प्रतीक्षा माशाल
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
सर्वात भारी गोष्ट म्हणजे मी शिक्षण घेत आहे. सर्वात चांगला विषय म्हणजे पुस्तके. शिक्षण आणि वाचन यामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्याने मी काय स्वीकारावं आणि काय नाकारावं हे ठरवू शकते. ही लवचीकता नसेल, तर माणूस त्या भिंतीपलीकडे वाकून बघूच शकत नाही किंवा मनाविरुद्धची गोष्ट लवकर स्वीकारू शकत नाही, कदाचित यामुळे विचारांमध्ये प्रगल्भता येत नाही.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
करिअर, लग्न, समाजाची मागासलेली मानसिकता या तीन गोष्टींचा!कारण, आधुनिक शिक्षणाचा अभाव यामुळे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये वाढ होते आहे. लग्नाचे निर्णय आजही तरुणांना स्वतंत्र घेता येत नाहीत. फक्त मुलगी आहे म्हणून रात्री घराबाहेर फिरता येत नाही. मित्र-मैत्रिणी फक्त चर्चा करत थांबले तरी सगळ्यांच्या नजरा वळतात. काही मुलांचा मुलींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, सर्व घरची कामे मुलींनी केली पाहिजेत. या सर्वांची चीड येते आणि स्ट्रेस येतो. कधी आणि कसा सुधारणार समाज, असा विचारही येतो.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?खूप जण ओळखीचे आहेत; परंतु जवळचे मोजकेच मित्र-मैत्रिणी असल्यामुळे ‘फोमो’ येत नाही. एकटं वाटलंच तर शेअर करता येतं लगेच. व्यक्त व्हायला, विचार मांडायला ऑक्सिजननेच शिकवलं, यामुळे आनंदी कसं राहायचं हे शिकता आलं.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? माफ करा, पण हे दोन्ही पर्याय टोकाचे वाटतात. कारण कोणाएका पिढीला गंडलेली आहे असं नाही म्हणता येणार. आजची जनरेशन अजूनही कनेक्ट करायचा प्रयत्न करते. काहींना जमतं, काहींना नाही आणि काही असेही आहेत की कौटुंबिक विश्व आणि बाहेरचं विश्व (मित्र मंडळी) हे मिक्स नाही करत. कारण एकच, घरात वाद नको. जो-तो आपापला मार्ग शोधतो.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
तरुण प्रेमात पडताना नोकरी, घर, आई-वडील, जात पाहत नाहीत वा विचार करत नाहीत नंतर भानावर आल्यावर या सगळ्यांचा परिणाम लव्ह-लाइफवर होतो. मग सगळच कॉम्प्लिकेटेडहोऊन बसतं.
6. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?अभिमान वाटावा अशा खूप गोष्टी; पण शिथिल कायदे, ऊठसूट कोणत्याही कारणावरून हमरीतुमरीवर येणे, ध्वनिप्रदूषण, स्रियांवरील अत्याचार, अस्वच्छता, पर्यावरण जागृतीचा अभाव, कुठेही पचापच थुंकणे, या संतापजनक व लाज वाटणार्या गोष्टी भारतात आहेत.