले?
सोशल मीडियावरच्या विविध ग्रुप्समधून वेगवेगळी व्यक्तिमत्त्व बघायला मिळतात. ही माणसं प्रत्यक्ष आयुष्यात अशी असतीलच असं नाही पण सोशल मीडियावरच्या आभासी जगात या माणसांच्या काही वृत्ती दिसतात. त्यापैकी तुमची कॅटेगरी कोणती, हे तुम्हीच ठरवा.
कुणीतरी खांदा द्या हो..
या कॅटेगरीतले लोक सतत रडत असतात. त्यांना कशानेच छान वाटत नाही. सतत कुरकुर करणारे असतात. आणि त्यांच्या या दु:खी असण्याला अंजारणारे गोंजारणारे मिळाले की मग त्यांच्या रडराडीला प्रचंड ऊत येतो.
अटेन्शन सिकर्स
काही लोकांना कुठल्याही परिस्थितीत ग्रुपमध्ये मध्यवर्ती राहायचं असत. काहीही झालं तरी लोकांनी आपल्याशी बोललं पाहिजे, आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्याला मिस केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यासाठी ते ग्रुपवर काय वाट्टेल ते चाळे करत राहतात.
आम्ही दीडशहाणो
काही लोक उगाचच वाद घालणारे, दुस:यांना सतत कमी लेखून आपण किती भारी आहोत, किती अपडेट आहोत हे दाखवणारे असतात. त्याच्या स्वत:विषयी अद्भुत कल्पना असतात. आणि दुस:या कुणी त्यांना काही सांगितलेलं, त्यांच्यावर टीका केलेली त्यांना खपत नाही. आवडतही नाही.
शोशागिरकर
काही लोकांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शो करायला आवडतं. यातही आज कुठे गेलो, काय खाल्लं, कुठला सिनेमा बघितला, ही गाडी, ती शॉपिंग. प्रत्येक गोष्टीचा शो ऑफ करण्यात रस असतो. मी किती भारी, तुम्ही काहीच नाही असाच एकूण त्यांचा टोन.
काठावरून जाणारे हौशी
ग्रुपमधल्या गप्पांमध्ये सामील न होता, चाललेल्या गप्पा नुसत्या वाचत लांबून गंमत बघणारेही काही लोक असतात. त्यांना कशातच सहभाग घ्यायला आवडत नाही; पण ग्रुपवर कुणीही काहीही टाकलं तरी सगळ्यात पहिल्यांदा हेच वाचत असतात.
गंमत करूवाले
इतरांची खिल्ली उडवणो, चेष्टा करणो, चिमटे काढणो, खोचक तिरकं बोलणं याच गोष्टी अजेंडय़ावर असलेले काही असतात. ग्रुपमध्ये येण्याचा, थांबण्याचा त्यांचा एकाच उद्देश असतो, तो म्हणजे सतत कुणाला तरी टार्गेट करत खिल्ली उडवत राहणं आणि त्यातून मजा घेणं. या लोकांना दुस:याच्या भावनांशी काहीही घेणं-देणं नसतं. यांचं आपलं एकच, गंमत केली रे!
- मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)