- सीमा महांगडे
‘तुम्ही असता कसे, यापेक्षा तुम्ही दिसता कसे,’ हे महत्त्वाचं असं सांगणारा हा काळ आहे. जो दिसेल तोच रु जेल ही संकल्पना जास्त प्रभावी ठरत आहे असंही म्हटलं जातं.पण आता चर्चा आहे, ती वेगळ्याच वेशभूषेची.उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या ड्रेसकोडमध्ये करण्यात आलेले बदल.!सध्या त्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर दीक्षांत समारंभाचा बदललेला पोशाख या कॅप्शनखाली फोटो व्हायरल झाला आणि मत-मतांतरे समोर आली. काहींनी या बदलावर नाराजी व्यक्त करत आपण दिवसेंदिवस मागे चाललो आहोत, असं मत व्यक्त केलं, तर काहींनी या बदलाचे स्वागत करत आपली संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न चांगला असल्याचं म्हटलं आहे.मात्र चर्चा तर आहेच विद्याथ्र्यामध्येही. दीक्षांत समारंभात कुठला पोशाख केला जाणार याविषयी अनेक तर्कही लावले जात आहेत. खरं तर पोशाख बदलणं हा सोयीचा भाग आहे. खरी चर्चा व्हायला हवी ती शिक्षण पद्धती , अभ्यासक्रम, गुणवत्ता यांची..! ती मात्न होत नाही आणि चर्चेत राहतो तो पोशाख/ड्रेसकोड. या आधीही पुणे विद्यापीठाने आपल्या पदवीदान समारंभाच्या पोशाखात बदल केला, ज्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या मोठय़ा वादाला प्रशासनाला सामोरे जावे लागले होते. मुंबई विद्यापीठात ड्रेसकोडवरून वाद झाला नसला तरी समाजमाध्यमांवर विविध जोक्स आणि मिम्सच्या माध्यमातून ड्रेसकोडची खिल्ली उडवली जातेय. थट्टाही केली जातेय.इंग्रज गेले मात्न आपली छाप सोडून गेले. या पाश्र्वभूमीवर शिक्षणाचे पूर्ण भारतीयीकरण व्हावं या उद्देशाने शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभाचे ड्रेसकोड बदलून त्यांना भारतीय साज येऊ लागला आहे. केंद्रीय मंत्नी नितीन गडकरी डिसेंबर 2018 मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला गेले होते. हा समारंभ बंदिस्त सभागृहात असल्याने त्यावेळी घातलेल्या कॉन्व्होकेशन गाउनमुळे त्यांना गुदमरल्यासारखे होऊन भोवळ आली होती. या घटनेनंतर दीक्षांत समारंभातील पोशाखाबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अनेक विद्यापीठांनी आपला दीक्षांत समारंभाचा पोशाख बदलला होता. त्यामुळे या सगळ्याच पाश्र्वभूमीवर आयआयटी कानपूरपासून ते अगदी मुंबई विद्यापीठार्पयत आता शैक्षणिक संस्थांनी याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्न फक्त वेशभूषेत किंवा ड्रेसकोडमध्ये बदल करून खरंच भारतीय शिक्षणाचा/ शिक्षण पद्धतीचा पाया भक्कम करता येणार आहे का, हा मूळ प्रश्न आहे. भारतीय परंपरा ड्रेसकोडच्या माध्यमातून जपताना या शैक्षणिक संस्था अभ्यासक्रमातील डिजिटलायझेशन, सुविधा, परीक्षांची सहज सुलभ पद्धती यावर कधी आणि कसा विचार करणार आहेत? भारतीय शैक्षणिक संस्थांनी ड्रेसकोडमधील इंग्रजी मानसिकता दूर करताना तेथील शिक्षण पद्धतीतील आधुनिकता स्वीकारण्यास काय हरकत आहे मग? का ते आधुनिकीकरण ही केवळ इंग्रजीतून आल्याने आपण झिडकारणार आहोत?मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन पोशाखाऐवजी शौर्याचे प्रतीक म्हणून शिवकालीन अंगरखा, सौंदर्य म्हणून पैठणीची बॉर्डर आणि विद्वत्ता म्हणून मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांची पगडी असा पोशाख दिसणार आहे. व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या निर्णयानुसार पोशाखासाठी खादीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी खादी ग्रामोद्योग येथून कापड खरेदी केले जाणार आहे. शिष्टाचारानुसार विविध रंगांचे पोशाख शिवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या विद्याथ्र्याच्या पोशाखात बदल झाला नसून हा झालेला बदल केवळ दीक्षांत समारंभाच्या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे, विद्यापीठाचे कुलगुरु, प्र- कुलगुरु, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अधिष्ठाता, वित्त व लेखा अधिकारी विविध प्राधिकरणांचे मान्यवर सदस्य यांच्या पुरताच मर्यादित आहे. सद्यर्स्थितीत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदकविजेते विद्यार्थी आणि पीएच.डी.प्राप्त विद्याथ्र्याना विद्याशाखानिहाय विविध रंगांचे सॅच देण्यात येतात. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मात्न या बदललेल्या ड्रेसकोडची चर्चा समाजमाध्यमांवर जोरदार झाली. विद्यार्थी आपले मत सोशल मीडियावर व्यक्त करताना कोणत्याही टोपी, पगडीपेक्षा शिक्षण महत्त्वाचं असून, त्याकडे विद्याथ्र्यानी लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगतात. कारण विद्याथ्र्यासाठी कोणत्याही पोशाखापेक्षा पदवी मिळणं महत्त्वपूर्ण असून, त्यावर त्यांच्या आयुष्याची वाटचाल अवलंबून असते.विद्यार्थी हित, त्यांना मिळणार्या सुविधा, उत्तम प्रतीचे नव्या शिक्षण संकल्पना हे सारे मिळून शैक्षणिक बदलांची नांदी होत असते हे फक्त मुंबई विद्यापीठाने नाही तर प्रत्येक शैक्षणिक संस्थेने लक्षात ठेवणं आवश्यक असून, त्यानुसार प्रशासकीय आणि शैक्षणिक बदल करणं आवश्यक आहे. ‘वेश असावा बावळा’ या उक्तीप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये कौशल्य, उच्चप्रतीचे शिक्षण व त्यासाठी आवश्यक सुविधा, आवश्यक गुणवत्ताधारक प्राचार्य यांची सांगड घातली तर ते अधिक विद्यार्थी हिताचे ठरेल..!
( सीमा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत शैक्षणिक वार्ताहर आहे.)