- दीपिका वाघ
बॉलिवूड-हॉलिवूडमध्ये किती बिग बजेट सिनेमे बनवले जातात. महागडे सेट्स, व्हीएफएक्स वापरून, देश-परदेशात शूटिंग करून रंजक दृश्यं आपल्याला मोठय़ा स्क्रीनवर बघायला मिळतात.पण नायजेरियातील तरु णांना भेटा. तिकडे मागास म्हणवणार्या नायजेरियातल्या नॉलिवूडमध्ये काही तरुण आपल्या हातातल्या साध्या तुटक्या- फुटक्या स्मार्टफोनवर सायफाय फिल्म्स बनवत आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या फिल्म्सची ऑनलाइन जगात प्रचंड प्रशंसा होते आहे. नायजेरियाच्या उत्तर पश्चिम भागातील कदुना राज्यातील गॉडविन जोसिया (वय-19) आणि त्याची चुलत भावंडं मिळून सायफाय प्रकारच्या शॉर्ट फिल्म्स बनवतात. सायफाय फिल्म म्हणजे सायन्स फिक्शन फिल्म. या फिल्म्स ते साध्या स्मार्टफोनवर तयार करतात. आजकाल सायफाय फिल्म्स या अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून तयार केल्या जातात; पण या मुलांनी बनवलेल्या फिल्म्स या दररोजच्या वस्तूंचा वापर करून केलेल्या असतात. तुटलेल्या मायक्र ोफोन स्टॅण्डपासून ते ट्रायपॉड बनवतात आणि ते शूटिंगला वापरतात. मागील बाजूस हिरव्या रंगाचे कापड टाकतात. एक ब्लोअरद्वारे हवा निर्माण केली जाते. ज्यामुळे कलाकार हवेतून उड्डाण करू शकतो. शिवाय स्पेशल इफेक्ट्स मिळवण्यासाठी यू-टय़ूब वरच्या अगणित व्हिडीओजची ते मदतही घेतात. त्यांच्यासाठी यू-टय़ूब हीच पाठशाळा आहे. भन्नाट शक्कल काढून ते या सायफाय फिल्म्स बनवतात. गॉडविन म्हणतो की, सोशल मीडियावर फेमस होणं हा आमचा हेतू नव्हता. कदुनामधील मुलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सर्व सर्वांनी बघावं हेच आमचं मुख्य उदिष्ट होतं. हे सर्व अचानक घडलं. आम्हाला वाटलं नव्हतं की लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल.’ दहा मिनिटांच्या त्यांच्या 20 शॉर्ट फिल्म्स या सुपर हिरो, एलियन आणि अलौकिक शक्तींबद्दल आहेत. फिल्म रेकॉर्ड करून ती एडीट करून त्याला स्पेशल इफेक्ट्स देऊन ती अपलोड केली जाते. त्यांच्या ग्रुपमधला रेमंड युसूफ सांगतो की, फिल्म बनवण्याची प्रोसेस खूप वेळखाऊ आहे. आमची पाच मिनिटांची चेस नावाची शॉर्ट फिल्म बनवायला आम्हाला दोन दिवस लागले होते. आमच्याकडे विजेची समस्या गंभीर आहे. न्यूज एजन्सी ऑफ नायजेरियानुसार, कदुना राज्याचे गव्हर्नर नासीर रु फाई यांनी या मुलांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या मुलांच्या ग्रुपमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा युसूफसुद्धा आहे. जो आता काही दिवसात माध्यमिक शाळेत प्रवेश घेईल. ही मुलं पैशांची बचत करून शूटिंगला लागणार्या हिरव्या कपडय़ाची खरेदी करतात. या मुलाचं काम बघून नॉलिवूड सिनेमाची निर्माती केमी अडेतीबा इतकी प्रभावित झाली की तिने जून महिन्यात या मुलांच्या कामाबद्दल ट्विट केलं होतं. हे ट्विट व्हायरल झाल्यावर त्यांना लोकांनी देणग्या दिल्या. त्यातून पाच हजार आठशे डॉलर्सची देणगी जमा झाली. यातून त्यांना मोठा सिनेमा बनवायचा आहे. त्यासाठी उपकरणांमध्ये सुधारणा करायची आहे. यापूर्वी असा सिनेमा कुणीही तयार केला नसेल असा सिनेमा त्यांना तयार करायचा आहे. त्यांना विश्वास आहे की असा सिनेमा ते लवकरच तयार करतील. त्यांचं काम या लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/D25NrAQZLng
(justrightcinema.com)