शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

नथिंग आॅफिशियल अबाउट इट!

By admin | Published: July 28, 2016 5:24 PM

खेड्यापाड्यातली, डोक्यावर हंडे वाहत काट्याकुट्याची वाट बिना चप्पल तुडवलेली, शाळेचे वर्ग सारवणारी, बिन तेलाचं खळगूट भाकरी मोडून खाणारी, गावठीच मराठी बोलणारी

 - मेघना ढोके

खेड्यापाड्यातली, डोक्यावर हंडे वाहत काट्याकुट्याची वाट बिना चप्पल तुडवलेली, शाळेचे वर्ग सारवणारी, बिन तेलाचं खळगूट भाकरी मोडून खाणारी, गावठीच मराठी बोलणारी, इंग्रजीला भ्यालेली आणि गप्पा मारत दोस्तांना जोडी म्हणून टमरेल घेऊन शेतात जाणारी पोरं अनेक मल्टिनॅशनल्समध्ये बिग बॉस म्हणून जाऊन बसली. मोठ्या पदांवर पोहचून आपलं अस्सल ‘देसी’ शहाणपण वापरून नव्या जगात यशस्वी होऊ लागली..तुमचा भूतकाळ नी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुम्ही कुणाचे कोण हे प्रश्न संपले आणि ‘तुम्ही कोण?’ या ओळखीला एक सेल्फ मेड ग्लॅमर प्राप्त झालं..... हे सगळं गेल्या फक्त पंचवीस वर्षात झालं.यत्ता सातवीत असेन मी तेव्हा.आता धुरकट आठवतात ते दिवस. वय जेमतेम ११-१२ वर्षांचं असेल.फारसं काही कळत नव्हतं, पण आपल्याला आता सगळं कळतं, आता आपण मोठे झालो, हायस्कूलमध्ये शिकतो असं डोक्यात ठाम रुतायला लागलं तेव्हाचा हा काळ!नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात आम्ही राहायचो. घरात टीव्ही नव्हताच. याच्यात्याच्या घरी जाऊन ‘क्राऊन’ नाव लिहिलेले दोन दारांच्या सरकत्या शटरचे टीव्ही पाहायचो. रामायण संपलं होतं, आणि महाभारतही संपतच आलं होतं. त्यासोबतच रविवारची रंगोली, छायागीत, चित्रहार या साऱ्यांचं फार अप्रूप वाटायचं. दर रविवारी दुपारी एक प्रादेशिक आणि संध्याकाळी एक हिंदी सिनेमा टीव्हीवर लागायचा. गावात लाईट असले तर संपूर्ण पाहायचा, नाहीतर लाईट आल्यावर जेवढा मिळेल तेवढा पाहायचा. शेजारच्यांच्याच घरी. ते हिडीसफिडीस करायचे. टीव्हीला मधनंच मुंग्या आल्या किंवा काळी पट्टी आली तर टीव्हीवर टपली मारायला पोराटोरांनाच उठवायचे. नाहीतर छतावर उभा तारांनी बांधलेला अ‍ॅण्टिना नीट करायला वर कौलावर धाडायचे. अजून डावीकडे, अजून उजवीकडे, खाल्ल्या अंगाला, वरल्या अंगाला फिरव अशा खालून आरोळ्या यायच्या आणि त्या फिरवाफिरवीत कौलं फुटली म्हणून खाली आल्यावर पोरांना चांगल्या ‘श्या’ (म्हणजेच अस्सल शिव्या) खाव्या लागायच्या..पण मजा होती. टीव्हीचं वेडच असं की एरवी त्या वयात कुणी काही बोललं की लगेच पेटून उठणारा स्वाभिमान या टीव्हीसमोर लापटासारखा गप्प बसायचा. आणि लापटासारखंच मग याच्या नाहीतर त्याच्या घरी टीव्ही पाहायला जावं लागायचं. गावात टीव्ही तरी किती होते, चार नाही तर पाच!मात्र याच काळात गावात एक क्रांती झाली. लोकशाही म्हणजे काय आणि तिची ताकद काय हे नागरिकशास्त्रात नाही, तर गावच्या पारावर पहिल्यांदा कळलं. गावातल्या एका मोठ्या पाराला लागूनच ग्रामपंचायत कार्यालय होतं. कार्यालयाच्या बाहेर उंचावर पहिल्यांदा पंचायतीनं गावकीचा म्हणून एक पोर्टेबल टीव्ही लावून टाकला. तिथंच लापटपणा संपला. गरजच उरली नाही कुणाच्या दारात जायची. डायरेक्ट पारापाशी टीव्ही पाहायला गाव गोळा होऊ लागला. आणि संध्याकाळी मंदिरात हरिपाठाला न येणारी पोरं, तो हरिपाठ संपताच टीव्हीपाशी बसू लागली. त्या टीव्हीवर पहिल्यांदा बातम्यात कळलं की देशात मंडल नावाचं काहीतरी प्रकरण तापतंय. आणि एका पोरानं दिल्लीत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मग आणखी दोन महिन्यांनी कळलं की, आणखी एका तरण्या पोरानं स्वत:ला जाळून घेतलं आणि चिठ्ठी लिहून ठेवली की, ‘व्होट बॅँकेसाठी तुम्ही हे जे राजकारण करताय, ते मला मान्य नाही. माझ्या मरणाला तुम्हीच जबाबदार आहात!’व्ही. पी. सिंग नावाचे हळूच बोलणारे, फर टोपीवाले पंतप्रधान देशाला उद्देशून काहीतरी संदेश देतानाही तेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर पाहिले. त्याआधीपर्यंत निदान माझ्या वयाच्या खेड्यातल्या पोराबाळांनी कुठलाही पंतप्रधान असा प्रत्यक्ष पाहिला नव्हता. गावच्या पारावर बसणारी माणसं एकमेकात बोलायची की, देशाचं काही खरं नाही. बाईचीच सत्ता बरी होती, बाईचा पोऱ्याही चांगलाय म्हणतात. पण या कमळावाल्यांचं नी चाकावाल्यांचं काही खरं नाही..कानावर पडलं म्हणजे आपल्याला कळलं अशा दिमाखात घरी येऊन आजीला तेच रुबाबात सांगितलं तर ती म्हणाली, तुला काय करायच्या चौकशा, अभ्यास कर, पुढं दिवस वाईट येणारेत, यापुढे तुम्हाला सरकारी नोकऱ्याच मिळणार नाही या देशात, मराल उपाशी..पुन्हा कळलं काहीच नाही, पण आपण ज्या थोर्थोर देशाचा इतिहास-भूगोल शिकतोय, त्यात सध्या काहीतरी पेटलंय एवढंच समजलं. बरीच मोठी माणसं पहिल्यांदा त्याकाळी ‘ते’ आणि ‘आपण’ अशा भाषेत बोलताना दिसू लागली. शेजारी राहणारा बीएस्सी करणारा अण्णा आणि त्याचे मित्र जीवतोड मेहनत करताना दिसायचे, तालुक्याच्या गावी कॉलेजात जायचे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत रात्रंदिवस एक करायचे. आणि आम्ही दोन किलोमीटर पायी चालत दुसऱ्या गावातल्या हायस्कुलात जायचो. पायाला चप्पल नव्हतीच, पायाखाली धड डांबरी रस्ताही नव्हता, आणि त्यांची काही गरजही नव्हती. बाकी खेड्यात तसं बरंच चाललं होतं.. शांत, निवांत. शहरात म्हणजे नाशिकला मामाच्या गावी आलो की रोज येणाऱ्या पेप्रात वाचायचो की या देशात कडबोळ्यांंचं सरकार आहे, देशात महागाई फार वाढलीये. रोजगार नाही. या देशात आता नोकऱ्याच नाहीत. पण हे सारं काही कळण्याचं ते वय नव्हतंच. मामाच्या घरात टीव्ही आहे नी संडासही घरातच आहे याचंच काय ते अप्रूप होतं. बाकी शहरात राहणारी आजी मात्र नेहमी सांगायची, अभ्यास कर खूप! बाईच्या जातीनं स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नोकरी करायला पाहिजे. नोकऱ्या कमी होताहेत, पुढे कसं होणार तुमचं..कळायचं एवढंच की, अभ्यास केला नाही तर नोकरी मिळणार नाही आणि नोकरी नाही तर जेवायला मिळणार नाही, आणि जेवणच नाही तिथं घर, घरात टीव्ही आणि घरातच संडास हे तर काहीच घडणार नाही!लहानग्या डोक्यात ही एवढीच स्वप्नं असली तरी बऱ्याच मोठ्यांचीही त्याकाळी फार काही याहून मोठी वेगळी स्वपं्न असतील असं वाटत नसे. गावात एकादोघांनी खासगी क्लासेस घेणं सुरू केलं तेव्हा तिथं जाणाऱ्यांना ‘रेमे डोके’ म्हणत बाकीचे मास्तर आणि पोरं हसायचे. जास्त मार्क मिळावेत म्हणून क्लास, खरंतर मिळतंय त्याहून जास्त काही मिळावं ही आस, ही कल्पनाच विचारांच्या कक्षेबाहेरची होती. क्लासला जाणाऱ्या पोरांना भयानक अपमानास्पद वाटण्याचे ते दिवस होते. आठवतंय, शहरातून शिकून आलेल्या एका तरुणानं गावात पहिल्यांदा एक मेडिकल स्टोअर उघडलं, तर बायका त्या दुकानात चुकून जायच्या नाही. एकट्या बाईनं असं तिथं जाणं बरं नाही असं मोठ्या पोरी म्हणायच्या. पण लपूनछपून जायच्याच, कारण त्या ‘मेडिकलात’ टीव्हीवरच्या जाहिरातीत दिसणारी चकचकीत शॅम्पूची घाटदार बाटली मिळायची. घरच्यांशी भांडून ती शॅम्पूची बाटली आणणं आणि शिकेकाईच्या डोळे चुरचुरणाऱ्या तिखट पाण्याऐवजी केसांना शॅम्पू लावणं हे पहिलं हिरॉईक काम तर होतंच, मात्र घरातला पहिला बदलही होता. मोरीत आता शिकेकाईची जागा शॅम्पूच्या बाटलीनं घेतली आणि केस मोकळे सोडणं अशुभ असं मोठे सांगत असूनही दर रविवारी मोकळे केस सोडून बटवेणी नावापुरती मिरवू लागली. ही पहिलीवहिली ‘हिरॉईक’ गोष्ट व्यक्तिगत आयुष्यात घडत असतानाच गावखेड्यातही लांब केसांना कात्री लागू लागली.म्हणता म्हणता नव्वदीचं माप ओलांडून ९१ चा पाढा ९२-९३ पर्यंत पोहचला होता. ज्याच्याकडून देशाला बरीच आशा होती तो तरुण पंतप्रधान आत्मघातकी हल्ल्यात बळी पडला होता. त्यानं देशभरात आणलेले टीव्ही नी फोन मात्र सगळीकडे दिसू लागले होते. अमेरिकेनं दिला नाही आपल्याला कम्प्युटर तर आपणच कसा ‘परम’ कम्प्युटर बनवला याचं कौतुक शाळा-कॉलेजातही आम्हाला ‘स्वाभिमान’ म्हणून शिकवलं जात होतं. आयटी असा काही शब्दच नव्हता तोवर आलेला आयुष्यात! पण हुशार मुलांनी बोर्डातच यायचं असतं आणि दहावीनंतर सायन्स, बारावीनंतर मेडिकल-इंजिनिअरिंगच करायचं असतं असा नियम होता. दहावीची परीक्षा संपताच शिवणकाम-टायपिंगसह आता कम्प्युटरचे ‘डॉस’ क्लासेस मुलींनाही कंपलसरी लावले जात होते. पण आपण ‘मार एण्टर’ डॉस क्लासला जात असताना एक बारकासा, बुटकासा, सचिन तेंडुलकर नावाचा पोरगा (तो बारावीपण पास नव्हता, हे तेव्हा फार महत्त्वाचं वाटे) क्रिकेटच्या मैदानावर तुफान खेळत, भयानक पैसा कमवत होता. आयुष्यात असं काहीतरी करायचं असं मध्यमवर्गीय कोमट आणि नाकासमोरच्या ओशट आयुष्यात पहिल्यांदा वाटलं तो हा काळ! सायन्स-कॉमर्स नाही आटर््सला जायचं म्हणून पहिल्यांदा हुशार पोरांनी बंड केलं, काही घरात अनेक महायुद्ध झाली तो हा काळ. काहीजण हरले नी सायन्सला गेले. काही मात्र आटर््सची पताका घेऊन कॉलेजात दाखल झाले. दुसरीकडे कयामत से कयामत तक सिनेमात दाखवली होती तशी पळून जाणारी पोरं-पोरी आमच्याही अवतीभोवती सर्रास दिसू लागली, आणि त्यानंतरचे गहजब गाजू लागले. ठरवून लग्न करण्यापेक्षा पळून जाण्यात थ्रिल असतं हे कळण्याचे ते दिवस वैयक्तिक आयुष्यात बंडखोरीला खतपाणी घालू लागले. जो जिता वहीं सिकंदर नावाच्या सिनेमातला एक महामाजुरडा संजयलाल आम्हाला तोंडावर विचारू लागला की, जो सब करते है यारो वो क्यों हमतुम करे? आणि दीवाना होऊन भेटायला लागलेला कुणी शाहरुख ‘बाजीगर’ बना म्हणून चिथवू लागला.देशातले सामाजिक बदल असे व्यक्तिगत आयुष्यात घुसू लागले ते याच दिवसात. त्याचे दृश्य रूप सिनेमात दिसू लागले. सिनेमात हिरोंची नाही तर अ‍ॅण्टी हिरोंची प्रतिमा मोठी होऊ लागली. व्यवस्थेविरुद्ध लढतबिढत बसण्यापेक्षा, नी ती बदलण्यापेक्षा त्या व्यवस्थेलाच धुडकावत, खरं सांगायचं तर ‘इग्नोर’ करत आपलं भलतंच काहीतरी करण्याचा आणि त्यात अभिमान वाटण्याचा हा टप्पा होता. क्रिकेट वर्ल्डकपच्या काळात पेप्सी आणि कोकाकोलाचं शीतयुद्ध जाहीर लढलं जात होतं. नव्यानंच आलेल्या केबल टीव्हीवरच्या अनेक जाहिरातींतून लोकांना ते आपापली बाजू घ्यायला भागही पाडत होतं. ‘आॅफिशियल’पेक्षाही ‘नथिंग आॅफिशियल अबाउट इट’ असं म्हणत जगणारी बेफिक्री आणि चाकोरी सोडा अशा हाका घालणारी जादू हे या दिवसांचं खरं रंगरूप होतं.याच काळात एसटीडी-पीसीओचे पिवळे डब्बे आले. दूरसंचार क्रांतीबिंती झाली. मात्र सुरुवातीच्या दिवसात तिथं जाऊन कुणास फोन करणं हेसुद्धा बिघडलेल्या वर्तनाचं आणि गल्लीत गॉसिपचं कारण ठरू लागलं. पण तरीही दिवसाढवळ्या राजरोस एसटीडीत जाऊन बिंधास्त गप्पा मारणं ही एक बंडखोरी होती यावर आता स्वत:चाच विश्वास बसणं अवघड आहे. शेजारपाजारच्यांच्या केबलला पिना टोचटोचून हम पांचवाल्या बिघडलेल्या कार्ट्या पाहणं ही मनोरंजनाची ऐश ठरू लागली. ‘स्वाभिमान’ आणि ‘शांती’वाल्या डेलीसोपनं दिवस व्यापायला सुरुवात झाली. मात्र तरीही हे दिवस काहीसे आळसटलेले, गोविंदाच्या पाचकळ गाण्यांसारखे मोकाट, ढगळेढुगळेच होते. ‘लक्ष्य’च समोर नसताना वाट शोधत देशच नाही तर तरुण होत असलेली पिढीही चाचपडतही होती आणि त्याचवेळी ‘कुछ स्वाद है जिंदगी में’ असं वाटून आपल्याच तालावर आपलं जगणं नाचवण्याची हिंमतही गोळा करू लागली होती. आणि काही नाहीच जमलं तर एकाएकी अ‍ॅग्रेसिव्ह होत ‘तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करूं?’ म्हणत अंगावर येऊ लागली. आणि याचदरम्यान देशातलं वारं बदलत असल्याची चिन्हं दिसू लागली.ठोक भावात इंजिनिअर झालेल्यांना आयटीत आणि सॉफ्टवेअरमध्ये एकदम उखळ पांढरं झालं. एकदम अमेरिकाच जवळ आली. आणि कुणाचा तरी सख्खा नातेवाईक अमेरिकेत जाऊ लागला. कुणी लंडन तर कुणी जर्मनीचे पासपोर्टवरचे ठप्पे दाखवू लागला. नोकऱ्या नाही म्हणता म्हणता बऱ्याच नोकऱ्या दिसू लागल्या. आईबाबांच्या आग्रहाखातर आम्ही एम्प्लॉयमेण्ट एक्सचेंजमध्ये दिवसभर रांगा लावून नाव नोंदवलं होतं. तिथं जे कार्डही मिळालं होतं, ते सरकारी नोकरीचं वाटाडं कार्ड सुदैवानं किंवा दुर्दैवानं कधीच वापरावं लागलं नाही. कारणं दोन, एकतर त्यावर एकदाही टामटुमसुद्धा सरकारी नोकरीचा कॉल आला नाही, आणि दुसरं म्हणजे सरकारी नोकऱ्यांपेक्षा खासगी नोकऱ्यात एकाएकी जास्त पैसा आणि संधी दिसू लागल्या. ‘खासगी नोकरी?’ या दोन शब्दातला प्रश्नार्थक कुजकट कमीपणा एकदम पुसट झाला तो याच दिवसात! मिळाली ती नोकरी सोडली, दुसरी लागली असं म्हणत ‘पॅकेज’ नावाचा शब्द मध्यमवर्गीय जगण्यात एकदम अवतरला. त्याआधी लोकांना पगार मिळत, आता तरुण मुलांना पॅकेज मिळू लागले. आणि त्या बऱ्यावाईट पॅकेजसह खासगी नोकरी बदलणं यात काही असुरक्षित वाटणंही जरा कमी झालं. सरकारी नोकरीच हवी, ती मिळणारच नाही ते थेट खासगी नोकरीवालं फॉरेनचं किंवा देशी पॅकेज मिळण्याचा अभिमान या भावनिक टप्प्यात झालेला बदल आणि त्यामुळे उडालेली मध्यमवर्गीय जगण्याची भंबेरी ही एका स्थित्यंतराचीच अत्यंत मजेशीर गोष्ट आहे. अनेक घरी वडिलांना निवृत्त होताना जेवढा पगार मिळत होता तेवढा मुलाला/मुलीला पहिला पगार म्हणून मिळू लागला. आणि एरवी फुळूक-पातळपाणी कालवण म्हणून शिजणारी घरातली ढोमणभर भाजीही बदलली. सगळ्यांसाठी एकच भाजी हा नियम घरानं पहिल्यांदा मोडला आणि तरुण मुलांसाठी वेगळी, आवडीची भाजी शिजू लागली. हॉटेलात जाणं सर्रास सुरू झालं आणि भाजीपोळी केंद्रांनी बाळसं धरलं. वरकरणी यात आता फारसं काही वाटत नाही. पण त्याकाळी हे सारं म्हणजे घरानं मध्यमवर्गीय म्हणून जपलेलं आपलं सारं जीवनमान बासनात बांधून फॅशन असलेल्या दाराच्या किंवा खिडकीच्या पेलमेण्टवर ठेवण्यासारखं होतं.घरं अशी चटचट बदलत असताना आणि जमिनीवर पाटपाणी घेऊन होणारी जेवणं डायनिंग टेबलावर होत असताना घराबाहेर मात्र ‘ते’ आणि ‘आपण’ हे लहानपणी जाहीरपणे क्वचित ऐकलेले शब्द मोठे होऊन घरात घुसू लागले. घरातल्या टीव्हीसमोर सामाजिक विखाराच्या चर्चा झडू लागल्या. इतक्या की जातधर्माचे कलह, त्यावरूनचे दंगे आणि बॉम्बस्फोट थेट वैयक्तिक आयुष्यातल्या क्लेशापर्यंत येऊन पोहचले. आरक्षणाच्या लढाया नी असंवेदनशीलतेचे काच कचकचून पीळ मारू लागले आणि ‘त्यांच्या’ विषयीची संशयाची पाल ‘ह्यांच्या’ मेंदूत सरपटत जिभल्या चाटून वळवळत राहिली. ‘ते’ आणि ‘हे’, ‘ते’ आणि ‘आपण’ हे पक्ष सोयीनुसार बदलू लागले. कोण कधी कुठल्या बाजूचा बनेल हे सांगता येणं अवघड झालं आणि एका अस्वस्थतेनं सारं जगणं व्यापून टाकलं. या काळात देशात सत्तांतरं होत होती. कधी डाव्यांच्या पाठिंब्यावर, कधी तिसरी आघाडी, कधी उजवे स्वबळावर थोडा टेकू लावून आणि कधी पारंपरिक कॉँग्रेसही इतरांचा आधार घेत देशाचा राज्यकारभार चालवू लागले. गरिबी हटावच्या घोषणा विरल्या, आणि इंडिया शायनिंगचा गाजावाजाही यादरम्यान जिरला.तेव्हाच नव्या काळानं ‘ईएमआय’ नावाचा आणखी एक शब्द मध्यमवर्गीय जगण्याला दिला. फ्रीज, टीव्ही, स्कूटर तर हप्त्यानं मिळत होतं; पण घर घ्यायचं स्वप्न दाखवलं ते या ‘ईएमआय’ने. पगाराच्या निम्मी रक्कम दरमहा ईएमआय म्हणून जाऊ लागली. मात्र ऐन पंचविशी-तिशीत घर घेण्याची कर्तबगारी अनेकांनी करून दाखवली. जेमतेम सात टक्के व्याजदरानं घेतलेलं कर्ज, पण फ्लेक्झी म्हणता म्हणता त्या व्याजदरानं असं काही फुगायला सुरुवात केली की ऐन इंडिया शायनिंगच्या जल्लोषात अनेकांच्या डोळ्यासमोर अंधेरी आली. लोकलमध्ये लटकत, नव्यानंच हातात आलेला मोबाइल कानाला चिकटवत धक्के खात ईएमआयभरू आयुष्य सुरू झालं. त्या धक्क्यांनी शायनिंगवाल्या माहोलचा पुरता बोऱ्या वाजवला आणि देशाचा सुकाणू पुन्हा इंदिराबार्इंच्या सुनेकडे सोपवून दिला. देशी-विदेशीचे वाद गाजले, देश दहशतीत होरपळू लागला, मात्र विकासदराच्या चढत्या आलेखासह महासत्ता होण्याच्या स्वप्नांचे निखारे दस्तुरखुद्द राष्ट्रपतीही चेतवू लागले.समाजाकडून कुटुंबाकडे आणि कुटुंबाकडून व्यक्तीकडे जगण्याचा केंद्रबिंदू सरकू लागला. मी, माझं शिक्षण, माझ्या आवडीचं करिअर, माझं प्रेमात पडणं, लग्न करणं, न करणं, जातीत-परजातीत, पळून-ठरवून या साऱ्या विषयांसह व्यक्तिगत प्रगतीच्या ध्येयानं बहुतांश ‘मीं’ना ‘अपवर्ड मोबिलीटी’चा अर्थात वरच्या आर्थिक सामाजिक स्तरात वेगानं सरकण्याचा ध्यासच लागला. खासगी नोकऱ्यांनी जगण्याला एक नवं तत्त्व दिलं. वय कमी असलं तरी चालेल, कामगिरी करताय, गुणवत्ता आहे, रिझल्ट देताय मग पैसा आणि पद तुम्हाला नक्की मिळेल! या ध्यासाला मग चढाओढीची, स्पर्धेची आणि मीकेंद्री जगण्याची तुफान वेगवान जोड मिळत गेली. गुगलनंतर आणि ई-मेलमुळे तर या वेगाला अधिक धार आली. एकेकाळी अंधाऱ्या सायबर कॅफेत जाऊन आपलं ईमेल अकाउण्ट उघडणं हेसुद्धा लोकांच्या नजरा चुकवत करावं लागे आणि आता काळ थेट ‘कनेक्टिव्हिटी’ या मोठ्या टप्प्यावर येऊन पोहचला. कनेक्टेड आणि नॉन कनेक्टेड अशा जगात माणसं विभागली गेली. शहरी-ग्रामीण हा भेद मिटला, इंग्रजी शिकण्याचं फॅड वाढलं पण भाषा येत नाही म्हणून अडून बसण्याचे आणि मागास असण्याचे दिवसही सरले. आता बोलण्यासारखं काही, हे भाषा येण्या न येण्यापेक्षा महत्त्वाचं ठरू लागलं. आणि खेड्यापाड्यातली, डोक्यावर हंडे वाहत काट्याकुट्याची वाट बिना चप्पल तुडवलेली, शाळेचे वर्ग सारवणारी, बिन तेलाचं खळगूट भाकरी मोडून खाणारी, गावठीच मराठी बोलणारी, इंग्रजीला भ्यालेली आणि गप्पा मारत दोस्तांना जोडी म्हणून टमरेल घेऊन शेतात जाणारी पोरं अनेक मल्टिनॅशनल्समध्ये बिग बॉस म्हणून जाऊन बसली. मोठ्या पदांवर पोहचून आपलं अस्सल ‘देसी’ शहाणपण वापरून नव्या जगात यशस्वी होऊ लागली. खेळांच्या मैदानावर मध्यमवर्गीय कुंबळे-द्रविड-तेंडुलकरचंही अप्रूप संपलं आणि धोनी, सेहवाग, पठाण बंधू यांचं साम्राज्य कर्तृत्वाचं क्षितिज भेदू लागलं.तुमचा भूतकाळ नी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुम्ही कुणाचे कोण हे प्रश्न संपले आणि ‘तुम्ही कोण?’ या ओळखीला एक सेल्फ मेड ग्लॅमर प्राप्त झालं.मात्र जग असं रिझल्ट ओरिएण्टेड होत जवळबिवळ येत असल्याचा आभास होत असला तरी त्यामुळे जगण्याचे प्रश्न सुटले नाहीत तर वाढले, अस्वस्थता वाढली, स्पर्धाही आणि नव्या जगात टिकून राहण्याची अशक्य कसरतही गळ्यापर्यंत येऊन भिडली. आजूबाजूची भ्रष्ट व्यवस्था, ढीम्म कारभारही छळत होता आणि नव्या संधी, नवा खुला ग्लोबल अ‍ॅप्रोचही खुणावत होता. त्यातून जगभरात जायच्या संधीही मिळू लागल्या. अमेरिका-जपानसारखे देश पाहताना खऱ्या अर्थानं विकसित असण्याची व्याख्या कळली. व्यक्तिगत जगणं आणि व्यक्तिकेंद्री जगण्यातला फरक कळला आणि आपलं जुनं सारं बरंवाईट बोजकं, मध्यमवर्गीय जगण्यातलं नकोसं झालेलं कबाड बाजूला ठेवून नव्या नजरेनं जग पाहण्याचा एक मोकळेपणाही या काळानं शिकवला..मात्र भरल्या पोटांना आणि थोड्याबहुत आर्थिक सुबत्तेला धार्मिक-जातीय-सांस्कृतिक अस्मितांचे टोकदार काटे फुटू लागले. ते इतरांना रक्तबंबाळ करू लागले आणि आज ज्या टप्प्यावर येऊन पोहचलाय हा प्रवास तिथं तर डाटा पॅक मारलेल्या टच स्क्रीन फोनवरून फॉरवर्ड ढकलगाडी करत, वैयक्तिक मतांचा तिखट मारा करत द्वेषाचं विषही कालवू लागले..अ‍ॅस्पायरिंग इंडियाचा गाजावाजा एकीकडे सुरूच आहे.. तो खराही आहे. अखंड उमेदीची बीजं मनाच्या तळात खोल पेरलेली असल्यानं ‘मोठं’ होण्याचा ध्यासही तोच आहे..फक्त तो समाजकेंद्री न राहता व्यक्तिकेंद्री झालाय..साऱ्या गावात एक फोन, ते एका गल्लीत एक फोन, ते घरटी एक फोन, घरात प्रत्येक खोलीत कॉर्डलेस ते आता थेट प्रत्येकाकडे एक किंवा दोन मोबाइल. त्यावर मारलेले स्वत:पुरते नेटपॅक आणि त्यावरचा स्वतंत्र सामाजिक पसारा, त्यातली देवाणघेवाण हे जितकं बदललं तितकाच, तसाच समाजाकडून स्वत:कडे हा प्रवास होताना दिसला..आज या टप्प्यावर उभं राहून मागे वळून पाहताना फक्त गंमत वाटते की, कुणी म्हटलं की रेशनला साखर सुटलीये किंवा रॉकेल सुटलंय तर अनवाणी बुधली नी पिशवी घेऊन पळत जाणारे, रांगा लावणारे, बिलं भरायला तासन्तास रांगेत उभे राहणारे, बसची दोनदोन तास वाट पाहणारे आपण आणि आज मोबाइलच्या एका क्लिकवर ट्रॅन्झॅक्शन करणारे आपण..काळ बदललाय, आपण बदललोय की सारंच बदललंय..गंमत आहे ती या विचारात.ही एका प्रवासाची फक्त नोंद आहे..शेणाच्या पाट्या, लाकडाच्या मोळ्या, रॉकेलची बुधली, लांब शेतात टमरेल घेऊन पळणाऱ्या, रेशनच्या रांगासह जगण्याच्या रांगेत कायम ‘आप प्रतीक्षा में है’ च्या मोडवर असणाऱ्या, लापट मध्यमवर्र्गीय तडजोडीनं जगण्याच्या वाटा शोधणाऱ्या आणि या एका काळातून तरुण होत होत दुसऱ्या काळात येऊन धडकलेल्या आणि अपवर्ड मोबिलीटीसह ‘अच्छे दिन आनेवाले है’ या स्वप्नवाक्यावर विश्वास ठेवणाऱ्या पिढीच्या व्यक्तिगत प्रवासाची ही एक सामाजिक वाटचाल आहे.. ..आणि प्रवास अजून बाकी आहे!( लेखिका लोकमत वृत्तसमुहात मुख्य उपसंपादक आहेत.)