- कलिम अजीम
स्वत:चा वेल सेटल्ड टेलरिंगचा बिझनेसबंद करून वयाच्या २३ व्या वर्षी मी अंबाजोगाई सोडली. औरंगाबादला आलो,तिथून पुणं आणि मग पुणं सोडून मुंबई गाठली. संधीचा दगड प्रत्येकवेळी छातीवर ठेवलाच..शहरामागून शहरं सोडली..
वर्षभरापूर्वी पुणं सोडलं आणि मुंबईला स्थायिक झालो. पुणं सोडायला मन धजत नव्हतं. तरीही मनावर नव्या संधीचा दगड ठेवत पुन्हा एकदा स्थलांतर स्वीकारलं.
याआधीही सेफ झोन तयार होताच मी शहरं सोडली आहेत.
आठ वर्षांपूर्वी स्वत:चा वेल सेटल्ड टेलरिंगचा बिझनेस बंद करून वयाच्या २३ व्या वर्षी अंबाजोगाई सोडली. २००९ साली घर सोडलं त्यावेळी उद्देश आणि हेतू वेगळा होता. टेलरिंगचं काम सुरू करून दहावं वर्ष ओलांडणार होतं. टेलिरंगमध्ये लेडीज आणि जेण्ट्स दोन्हीचा उत्तम मास्टर होतो. स्वत:ची मालकी असणारं शॉप काढण्याच्या तयारीत असलेला मी, एकदम चिंध्यांचा धंदा त्याग करण्याचा विचार करतो. लेखनकौशल्य आत्मसात करून चांगला लेखक होणं हाच हेतू डोळ्यासमोर ठेवू लागतो. म्हणून मग सगळं व्यवस्थित सुरू असताना उच्च शिक्षणासाठी शहर सोडलं. मात्र, स्थलांतराची भीती त्याहीवेळेस होती आणि आजही आहे. पण औरंगाबाद आणि पुणं सोडताना नव्या संधीच्या आड मी ही भीती दडवून ठेवली होती. पण मुंबई? मुंबईच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मोहमयीनगरी सहजासहजी कोणालाही स्वीकारत नाही. पण स्वत:ला कणखर बनवून थोडंसं सावरलं तर नवीन शहरंच काय, तर बहुभाषिक देशही तुम्हाला सहज स्वीकारतात.
ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार स्थलांतराच्या बाबतीत म्हणतात, ‘स्थलांतरं नवीन शक्यतांना जन्म घालतात’. रविश यांचं हे वाक्य पॉझिटिव्ह आहे. मात्र यातलं उद्बोधन आतल्या मर्मावर प्रहार करणारं आहे. शिक्षण आणि रोजगारासाठी आमची पिढी सहज स्थलांतर स्वीकारते. यातून आर्थिक स्थित्यंतरं मिळवण्याचा अट्टाहास असतो. पण सर्वच स्थलांतरित माणसांना शहरं स्वीकारतात असं नाही, माणसंच तग धरून अखेरपर्यंत टिकाव धरून राहतात. शहराच्या भूगोलासह, अनोळखी चेहऱ्यांनाही आपलंसं करून घ्यावं लागतं.
मी अंबाजोगाई सोडून औरंगाबादला आलो, भौगोलिक आराखड्यानुसार मराठवाड्यातला जरी असलो, तरीही बोलीभाषा आणि तिथल्या लोकांचा आत्मविश्वास माझ्यापेक्षा नक्कीच वेगळा होता.
मी बीड जिल्ह्यातला असल्यानं माझ्या भाषेचा टोन वेगळाच होता. त्यातही उर्दू भाषेवर दख्खनी पगडा. त्यामुळे हिंदीत बोलतानाही माझा लहेजा सर्वांपेक्षा वेगळाच. मी बोलत असताना मध्येच थांबवून ऐकणारा म्हणायचा, ‘तुम्ही बीडकडचे का?’
शहर आणि परिसरात दलित-बौद्ध, मुस्लीम आणि मूळ मराठी भाषक समुदाय तुलनेत तेवढ्याच संख्येनं होते. बौद्ध-दलितांची भाषा हिंदी असली तरी ती लक्षपूर्वक ऐकल्याशिवाय कळायची नाही. जुना बाजार, सिटी चौकातली उर्दू ऐकायला गोड, पण समजायला संभ्रमी, तर सिडको, औरंगपुरा, टिळकपथ इथली मराठी ग्रामीण प्लस मध्यम शहरी धाटणीची..
याहीपेक्षा वेगळी स्थिती बामू विद्यापीठाची. विदर्भ, खान्देश, मराठवाडा सर्व विभागीय भाषा आणि राहणीमानाचा ढंग. याउपर बोलताना कुणी अनार्थिक अर्थ काढू नये यासाठी स्पष्टीकरणाची टाचणं नेहमी जोडावी लागायची.
मग पुण्यात आलो.
पुण्यात दोन्ही पातळीवर यापेक्षा कैकपटीनं न्यूनगंड आणि संभ्रमित अवस्था. मराठवाड्याच्या स्वप्नातून खाडकन जागा होऊन आपटल्यासारखा पुण्यात आदळलो. इथं प्रमाणभाषेचा स्वैराचार शिकवणारे मास्तर मनात भाषिक धडकी भरवत. परिणामी सुरुवातीचे बरेच दिवस न्यूनगंडात होतो. इथला दुसरा वेदनादायी झटका म्हणजे पेठीय ओठातून झळकणारा टोकाचा तुच्छतावाद. या दोहोंच्या कचाट्यातून सुटायला बराच काळ जावा लागला. तत्कालीन पुणे विद्यापीठात विशिष्ट जात आणि वर्गाची कथित मक्तेदारी असलेला गट कार्यरत. त्यात शोषित आणि वंचित घटक, ग्रामीण आणि निम्नशहरी भाग सोडून शिक्षणासाठी आलेली आमची ही पिढी. ओबडधोबड राहणीमान आणि जेमतेम टक्केवारी. भाषेची जुगलंबदी व्हायचीच. त्यात आमची आजची पिढी बोलीभाषेची अट्टाहासी. मात्र याच काळात सोशल मीडियामुळे प्रमाणभाषेच्या ओघात हरवलेली आमची भाषा आम्हाला सापडली. बोलीभाषेला हीन समजणाऱ्या पुण्यात स्थलांतराची दुसरी बाजू कळली. त्यामुळे हा काळदेखील जगण्यातली दुसरी बाजू समजावून गेला.
स्थलांतराची दुसरी एक चांगली आणि महत्त्वाची बाजू म्हणजे दिवसागणिक वाढणारा लोकसंग्रह. यातूनच नव्या शहरात टिकून राहणाची ऊर्मी वारंवार बळकट होते. स्थलांतर शक्यता, संधींसोबत आत्मविश्वास आणि नवा लोकसंग्रह देतं. शहरं, गावं आणि घरातून तुटलेली नाती गरज म्हणून आधार शोधतात. त्यातून नवी नाती आणि भावनिक संबंध तयार होतात. तुटलेली घरं आणि नाती पुन्हा निर्मिली जातात. त्यामुळेच गाव आणि घरापासून दूर राहूनही अधिक सक्षम व स्वावलंबी होता आलं.
मीच नाही तर माझी, आजची पिढी स्थित्यंतरासाठी झटतेय. गावं, राज्य, देस-परदेसच्या पलीकडे पिढी कूच करतेय. काही या स्थलांतरात तरले, पुढे गेले. पण अनेक तरु णांना स्थलांतरानं देशोधडीला लावलंय, अनेक पिढ्या बरबाद केल्या हेदेखील खरंय..
त्यात माझ्यासारखे शोधत आहेत, स्थलांतराचे अनेक अर्थ..
( लेखक ‘महाराष्ट्र वन’ या वाहिनीत पत्रकार आहेत.)kalimazim2@gmail.com
छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना, कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..?? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट. १. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा.. पत्ता- शेवटच्या पानावर, तळाशी. २. ईमेल- oxygen@lokmat.com