- निशांत महाजन
गेल्या आठवड्यात एक साथीचा आजार आला.. एकदा सोशल मीडियात साथ आली की ती सुसाटच येते.. तर ही साथ काय?तर म्हणे माझ्याविषयी एका शब्दात सांगा ना, वन वर्ड अबाउट मी प्लीज अशा पाट्या फेसबुकवर अनेकांनी आपापल्या टाइमलाइनवर झळकवल्या..एकानं केलं की दुसऱ्यानं म्हणत शेकडोंनी तेच केलं..आता हे काय सोपं काम आहे का, एका शब्दात दुसऱ्याविषयी सांगणं..पण अनेक बहाद्दर ते सांगत सुटले. कोण कुणाला मॅड म्हणालं, कोण आॅसम तर कोण इनोसण्टही.उचक-पाचक केली तर केवढी मोठी एकेकट्या शब्दांची लांबचलांब यादी आली हाताशी.ग्रेट, फ्रेण्ड, फण्टास्टिक, लव्हेबल, स्मार्ट, किंग, क्वीन, ब्यूटिफूल, काईण्ड, प्रेमळ, धीट, भन्नाट, गोंडस, असं काय काय नि काय?आता तुम्हाला काय खरंच वाटलं की काय, की हे सगळे असेच होते. लिहिणाऱ्यांना ते तसेच वाटत होते?तसं काही नाही. उगीच आपलं काहीतरी वर्णन.पण अनेकांनी डीपी टाकटाकून, चांगले फोटो पोस्टून स्वत:चं एवढं कौतुक ऐकून घेतलं. ही स्वत:वरच फिदा होण्याची लाट बरीच चालली. मग ओसही पावली.पण तेवढ्यात हे मात्र कळलं की फेसबुकवर स्वत:चीच आरती करण्याची लाट येतेच अधनमधनं. ती गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा आली होती...