श्रुती साठे
आता तुम्ही म्हणाल, फॅशनच्या दुनियेत कधी काय ट्रेंड मध्ये येईल याचा काही नेम नाही! कित्येक र्वष आपण आपल्या आजीची, आईची एखादी छानशी साडी घेऊन त्याचा ड्रेस शिवत आलोय! हे ड्रेस सहसा रोजच्या वापरासाठी म्हणून ठेवत आलोय आपण. अगदीच भरजरी, गर्भरेशमी साडीचा लेहेंगा आणि कॉन्ट्रास्ट चोली किंवा अनारकली कुर्ता हा घरगुती कार्यक्रमांना वापरण्याची आपली हौस बरीच वर्ष पूर्ण होतेय. पण आता सेलिब्रिटी म्हणवणार्या कलाकारांनी नावाजलेल्या अवॉर्ड शोमध्ये हे साडीचे ड्रेस करून घालावेत म्हणजे नवलच नाही का? आपल्याला त्यांना नेहमीच ब्रँडेड, महागडय़ा कपडय़ात बघायची सवय असते, असं असताना त्यांनी एकदम अस्सल पैठणीचा ड्रेस शिवून घालणं हा बदल वेगळा पण फ्रेश वाटला.
अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात अभिज्ञा भावेचा पैठणी साडीतून तयार केलेला ड्रेस अनोखा होता. जरीकाठाच्या बाह्या असलेला पेपलम टॉप त्यावरील पानाच्या आकाराचा पुढे कट आणि त्यावर पैठणीचा पदर वापरून केलेलं पॅचवर्क यामुळे हा ड्रेस सुंदर दिसला. विशेष म्हणजे या टॉपसह टिपिकल लेहेंगा, पलाझो न वापरता अभिज्ञाने केलेला धोती स्टाइल सलवारचा वापर सुरेख दिसला. त्यावर वापरलेली अँटिक गोल्ड ज्वेलरी या साडी ड्रेसला शोभून दिसली. जे तिनं केलं तेच राणादाच्या अंजलीबाईंनीही केलं. अक्षया देवधरचा साडी ड्रेस लूकसुद्धा सुटसुटीत पण मोहक होता. ड्रेसला असलेल्या लांब जरीच्या बाह्या, मागे दिलेला डीप कट व त्यावर केलेली एम्ब्रॉयडरी, पुढच्या लेअरला असलेला मोठा पैठणीचा काठ असा साडीचा केलेला वापर खूप नावीन्यपूर्ण वाटला. अक्षयाने त्याबरोबर अगदी योग्य अशी ज्वेलरी वापरून लूक पूर्ण केला. या साडी ड्रेसच्या नवीन ट्रेंडमधून काय पाहायला मिळतं? वर्षानुवर्षे चालत आलेले त्याच त्याच पॅटर्नचे साडीचे सलवार कमीज, कुर्ता न शिवता अभिज्ञा किंवा अक्षयासारखं अनोखं फ्युजन डिझाइन करून पहा. ट्रेण्ड तो है!