बदली आणि नवीन नोकरी.
ही पूर्वी व्यावसायिक जगात सर्रास होणारी गोष्ट नव्हती. आता मात्र हे सर्रास होतं!
आणि नेमकी याच टप्प्यावर अनेकांची व्यावसायिक इमेज हमखास खराब होते.
होतं काय, तुम्ही मारे हुशार, टॅलण्टेड, हार्डवर्किग असाल; पण नव्या जागेतल्या लोकांना हे सारं काय माहिती. आणि तुम्ही जाता तेच तुमचा अॅटिटय़ूड घेऊन!
नेमका घोळ इथंच होतो.
नव्या जागेत कामाला सुरुवात केल्यावर काय, किती आणि कसं बोलावं याचा पाचपोच नसल्यानं हमखास लोकांचा तुमच्याविषयी गैरसमज होतोच. आणि आपल्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होतो.
मग नव्या नोकरीत वागायचं कसं?
1) एकतर सगळ्यांशी स्वत:हून बोला. हसा. प्रसन्न दिसा.
2) पण अति बोलू नका किंवा ढीम्मही राहू नका. काहीजण इतकं बोलतात, इतका भास मारतात की बाकीचे लोक म्हणतात जरा शहाणाच दिसतोय.
3) उर्मट, उद्धट टोन आहे का तुमचा हे पाहा. तसा असेल तर जरा सभ्यपणो बोला.
4) लगेच आपली मतं मांडू नका. आधी जरा गोष्टींचा अंदाज घ्या.
5) वरिष्ठांशी तर चांगलं वागाच पण सहकारी आणि हाताखालचे लोक यांच्याशी तुम्ही कसं वागता यावर तुमची पत ठरते.
6) हे सारं का करायचं हा प्रश्न पडतोच. पण हे केलं नाही तर नवीन जागेत पॉलिटिक्सला बळी पडावं लागतं. लोक गैरसमज करून घेतात आणि मग आपल्या कामात आडकाठी करतात.
7) सगळ्यांनी सहकार्य करून आपण त्या टीमचा भाग होणं हे खरं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मगच तोंड उघडा, नाहीतर पचका अटळ!