- आप्पासाहेब सुरवसे लाखणगावकर
सतत आॅनलाइन राहून काय कमवतो आपण? सोशल मीडिया हा केवळ वैयक्तिक संपर्क, गप्पा, गोष्टी, करमणुकीच्या, चॅटिंगच्या चौकटीत न राहता सर्व सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. सोशल माध्यमांचा वापर करून आज काही सामाजिक संघटना विविध सामाजिक प्रश्नांना हात घालत आहेत. त्यातून एकत्र येत काम सुरू करत आहेत. काही आॅनलाइन ग्रुप्स लेख, निबंध, कविता, चारोळ्या, वात्रटिका, चित्रशलाका, पिरॅमीड इ. साहित्य प्रकारच्या स्पर्धा घेत माणसांना लिहितं करत आहेत. जग जवळ येतंय असं वाटतं या सोशल मीडियामुळे. मात्र त्याच्या वापराचं लागलेलं गंभीर व्यसन ही पण चिंंतेची बाब आहे. सोशल प्रसार माध्यमांच्या वापरामुळे नव्या पिढीची क्रियाशीलताही वरचेवर कमी होणारी आहे. कारण एक तर अभ्यासाची गोडी कमी होऊन मुलांमध्ये आॅनलाइन राहण्याची जीवघेणी स्पर्धा दिसून येते आहे. नेट नसेल तर बेचैन होतात ती. आज सद्यस्थितीला महाविद्यालयीनच काय तर प्राथमिक शाळा, विद्यालयांतील विद्यार्थी तासन्तास आॅनलाइन राहून वेळेचा अपव्यय करताना दिसतात. सोशल माध्यमांमुळे जरी एकीकडे सामाजिक प्रश्नांची उकल होत असली तरी सामाजिक दुहीही माजवण्याचं-पसरवण्याचं काम काही समाजकंटक करतात. तरुण मुलं त्याला फाशी पडतात. आपण नेमकं काय करतो आहोत, याचं भान आपण साऱ्यांनीच ठेवायला हवं.