- निशांत महाजन
येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक ( ज्याला इंग्रजीत फ्लॅग बेअरर म्हणतात.) म्हणून अभिनव बिंद्राची निवड करण्यात आल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच.
आणि त्यासोबत अनेक देशात वा ध्वजवाहकाच्या निवडीवरुन सध्या चाललेला गोंधळही बातम्यांमधून वाचला, ऐकला असेल!
सुदैवानं आपल्या देशात असा वाद झाला नाही आणि ऑलिम्पिकमध्ये पहिलं आणि एकमेव सुवर्णपदक जिंकून देणा:या बिंद्राची निवड झाली.
पण एवढं काय मोठं त्यात?
असा प्रश्न आलाच असेल मनात?
पण मोठं नाही, अत्यंत मानाचं, प्रतिष्ठेचं आणि अत्यंत जबाबदारीचं हे काम आहे.
खरंतर ऑलिम्पिकच्या सोहळ्यात आपल्या देशाच्या ऑलिम्पिक संघासह सगळ्यात पुढे देशाचा ध्वज घेऊन चालणारा हा खेळाडू फक्त त्याच्या खेळाचं नाही तर संपूर्ण देशाचं, देशातल्या प्रत्येक माणसाचं प्रतिनिधीत्व करत असतो.
आणि तो त्या देशाचा त्याक्षणी एक चेहरा असतो. जो चेहरा तेव्हा सारं जग पाहत असतो.
त्यावेळी हातात घेतलेला आपल्या देशाचा ध्वज उंच धरत तो खेळाडू स्वत:सह जगाला हेच सांगत असतो, की सर्वोत्तम ठरण्याच्या या स्पर्धेत माझा देश कायम अग्रेसर राहील.
आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, पण जिंकूच!
आपल्या देशाचा ध्वज असा सा:या जगासमोर उंचवण्याचा हा मान मिळणं हे सर्वोत्तम कामगिरीची, सातत्याचं आणि सर्वोच्च गुणवत्तेचं प्रतिक आहे.
येत्या ऑलिम्पिकमध्ये जेव्हा तिरंगा हातात घेऊन अभिनव बिंद्रा आपल्या सा:या खेळाडूंसह मैदानात उतरेल.
तेव्हा फक्त तो नाही, तर सव्वाशे कोटींची ऑलिम्पिक स्वप्नं त्याच्याबरोबर त्या मैदानात उतरतील.
जिंकण्यासाठी!!