- श्रुती साठे
बरोबर वाचताय तुम्ही. झोपेतून उठल्यावरचा अवतार असंच त्याचं मराठीत भाषांतर होऊ शकतं. सध्या हाच एक मोठा ट्रेण्ड आहे असं सांगितलं तर खोटं वाटेल ना? पण हे अगदी खरंय! आपला आवडता लूज फिट, हवेशीर, अतिशय कम्फर्टेबल पायजमा सध्या ट्रेण्डमध्ये आहे. येत्या उन्हाळ्यात टाइट लेगिंग्स, जीन्स यापासून स्वत:च्या पायांची सुटका करा आणि वॉर्डरोब छान रंगेबिरंगी पायजम्यांनी भरून टाका!पायजमा घालून का कॉलेजात आणि ऑफिसात जायचं असं मनात आलं असेलच; पण जरा थांबा.
प्रियांका चोप्रा थेट ग्रॅमी अवॉर्डला जर पायजमा घालून जाऊ शकते तर आपण कॉलेजात किंवा ऑफिसला का जाऊ शकत नाही?प्रियांका चोप्राने नेहमीच्या इव्हनिंग ड्रेस, गाउन्सला सुट्टी देत चक्क पायजमा लूकला पसंती दिली ! तिचा सिल्कचा रोब आणि पायजमा एक अनपेक्षित हटके लूक देऊन गेला. अॅक्शन गर्ल समजली जाणारी तापसी पन्नूसुद्धा स्ट्राइप पायजमा आणि जॅकेटमध्ये एकदम ट्रेण्डी दिसली. त्याच्या जोडीला वापरलेले मोकासीन प्रकारातले शूज उठून दिसले. हे शूज आपल्या नेहमीच्या वापरासाठी सुटसुटीत असतात. दीपिका पदुकोणने फ्युजन लूक निवडत सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल्या पायजमा आणि टॉपमध्ये सुरेख दिसली. वेलवेटवर केलेले विंटेज फ्लोरल प्रिंट आणि त्याला शोभणारे मॅट गोल्ड फ्रीन्जेस मस्त लूक देऊन गेले.
एकंदरीतच कम्फर्टेबल फॅशन करण्याचा ट्रेण्ड चालू झालाय. रुंदीला मोठ्या असलेल्या या पॅण्ट्स उन्हाळ्यासाठी अतिशय योग्य ठरतात. त्यावर मग आवडीनुसार लॉँग, शॉर्ट टॉप वापरता येतो. प्लेन, प्रिंटेड, वेलवेट, एम्ब्रॉयडरी केलेल्या या वाइड-लेग पॅण्ट्स ट्रेण्डी दिसतात.