मेमोग्राफी, रेडिएशन, ऑपरेशन्स अशा चक्रातही वेदनेवर मात करण्याची जिद्द मागे हटू देत नाही, तेव्हा..
वेदना म्हणजे नेमकं काय? सतत दुखत, ठणकत राहणारा शरीरातील एखादा अवयव. एखाद्या विशिष्ट हालचालीमुळे संपूर्ण शरीराचा थरकाप उडवत नसेनसेतून पसरत जाणारी कळ, भीती, अवघडलेपण, अश्रू, असुरक्षितता, असहाय्यता.. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे दु:ख.
ब्रेस्ट मेमोग्राफी करताना तर ही वेदना अधिक तीव्र व्हायची. आपलं अर्ध उघडं शरीर, हॉस्पिटलची अनोळखी जागा, अनोळखी नस, मेमोग्राफी मशीनचा थंडगार स्पर्श. वेदनेआधीच डोळ्यात पाणी यायचं. मग ती नस माङो ब्रेस्ट मशीनच्य प्लेटमध्ये सरकवायची. हातानं वरची दांडी धरायची. मग वरून एक दुसरी प्लेट येऊन ब्रेस्टवर चेपली जायची. वेदनेच्या अगणित मुंग्या शरीरभर पसरायच्या. अजिबात हलायचं नाही. पोङिाशन थोडी जरी हलली तरी पुन्हा हा वेदनेचा प्रवास करावा लागणार. दहा-पंधरा सेकंद मेमोग्राफी मशीन आणि माङया डोळ्यातलं पाणी यांची जुगलबंदी चालायची. मी मनात आकडे मोजणं सुरू करायचे. 5 सेकंदांनंतर ती वेदना संपूर्ण शरीरभर पसरायची, मग अचानक मशीनची प्लेट हलायची. ब्रेस्ट रिलिज व्हायचा. मुंग्या निघून जायच्या. संवेदना जाग्या होत पुन्हा मशीनचा गारढोणपणा जाणवायला लागायचा. ‘हो गया’ नस म्हणायची. मी धूसर डोळ्यांनी चेजिंग रूममधे येऊन माङो कपडे घालायचे. चेहरा, मान, छाती लाल व्हायची वेदनेनं, दु:खानं, असहाय्यतेनं आणि कदाचित लाजेनं. जवळपास आठ ते दहावेळा माझी मेमोग्राफी झाली असेल.
मेमोग्राफी रूमच्या बाहेर आल्यावर काहीवेळ सुन्न व्हायला व्हायचं. बाहेर बाबा, मावशी, काकू कोणीतरी असायचं. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपण खूप लांबचा प्रवास करून इथपत आलोय असं वाटायचं. मेमोग्राफी करण्याआधी आणि केल्यानंतर बाहेर आलेली ‘मी’मधे खूप काळ लोटल्यासारखं वाटायचं. बाहेर पुढच्या पेशण्ट्सची लगबग, हातात टाटाची फाइल, रिपोर्ट्स सांभाळणारे त्यांचे नातेवाईक पाहून ‘मी सुटले..’ अशी हुश्श करणारी भावना मनात दाटून यायची. मेमोग्राफी केल्यानंतर त्वचेवर उठणारा लालसरपणा आणि वेदना ही क्षणिक असायची; परंतु अंतर्बाह्य हलवून, हादरवून सोडणारी असायची.
काही वेदना या सहन करण्यापलीकडच्या असतात. इंजेक्शन देतानाची वेदना सहन करण्यासारखी, ब्रेस्ट मेमोग्राफीची वेदना असह्य परंतु क्षणिक. ती वेदना विरून जायची. पण तोंडातून किंकाळी बाहेर पडणारी वेदना होती ती रेडिएशनसाठीचं मार्किग करण्याची. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. अंधारी खोली. डोक्यावरती एक दिवा. शरीराच्या ज्या भागाला कॅन्सर झाला तिथे रेडिएशन देण्यासाठी आधी शरीरावर विशिष्ट प्रकारच्या खुणा कराव्या लागतात. या खुणा म्हणजे छोटी टिंब असतात. आणि ही टिंब जोडून रेडिएशन देण्याच्या जागेभोवती आउटलाइन काढली जाते. हा, फक्त ही आउटलाइन काढण्यासाठी पेन किंवा पेन्सिल न वापरता धारधार सुईचा वापर केला जातो. माङो दोन्ही हात वर दांडा धरलेले आणि एक धारधार वेदना सपकन इथून तिथे प्रवास करून गेली. माङया नकळत एक अस्फुट किंकाळी माङया तोंडातून बाहेर पडली आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं. मला मी खूप सोशीक वाटत होते. पण ते मार्किग भयंकर होतं. ती वेदना मी सहन करू शकले नाही आणि त्यामुळेच त्याची भीती अधिक वाटली. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा शरीरातले सगळे स्नायू आखडून धरता. डॉक्टर सांगत असतात, ‘‘रिलॅक्स, शरीर सैल सोडा, लांब लांब श्वास घ्या.’’ किती विरोधाभास. कसबसं ते मार्किग संपवून मी बाहेर आले. मात्र तिही वेदना अल्पायुषी होती. त्या वेदनेनं पुढे माझा पाठलाग केला नाही. मात्र आजही रेडिएशनची ती टिंब माङयासोबत आहेत. त्या वेदनेची आठवण म्हणून, कदाचित.
दीर्घकाळ चाललेली वेदना म्हणजे सजर्रीनंतर घातलेल्या टाक्यांची वेदना. माङया डाव्या हाताच्या काखेत छोटा छेद देऊन तिथली लिंफ नोड काढून टाकण्यात आली होती. ब्रेस्टमधे उद्भवलेला कॅन्सर, हात, मान, खांदे अशा इतर भागात पसरू नये यासाठी काळजी म्हणून हे सारं करण्यात आलं. आधी एक-दोन दिवस बॅण्डेज होतं. म्हणून ती वेदना दिसली नाही. पण काही दिवसांनंतर पाहिलं तर आठ ते दहा स्टेपलरच्या पीन्स मारल्याप्रमाणो पीन्स होत्या, ते टाके होते हे मला नंतर समजलं. आणि त्याच्या खाली पाहिलं तर त्वचेला भोक पाडून एक नळी आत घातली होती, दूषित रक्त वगैरे जमा करण्यासाठी त्या नळीला खाली एक ड्रेनेज इव्हॅक्युएटर बसवला होता. ती नळी आणि टाके नंतर काढून टाकणार असं सांगण्यात आलं आणि भीतीच्या वेदनेनं माझी झोप उडवली. हात खांद्याच्या वर नेता येत नव्हता. हात लांबवून कोणत्याही वस्तूर्पयत पोहचता येत नव्हतं. सजर्रीच्या दुस:या दिवशी डॉक्टर येऊन व्यायाम सांगून, दाखवून गेले. तो व्यायाम दहावेळा करून एकदा मोजायचा होता आणि असे दहा सेट्स दिवसभरात करायचे होते. दोन्ही हात वर नेत कानाला चिकटून एकमेकांना जोडायचे. या व्यायामामुळे ऑपरेशन केलेला हात आखडणार नव्हता. हा व्यायाम करताना डाव्या काखेतले टाके तटतटायचे. वेदनेची लहर शरीरभर सणसणत मेंदूत धडकायची, पाठ घामानं आणि डोळे पाण्यानं भिजायचे. संपूर्ण शरीरभर थरथर जाणवायची. मी डोळे मिटून घ्यायचे. बाबा दर तासाला या जीवघेण्या व्यायामाची आठवण करून द्यायचे आणि स्वत: मोजायचे.
डाव्या हाताची सजर्री आणि उजव्या हातावर किमोथेरपीसाठी सतत सलाइन लावल्यानं त्या हाताची रक्तवाहिनी दुखावलेली. त्यामुळे व्यायाम करताना दोन्ही हातातील वेदनेचा दाह आता जीव घेतो की काय, असचं वाटायचं. डोकं भणभणून जायचं. वेदनेचं हे रूप मला तर तासाला व्यायाम करताना भंडावून, त्रस्त करून सोडत होतं. एकदा हात वर केल्यावर काखेत बसणारा ताण, त्यातून पुन्हा पुन्हा, नव्यानं जन्म घेणारी वेदना नखशिखांत हादरवणारी होती. पुढचे अनेक दिवस ही वेदना वस्तीला आल्यासारखी मला चिकटून होती, त्यात भर होती ती ड्रेनेज इव्हॅक्युएटरची. ‘टाके काढणार तेव्हा नळीही काढू’ डॉक्टरांचे हे शब्द मला पुढे काही दिवसांनी भोगाव्या लागणा:या वेदनेची सतत आठवण करून देत होते. आपल्या शरीराला भोक पाडून काखेतून एक नळी आत घातलीय. ती नळी माङया शरीरात किती फूट खाली आहे आणि ती कशी काढणार बाहेर? खेचून की ओढून की कापून हे सगळे प्रश्न मनाचा थरकाप उडवणारे होते. अखेर तो दिवस उगवला. टाके आणि ती नळी काढण्यासाठी टाटाला जायचं होतं. मी अंघोळ केली आणि खोलीत आले तर एकदम हलकं वाटलं. मी माङया डाव्या हाताला पाहिलं तर ती नळी माङया काखेतून आपणहून बाहेर येऊन खाली गळून पडली होती. माङया पायाखालची जमीनचं सरकली. मला वाटलं की आता पुन्हा ही नळी आत घालवी लागणार. घाबरून आणि विचार करून कंटाळा आला. पण टाटाला पोहोचल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘अरे वा, नळी बाहेर आली. दॅट्स ओके.’ शरीराची स्वत:ची रिपेअर करण्याची सिस्टिम असते. गरज संपल्यावर शरीरानंच ती बाहेर ढकलून तिचं काम संपवलं. मी अवाक्. एका वेदनेतून सुटका झाल्याचा आनंद, आश्चर्यही; पण स्वत:च्याच शरीराबद्दल नवी गूढ माहिती मिळाल्यानं थोडी भीतीही. या नादात ती नर्स एक मोठ्ठं वेगळीचं जाड सुई असलेलं इंजेक्शन तयार करून घेऊन आलीये हे मी साफ विसरले. ती म्हणाली, थोडं दुखेल. मी म्हटलं कुठे. आणि सणकन एक वेदना माङया डाव्या ब्रेस्टमधून निघून नेहमीप्रमाणो संपूर्ण शरीरभर पसरली. माझा श्वास थांबला बहुतेक. तिनं ते इंजेक्शन बाहेर काढलं तेव्हा त्यात काळपट लाल रक्त होतं. बहुतेक दूषित रक्त. ही अनपेक्षित वेदना. या वेदनेबद्दल मला माहितीच नव्हतं. त्यामुळे माझी तयारीच झालेली नव्हती. नियतीनं बहुदा नळी काढण्याची वेदना कॅन्सल करून ती अशी एॅडजेस्ट केली असावी.
आता द मोस्ट डिफिकल्ट वेदना. त्या स्पेटलच्या पीन्स कशा निघणार या विंवचनेत मी! सिस्टर म्हणाली, हात वर करा, मी म्हटलं दुखणार का खूप? ती म्हणाली नाही. मी डोळे मिटता मिटता तिच्या हातात पक्कड असल्याचं ओझरतं दिसलंच. टक् टक् आवाज आला. पण नुसताच आवाज, नो वेदना. दोन तुकडे झालेल्या पिना डोळे किलकिले करून पाहिलं तेव्हा मला दिसल्या आणि बारीक मुंगी चावल्यासारखी छोटी वेदना आली. पण मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. फालतू. मी विचारलचं त्या सिस्टरला, जास्त नाही दुखलं? तर तिनं मला पुन्हा शरीराचा म्हणजे त्वचेचा महिमा सांगितला. त्वचा पुन्हा एकसंध व्हायला सुरुवात झाल्यानं पिनांची ग्रीप सैल पडली. त्यामुळे त्या काढताना वेदना झाली नाही.
आता या क्षणी तरी माङया आयुष्यात कोणतीही वेदना नव्हती. नळी स्वत:हूनच चालती झाली होती. पिना गतप्राण होऊन माङयासमोरच पडल्या होत्या. मी वेदनेवर मात केली होती आणि त्यामुळेच खूप खूश होते. नाही म्हणायला तो व्यायाम आणखी काही महिने करायचा होता. पण तो आता सुसह्य झाला होता. व्यायाम करून करून माझा आखडलेला उजवा हात सुटला होता. व्यवस्थित काम करत होता. डावा हात थोडा त्रस देत होता.
पण चलता है.. आय कॅन मॅनेज दॅट वेदना.. वो भी क्या याद रखेगी?
शची मराठे
shachimarathe23@gmail.com
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)