- श्रेणिक नरदे
मिशीला पीळ देत एखादा बोलतो, मूछ नही तो कुछ नही !
पूर्वी म्हटलं जायचं, ‘अरे तू काय धाडस करतो, हे करायला छातीवर केस लागतात.’
माणूस हा बऱ्यापैकी केसाळ प्राणी आहे; पण आता काय काय लोक खेळ करत असतात. त्यात हेअर स्टाइल तर भारी करतात लोक. डोक्यावरचे केस वाढले तर कापायला हवेत, एखाद्या कामाच्या ठिकाणाचीही मागणी असते की त्यात तुम्ही व्यवस्थित नीटनेटके दिसायला हवेत. त्यापद्धतीनं माणसाचं वर्तन असतं.
मात्र अलीकडे सोशल मीडियाच्या या युगात जग जवळ येत चाललंय. या नव्या जगात ‘ट्रेण्ड ’ या शब्दाभोवती अर्थकारण, राजकारण, सौंदर्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, खाद्यजगत फिरत असतं. मग राहतंय काय शिल्लक ? काहीच राहत नाही.
ज्याच्या हाती म्हणून मोबाइल आहे, ट्रेण्ड हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालाय. तुम्ही त्यात आपसूक ओढले जाता.
पूर्वी नटणंमुरडणं हे जे काही असायचं ते बायकांचं काम म्हणत, ब्यूटिफुल दिसायची दडपड. आता तिथं हॅण्डसम हंक हा शब्द रूळला, पाळला, पोसला गेला.
एकेकाळी फारतर डोक्याला तेल लावून भांग पाडणं हाच काय ते पुरुषाचा मेकअप होता. त्यातल्या त्यात सणवार आले किंवा एखाद्या समारंभाला जायचं झालं तर चकचकीत किंवा तुळतुळीत दाढी करायची ज्याला ‘क्लीन शेव’ म्हटलं जातं. या पलीकडे विशेष असं काही नव्हतं.
मात्र भारतातही गेल्या पाच-सहा वर्षात नोव्हेंबर महिना हा दाढी न करण्याचा महिना म्हणून ओळखला जाऊ लागलाय. आणि नोव्हेंबरच्या शेवटी #noshavenovember असे हॅशटॅग देऊन बरेच फोटो सोशल मीडियावर पडू लागलेत.
दहाएक वर्षांपूर्वी दाढीला तेल लावलं जातं, असं कुणी बोललं असतं तर लोक त्याला हसले असते; पण आता बिअर्ड ऑइल बाजारात उपलब्ध आहे.
मुळात केस हा प्रकार अजब आहे. एखाद्याला भरपूर दाढी असते तर एकेकाच्या गालावर जनावर गवताचं कुरण चरून गेल्यासारखी असते, काहींना दाढीच नसते. मग अशा लोकांना नोव्हेंबर हा महिना आपत्तीचा वाटतो. माणसाला आपल्याकडे एखादी गोष्ट नाही याचं मोठ्ठं दु:ख असतं. या दु:खावर बाजारपेठेने उपाय आणले आहेत, असा दावा होतो आणि माणूस तिकडे वळतो. दाढीला लावायचं तेलं, दाढीसाठी असणारी जेल, चेहऱ्यावरचे काळे डाग हटवणारी कोळसामिश्रित फेसवॉश अशी थोडथोडकी नाही तर हजारो रुपयांची खरेदी एखादी व्यक्ती करते. दहाजणातल्या पाचांना दाढीची तक्रार असतेच. या पाचातले दोघे तरी वेगवेगळे दाढीसंबंधित सामग्री खरेदी करून आपण देखणे दाढीवाले दिसू या प्रयत्नात असतात.
जगात लोकांना अनेक प्रकारचे तणाव असतात. त्या तणावात दाढीचा तणावही सामील झालाय हे मान्य करावं लागेल. दाढीधारी हॅण्डसम पोरांच्या फोटोवर डोळ्यातून बाहेर येणाऱ्या बदामाच्या इमोजीरूपी कमेण्ट पोस्ट करणाऱ्या मुली आपल्याही फोटोवर तशा रिॲक्ट होवोत अशी कुणाचीही इच्छा असते. पण मुळात दाढी कमी उगवते त्याला कोण काय करणार ?
गेल्या कित्येक वर्षात पावडर लावून किती मुली गोऱ्या झाल्या ? एखादीही झाली नसेल, मात्र पावडरचा खप कमी नाही, तो दिवसेंदिवस वाढत जातोय. पूर्वी एकाच डब्यात अख्खं कुटुंब पावडर लावायचं आता काही कंपन्यांनी दावा केला की गड्यांचं कातडं हे बायांच्या कातड्याहून निब्बार असतं. त्यामुळे आम्ही पुरषांसाठी आणि स्रियांसाठी वेगवेगळे क्रिम आणले. झालं आता प्रत्येकाचे पावडर डबे वेगळे झाले.
दाढीच्या निमित्तानं या महिन्यात कोट्यवधी पुुरुष विविध कलाकुसरी करतील, त्यातील ज्याला कमी दाढी आहे किंवा ज्याला दाढीच उगत नाही असे लोक विविध उपायांसाठी बाजाराला धडका देतील.
आता आहे की नाही कल्पना नाही मात्र काही दिवसात डोक्यावरच्या केसांचं जसं केशरोपण होतं तसंच दाढीरोपणही होईल. दाढीचेही विग येतील. लोक त्यावरही तुटून पडून नकली दाढ्या चिकटवून घेऊन ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या हॅशटॅगखाली फोटो टाकतील आणि या फोटोवरही लोक लव्ह रिॲक्ट होतील.
एक काळ होता दाढी वाढवली कुणी तर लोक काळजी करत.
आता दाढी वाढवण्याच्या मागे येडे झाले लोक..
( श्रेणिक प्रगतिशील शेतकरी आहे.)
shreniknaradesn41@gmail.com