- पवन देशपांडे
क्लीन शेव्ह करून मैदानात उतरणारे क्रिकेटपटू गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या स्टाइलची दाढी बाळगून खेळताना दिसत आहेत. त्यांच्या खेळाइतकीच त्यांच्या दाढीच्या स्टाइलचीही चर्चा झाली आहे. विराट कोहली त्यात सध्या हॉट-फेव्हरिट. विराटसारखी दाढी ठेवणार्या तरुणाईची संख्या सध्या अफाट आहे. तो घोडय़ाच्या नाळेसारखी दाढी ठेवतो. त्याला हॉर्सशू बिअर्ड स्टाइल असं म्हटलं जातं. असे असंख्य प्रकार सध्या जगभरात फेमस आहेत. कोणी बांधोल्झ स्टाइलची दाढी ठेवतं. त्यात आइनस्टाइन यांच्यासारखी पूर्ण दाढी वाढू दिलेली असते. हा प्रकार सध्या तरुणाईमध्ये अफाट प्रसिद्ध आहे आणि सध्या तो ‘अट्रॅक्शन पॉइंट’ असल्याचंही म्हटलं जातंय.वेगवेगळ्या स्टाइलची दाढी वाढवायची. फोटो पोस्ट करायचे. व्हॉट्स स्टेटस अपडेट करायचं. हा सध्याचा ट्रेण्ड.पण, यात काही वर्षापूर्वी एक नवं व्रत सुरू झालंय. जगभरातल्या बर्याचशा तरुणाईनं ते स्वीकारलंही. त्याचं नाव - ‘नो शेव्ह नोव्हेंबर’. या नो शेव्ह नोव्हेंबरचा सध्या आपल्याकडेही शहरी भागात मोठा बोलबाला आहे. समाजमाध्यमांत अनेकजण आपल्या दाढीचे फोटो टाकतात. त्यावर चर्चा करतात.तुम्ही म्हणाल, ही ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ काय भानगड आहे? तर हे आहे महिनाभर दाढी न करण्याचं व्रत. ज्याला हे व्रत करायचं, त्यानं महिनाभर आपल्या दाढीला ब्लेड लावायचं नाही. दाढी कापायची नाही. आपल्याकडे श्रावण पाळतात. तसंच हे पाश्चात्त्य जगातून निर्माण झालेलं व्रत. हे व्रत करून काय फळ मिळणार? हा कोणालाही पडणारा प्रश्न आहे. मात्र हे वैयक्तिक पातळीवर मिळणार्या फायद्यापेक्षा एका सामाजिक जाणिवीतून सुरू झालेली ही चळवळ आहे. याहीपाठी एक आख्यायिका आहे. तुम्हाला माहीत असेलच, एखाद्या कॅन्सर पेशंटला केमोथेरेपी करण्याची वेळ आली की त्याचे केस झडायला सुरुवात होतात. महिनाभरापूर्वी लांबसडक, झुबकेदार केस असणारा माणूसही कॅन्सरवरील उपचारादरम्यान केस गमावून बसतो. शिकागोच्या उपनगरात सुखात जगत असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मॅथ्यू हिल या कत्र्या पुरुषाला कॅन्सरचे निदान झाले. त्यांना मोठय़ा आतडय़ांचा कॅन्सर होता. त्यावर उपचार सुरू असतानाच ते गेले. हे त्यांच्या कुटुंबाच्या जिव्हारी लागलं. ही घटना 2007ची. त्यांच्यातील एका मुलीनं ठरवलं. कॅन्सरमुळे ज्या लोकांचे केस जातात अशा लोकांसाठी आपण एक मोहीम सुरू करायची. मॅथ्यू हिल यांच्या नावाने एक फाउण्डेशन सुरू करण्यात आलं. त्याद्वारे एक चळवळ उभी राहिली. एक महिना शेव्हिंग न करण्याची. व्हॅक्सिंग न करण्याची. आजारात ज्यांचे केस जातात अशा कॅन्सरग्रस्तांसाठी आपण केस वाढवायचे. तेही महिनाभर. या एका महिन्यात शेव्हिंग न केल्याने किंवा व्हॅक्सिन न केल्याने वाचणारे पैसे कॅन्सरग्रस्तांसाठी देणगी म्हणून द्यायचे. आयडिया भन्नाट होती. 2009 मध्ये याची वेबसाइट सुरू करण्यात आला आणि पहिल्याच प्रयोगात प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच त्यांना 2 हजार डॉलर एवढी देणगी मिळाली. आता ही चळवळ 9 वर्षाची झाली आहे आणि यात कोटय़वधी लोक सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी या मोहिमेतून तब्बल 10 लाख डॉलर एवढी देणगी जमा झाली होती. नो शेव्ह नोव्हेंबर या ग्रुपने मग आणखी देणगी जमा करण्यासाठी तसेच अधिकाधिक तरुणांना आकर्षित करण्यासाठी या ग्रुपच्या नावाचे टी-शर्ट, ब्रेसलेट आणि अशा असंख्य अशा वस्तू विकण्यास सुरुवात केली. हा पैसा कॅन्सरवर संशोधन करण्यासाठी वापरला जाऊ लागला. वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगभरात कॅन्सरमुळे दरवर्षी 22 हजार लोकांचा मृत्यू होत असतो. पण यातील अध्र्याहून अधिक लोकांना उपचाराद्वारे वाचवता येऊ शकते; पण काहींना उपचाराची सोय उपलब्ध होत नाही तर काहींना उपचार करण्यासाठी पैसा नसतो. शिवाय कॅन्सरचे जे असाध्य प्रकार आहेत त्यांच्यावर संशोधन करणंही गरजेचे आहे. यासाठी निधी उभा राहावा म्हणून ही मोहीम जगभरात मोठय़ा प्रमाणात काम करत आहे. याच चळवळीच्या माध्यमातून लोकांना कॅन्सरबद्दल जागृत करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात याच चळवळीतून लाखो तरुण प्रेरित झाले आहेत. त्यांनी महिनाभरासाठी रेझर शेव्हिंग किटमध्ये बंद करून ठेवला आहे आणि त्यातून वाचणारा पैसा या कॅन्सरकामी लावला आहे. आतार्पयत या मोहिमेत 35 लाख डॉलर जमा झाले आहेत आणि ते चांगल्या कामी मार्गीही लागले आहेत. हे झालं विदेशात. भारतात काय चित्र आहे?भारतातही ही चळवळ आता बाळसं धरू लागली आहे. शहरी भागातील अनेक तरुण आणि तरुणी आता नो शेव्ह नोव्हेंबर हे व्रत करू लागले आहेत. पण ते करण्यात एक गंमत किंवा ट्रेण्डचा भाग होणं याहून जास्त काही नाही. भारतीय तरुणांसाठी ही केवळ एक फँटसी आहे. कॅन्सरग्रस्तांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती, याचा कोणताही गंध अनेकांना नाही. त्यामुळे केवळ फॅशन म्हणून दाढी वाढवणार्यांचे चेहरे शहरांमध्ये दिसत आहेत. काही वर्षापूर्वी आइस बकेट नावाचे चॅलेंजचेही असेच होते. हीसुद्धा एक चळवळ होती; पण भारतीयांनी त्या चॅलेंजचा खेळ केला. आता नो शेव्ह नोव्हेंबरचेही तेच होणार, असं दिसतं.पण निदान हा ट्रेण्ड जोरात असताना त्यामागची संवेदनशील भूमिका, विचार तरी आपल्याला माहिती हवा.
रेझर उद्योगाला फटकाक्लीन शेव्हचा ट्रेण्ड कमी होऊ लागल्याने रेझर उद्योगाला फटका बसू लागला आहे. आधी क्लीन शेव्ह नसेल तर त्या व्यक्तीला आळशी समजले जायचे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असायचा. त्यामुळे सलून दुकानदारांचे आणि रेझर उद्योगाचा मोठा फायदा व्हायचा. आता परिस्थिती बदलली आहे. आता दाढी ठेवणार्याकडे वेगळ्या नजरेतून पाहिले जात नाही आणि त्यांना आळशीही ठरवले जात नाही. त्यामुळे मोठंमोठय़ा कंपन्यांचे अधिकारीही स्टायलिश दाढी ठेवून वावरताना बघायला मिळतात. तोच कित्ता त्यांचे कर्मचारी गिरवत आहेत. त्यामुळे रेझर उद्योगाला मोठा फटका बसू लागला आहे अशी चर्चा आहे.***ट्रिमर उद्योग जोरात दाढी पूर्ण काढून न टाकता केवळ ट्रिम करण्यावर तरुणाईचा सध्या भर आहे. त्यामुळे ट्रिमर तयार करणार्या कंपन्यांचीही चलती आहे. गेल्या काही वर्षात ट्रिमर विकणार्या कंपन्यांची विक्री 7 ते 10 टक्क्यांनी वाढली आहे. ***
मुव्हेंबर- एक मिशी वाढवा मोहीमनो शेव्ह नोव्हेंबरसारखीच मुव्हेंबर नावाचीही मोहीम आहे. माणसं तरुणपणीच प्राण गमावून बसू नये यासाठी त्यांना आरोग्याबाबत जागृत करण्याची ही मोहीम आहे. या मोहिमेत महिनाभर मिशी न कापण्याचा संकल्प केला जातो. हे करत असताना पुरुषांच्या मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती केली जाते. ही मोहीम 2003 साली ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झाली होती. त्याचा आता जवळपास 20 देशांमध्ये प्रसार झाला आहे. ***नो शेव्ह विमेन
बायकांचा आणि दाढी करण्याचा काय संबंध? त्यांनी कशाला नो शेव्ह नोव्हेंबर नि मुव्हेंबर या मोहिमांत सहभागी व्हायला पाहिजे?यंदा मात्र या प्रश्नाचं उत्तर सोशल मीडियात अनेक व्हिडीओ चळवळी करत अनेक देशांतल्या महिला/तरुणींनीच दिलं आहे.पुरुष दाढी ठेवतात किंवा रोजच्या रोज करतात, त्याविषयी समाज काही बोलत नाही. पण आता नव्या आधुनिक म्हणवणार्या काळात बायकांनी नियमित व्हॅक्स करणं, ओठांवरची लव काढत थ्रेडिंग करणं, आय ब्रो करणं हे सारं कंप्लसरी या श्रेणीत मोडू लागलं आहे. त्यानं होणारा त्रास, त्यातून खर्च होणारा पैसा आणि अंगावर जास्त लव असेल तर होणारी टींगल हे सारं जगभर सर्रास चालतं. काखेतले केस न काढता स्लिव्हलेस कपडे तर जगात कुणीच महिला वापरत नाही. आता मात्र याच महिन्यात एक चळवळ आली आणि बायकांनी आपले व्हिडीओ शूट करून सोशल मीडियात टाकले. व्हॅसिंग, र्थेडिंगला नकार देत निसर्गानं जे जे दिलं ते ते सुंदर असं म्हणत एक नवा स्वीकार जन्म घेताना दिसला.
(लेखक लोकमत वृत्तसमूहात वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत.)