- राम शिनगारे
कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू झालं, मात्र ग्रामीण भागात या ऑनलाइन शिक्षणाच्या रेटय़ात तरुण मुलांचं आणि विशेषत: मुलींचंही शिक्षण सुटतं की काय असं भय आहेच. मोबाइल नाही म्हणून कुणी विद्याथ्र्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात, मात्र शिक्षणाचा हात सुटल्याने किंवा कायमचा सुटण्याचं भय असल्याने अनेकजण रोज तीळतीळ मरत आहेत, त्याची नोंद मात्र कुठं होणार नाही. शहरात शिकायला असलेले मुलं-मुली आपापल्या गावी लॉकडाऊन सुरू होताच परतले. पुढे परीक्षांचा घोळ आणि मग आता प्रवेशाचाही. कुठं ऑनलाइन वर्ग सुरूही झाले; पण त्यासाठीचा ‘कनेक्ट’ या मुलांचा कितीसा उरला आहे, हा प्रश्नच आहे.औरंगाबाद शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी आणि उच्चशिक्षण घेण्यासाठी मराठवाडय़ातील आठ जिल्हे, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह इतर जिल्ह्यातील हजारो युवक येतात. अनेकांच्या घरची परिस्थिती जेमतेम, हालाखीचेच दिवस पण त्या गरिबीतही हे युवक मोठं होण्याची स्वप्न उराशी बाळगून असतात. काहीजण विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतात. संशोधन करतात, तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या वाटचालीत एकजण यशस्वी झाला की गावी अनेकांना वाटू लागतं की त्याला जमलं तर मलाही जमेल.
पण स्पर्धा परीक्षांची तयारी करणा:या युवकांना गावात कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. अभ्यासाची साधनं शहरात राहिल्यामुळे अनेकांच्या अभ्यासात खंड पडला आहे. यात कोरोनामुळे राज्य शासनाने अनिश्चित कालावधीसाठी नोकरभरती थांबवलेली आहे. अगोदरच अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश मिळत नव्हते. यात गावी परतल्यामुळे पुन्हा शहरात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, हा आत्मविश्वासच या युवकांमध्ये उरलेला नाही. घरातील आर्थिक आडचणी, त्यात न मिळणारे यश, शासनाचं धोरण, आरक्षणाच्या बाबतीत निर्माण होणारे वाद या सर्व कटकटीला कंटाळून अनेकजणांना वाटू लागलंय की आता शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीला कायमचा रामरामच ठोकलेला बरा. गावीच काही मोलमजुरी करून पोट भरायला लागणं उत्तम. पालकांच्या हाती पैसा नाही तर शहरात राहाणार कुठं, खाणार काय, हात तंग झाले त्यामुळे गावीच थांबण्याशिवाय पर्याय नाही. तरीही हाताशी वेळ आहे तर काही तरुणांनी व्यायाम करत तालुका, जिल्हास्तरावर पोलीस भरतीची तयारी सुरू केल्याचं दिसतं. गावागावातील युवक पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुक्याला आले आहेत. ***बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या आदिवासी समाजातील युवक श्यामराव रुद्रे.तो सांगतो, आणखी किती दिवस अभ्यास करायचा? आधीच जागा निघत नाही. निघाल्या तर त्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा असतात. मीही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. त्यात संधी मिळाली नाही. एम.ए. मराठी केलं. प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली सेट परीक्षा उत्तीर्ण झालो; पण प्राध्यापकाची नोकरी कुठे आहे? ती लागणार असेल तर संस्थाचालकाला देण्यासाठी लाखो रुपये कुठून आणावेत? काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या ठिकाणी एलआयसी प्रतिनिधी होण्यासाठी परीक्षा झाली होती. ती उत्तीर्ण झालो. त्यामुळे एलआयसी पॉलिसीज गोळा करत करत, थोडीफार असलेली शेती करून दुधाचा व्यवसाय करतोय. त्यात कष्ट केले तर चार पैसे तरी मिळतील. किती दिवस शासनाचा निर्णय आणि नोकरीच्या जागा निघतील म्हणून वाट पाहण्यात घालवणार, त्यापेक्षा आहे ते काम करावं गावात!’***हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुकचा युवक परमेश्वर इंगोले. औरंगाबादेत शिक्षक पात्रता परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी तो करत होता. राज्यात शिक्षक भरतीसाठी डी.एड.बी.एड. बेरोजगारांचे संघटन निर्माण करत लढा दिला. यातून शिक्षक भरती झाली; पण त्यात परमेश्वरला संधी मिळाली नाही. तो सांगतो,‘ गावाकडे सहा महिन्यांपासून शेतीची कामे करतो. नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे राजकारणात प्रवेश करावा असं मनात येतं; पण माङयासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाची तिथं काही डाळ शिजणार नाही याची मला कल्पना आहे. त्यामुळे आता सगळं सोडून देऊन चपला-बुटासारखा छोटेखानी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतोय.’***उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील विजोरा गावचा युवक बालाजी मुळीक. हा मागील पाच वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्र विभागात पीएच.डी.चे संशोधन करत होता. सेट, नेट, जेआरएफ या परीक्षा उत्तीर्ण आहे. मागील सहा महिन्यात त्यानं शेतातील सर्व कामे केली. तो म्हणतो, लॉकडाऊन उठल्यामुळे आता पीएच.डी.ची मौखिक परीक्षा होईल; परंतु प्राध्यापक होण्याची सर्व प्रकारची पात्रता असताना नोकरभरतीवर मागील अनेक वर्षापासून बंदी आहे. संस्थाचालकांना देण्यासाठी पैसे नाहीत. वयाच्या 35 वर्षार्पयत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. आता कंपन्यांत नोकरी शोधतो. आई-वडिलांच्या अपेक्षा फार होत्या की एवढं शिकून मुलगा काहीतरी भारी करील; पण आता परिस्थितीशी नवाच झगडा समोर आहे.’ ***राज्यभरात महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी सर्वात अगोदर आवाज उठवत मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणारा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातल्या घोगस पारगावचा शरद गरकळ. तो म्हणतो, ‘शासकीय नोकरीची आशा आहे सोडली आहे.’ त्याचं बी.ई. इलेक्ट्रिकल झालेलं असल्यामुळे त्यातील छोटी-मोठी व्यावसायिक कामं घेण्याचा तो प्रय} करतो आहे. शरद सांगतो, ‘ महापोर्टल बंद पाडून अनेक युवकांना न्याय मिळवून दिला. मात्र माझी निवड ज्या पदासाठी झाली होती ती पदभरती मंत्रलयीनबाबूंच्या दिरंगाईत अडकून पडली. यापुढं आता शासकीय नोकरी मिळण महाकठीण काम. अगोदरच अल्प नोकरभरती, त्यात जिवघेणी स्पर्धा, पदोपदी दिसणारा भ्रष्टाचार यापेक्षा खासगी कामं केलेलीच चांगली, असं शरद उदास होत सांगतो.***अशा किती कहाण्या. त्यातलं सूत्र एकच, नोकरीची आस आहे; पण आता शिक्षण सुटलं, खूप शिकूनही नोकरी नाही आणि शिक्षण सुरू ठेवावं तर पैसा नाही.कोरोनाकाळानं ग्रामीण तारुण्यासमोर असा मोठाच पेच निर्माण करून ठेवला आहे.
***
गावाकडे रेंज नाही, तर ऑनलाइन प्रेङोंटी लावणार कशी?
खेडय़ात जास्त हाल शाळकरी विद्यार्थी अर्थात बारावीर्पयतच्या मुला-मुलींचे होत आहेत. शाळेत जाणारी मुलं जनावरं चारण्यासाठी जाऊ लागली आहेत. बीड जिल्ह्यातील धारूर येथील शाळेत शिकणारी अदिती सतीश शिनगारे सांगते, वडिलांनी ऑनलाइन शिक्षणासाठीच मोबाइल विकत घेतला; पण गावात मोबाइलला बरी रेंज नाही. घराच्या एका कोप:यात थोडी रेंज येते. त्या ठिकाणी हात उंच करून मोबाइल धरला की तासाला उपस्थित राहाता येतं; पण त्यात रेंजचा सतत अडथळा. समजून घेण्यापेक्षा रेंजचंच अधिक टेन्शन असतं.’हा ऑनलाइन शिक्षणकाळ मुलींचं शिक्षण सोडवेल की काय अशी भीती आहेच.
(राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत शैक्षणिक वार्ताहर आहे.)