- शिवशंकर निमसाखरे
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
आठवीत असताना पुढे शिकायला तालुक्याला आलो. गावाकडे मराठी शाळेत शिकलेलो, इंग्रजी शिक्षण अवघड जात होत. वर्गातली टापटीप पोशाखातली, अस्सल इंग्रजीत बोलणारी हुशार मुलं बघून मला न्यूनगंड चढला होता. मी शेवटच्या बाकावर बसायचो. कुणी समजून घ्यायचं नाही. काही दिवसांनी आम्हाला नवीन विज्ञानाचे शिक्षक आले. त्यांनी माझ्या मनातला न्यूनगंड अगदी झाडून काढला. त्यांच्यामुळेच मी दहावीत शाळेतून पहिला आलो. त्यांनी मुख्याध्यापकांशी बोलून माझी फी माफ केली. वडील वारल्यानंतरही त्यांनी मला खूप आधार दिला. आताही ते मला सतत मार्गदर्शन करत असतात. म्हणून ते माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि कायम राहतील.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
मी कोणत्याही गोष्टीचा अजिबात ताण घेत नाही आणि घेणारही नाही. मी प्रत्येक क्षण, घटना एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. एखाद्या वेळेस ताण आलाच तर मित्रांसोबत गप्पा मारल्या आणि एक कट चहा घेतला की सगळा ताण दूर होतो.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
संकट काळात मित्रांचा मला फक्त भावनिकच नाही, तर आर्थिक आधारही मिळाला. प्रत्येक निर्णयात मला माझ्या मित्रांची साथ असते. अशा मित्रांची सोबत मिळाल्यामुळे मी खूप आनंदात आहे.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला देण्याचा प्रयत्न आई-वडील करतात, त्यासाठी ते खूप मेहनत घेतात. पण आपल्याला एखादी वस्तू थोडी उशिरा मिळाली की आपण त्यांचा राग करतो, त्यांना उद्धटपणे बोलतो. मीसुद्धा तसेच करतो. मला वाटतं, आम्हीच त्यांच्याशी कनेक्ट करू शकत नाही.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? प्रेम ही खूप छान गोष्ट आहे; पण आमची जनरेशनच इतकी भंपक आहे, की आम्हीच प्रेमाला खूप क्लिष्ट करून ठेवलंय.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
मी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे आणि मला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचं आहे. गावातल्या वर्गमित्रांपैकी फक्त आम्ही चार जण सध्या शिकत आहोत. आणि मुलगी फक्त एक. आमच्या वर्गात मुलं खूप हुशार होती; परंतु त्यांना पुढे शिक्षण घेता आलं नाही. या गोष्टीचं मला खूप दुर्ख वाटतं. भारत हा तरुण लोकसंख्येचा देश आहे. ‘लोकसंख्याशास्त्रीय लाभांश’ प्राप्त करण्यासाठी तरुण लोकसंख्येचं रूपांतर शिक्षित, प्रशिक्षित व आरोग्यवान लोकसंख्येत होणं गरजेचं आहे. म्हणून मी प्रशासकीय सेवेत जाऊन मुलांना व शिक्षणासाठी प्रोत्साहित करायचं ठरवलंय.