- माधुरी पेठकर
ओम नावाचा एक सणकी फिल्ममेकर. घरी बायकोशी भांडण होतं. त्याला डोक्यातला राग शांत करायचा असतो. स्वतर्च्या फिल्मसाठी मालमसालाही शोधायचा असतो. हातात गिटार आणि गळ्यात कॅमेरा अडकवून ओम मग रतनवाडी नावाच्या एका गावात पोहोचतो. गोल गोल घाट, आजूबाजूला हिरवी दाट झाडी. मधोमध गावात शिरणारा एक छोटासा रस्ता. झुळझुळ वाहणारी नदी, नदीवर एक छोटासा पूल. पुलापलीकडे छोटी छोटी घरं. छान पावसाळी हवा. ओम गावाच्या प्रेमातच पडतो. गावात दोन दिवस राहायचं ठरवतो. गावातल्या एका छोटय़ा धाबेवाल्याच्या गेस्ट हाउसमध्ये राहण्याची सोय होते. आणि...? - विकास दाणी लिखित/दिग्दर्शित ‘पंख’ या हिंदी शॉर्ट फिल्मची ही संथ लयीची देखणी सुरुवात. गावाच्या सौंदर्यावर फिदा झालेला ओम आता आपल्या फिल्ममधून गावाचीच एखादी गोष्ट सांगेल असं वाटू लागतं. पण, समोर रत्ना उभी राहाते. रतनवाडीतली रत्ना एवढीच तिची ओळख. ती असते गावातल्या त्या धाबेवाल्याची शाळेत जाणारी मुलगी. शाळा आणि धाबा एवढंच तिचं आयुष्य. मोठा भाऊ आणि वडील ही तिच्या आयुष्यातली माणसं. आई गमावलेल्या रत्नाच्या चेहर्यावर हरवलेपणाच्या खुणा कायमच राहातात. जन्मताच आई गेल्याचा दोष म्हणून रत्नावर घरात कोणीच प्रेम करत नाही. तिच्या गोड गळ्याचं, तिच्या चांगल्या गाण्याचं कौतुक कोणीच करत नाही. उलट तिच्या गाण्याचा तिचे वडील रागच करत असतात.
ओम रत्नाशी बोलतो. तिच्यासोबत गावात फिरतो. त्याची नजर एका बाजूला गाव टिपत असते आणि दुसरीकडे रत्नाचं मनसुद्धा. तिच्या गळ्यातला गोडवा ओमला आवडतो. तो तिला दाद तर देतोच पण तिच्या हातात स्वप्नांचे पंखही देतो. ‘तू चांगली गायिका बनू शकते, माझ्याबरोबर मुंबईला चल’ असं ओम तिला सहज म्हणून जातो. स्वतर्च्या इच्छा, आकांक्षा इतकंच कशाला स्वतर्ची ओळखही स्वतर्ला नसलेल्या रत्नाला ओमची एक छोटीशी दाद, सहज सुरातलं एक आश्वासन मोठी उमेद देतं. आपण काहीतरी होण्याची इच्छा पहिल्यांदा तिच्या मनात आकार घेते. रिकाम्या वाटणार्या तिच्या डोळ्यांत पहिल्यांदा चमक येते. रतनवाडीतल्या रत्नाला ओम ‘रत्नाची रतनवाडी’ अशी नवी ओळख देतो. ओमविषयी रत्नाला आपुलकी वाटते, खात्री वाटते. ती त्याला दादा म्हणू लागते. दादानं दिलेल्या उमेदीच्या पंखाच्या बळावर आपण उडू शकतो हे रत्नाला ठामपणे वाटू लागतं. रत्नासोबत प्रेक्षक म्हणून आपल्यालाही हेच वाटून जातं. ओमच्या दोन दिवसाच्या सहवासात रत्नाला मिळालेले उमेदीचे पंख हे खरेखुरे असतात की नुसताच आभास हेच 30 मिनिटांची ‘पंख’ ही हिंदी शॉर्ट फिल्म दाखवते. फिल्म संपते तेव्हा आपल्या गळ्यात आवंढा दाटून आलेला असतो. शॉर्ट फिल्मच्या रुपात एक आर्ट फिल्म बघण्याचं समाधानही ही फिल्म देते. संवाद मोजके असले तरी या फिल्ममधलं पाश्र्वसंगीत आणि गीत यामुळे प्रेक्षकांर्पयत जे प्रत्यक्षात दिसतं त्याच्या पलीकडचा अर्थ पोहोचतो. आणि यामुळेच ही फिल्म अधिकच हृदयस्पर्शी झाली आहे. विकास दाणी हा या फिल्मचा लेखक, दिग्दर्शक. ओमचा चेहरा घेऊन विकास ‘पंख’मधून स्वतर्चीच गोष्ट सांगतो आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘पोस्टमास्टर’ या कथेनं प्रेरित होऊन विकासनं ‘पंख’ या आपल्या फिल्मची मांडणी केली आहे. विकास मूळचा छत्तीसगडचा. दुर्गापूरच्या आयआयटीमधून इंजिनिअर झालेल्या विकासनं मुंबईत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेत साडेतीन र्वष नोकरीही केली. पण, आपल्याला आयुष्यात जे हवं आहे ते या नोकरीतून मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यानं आपल्या फिल्म मेकिंगच्या छंदाचं बोट पकडायचं ठरवलं. त्यासाठी मुंबईत त्यानं ‘फिल्म मेकिंग’चा छोटा कोर्सही केला. यातून त्याला गोष्टी सांगणार्या फिल्म बनवण्याचा आत्मविश्वास मिळत गेला. ‘पंख’ विकासला स्वतर्ची फिल्म वाटते. स्वतर्पासून, घरापासून पळू पाहणारा एक फिल्ममेकर. असाच पळत पळत भंडारदार्याजवळच्या ‘रतनवाडी’ गावात पोहोचतो. त्याला तिथे मनाला शांतता मिळते. गावातल्या सौंदर्यानं आनंदही मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिल्मसाठी एक गोष्टही मिळते. विकास म्हणतो की त्याला आधी फिल्मचं लोकेशन सापडलं आणि मग फिल्मची स्टोरी सापडली. पंखच्या बाबतीत त्याचा प्रवास म्हणूनच उलटा झाल्याचं तो म्हणतो. ‘रतनवाडीत मी माझ्या फिल्मची गोष्ट लिहित होतो. तिथे एक मुलगी मध्ये-मध्ये येऊन माझ्याशी बोलत होती. माझ्या गोष्टीत डोकावत होती. मग मी विचार केला की या मुलीला केंद्रिभूत करूनच गोष्ट मांडली तर’ आणि मग मी त्या मुलीला डोळ्यांसमोर ठेऊन कथा लिहिली’. विकासच्या या प्रयत्नाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून दाद मिळाली. कॅनडाच्या ‘मॉन्ट्रियल’ फिल्म फेस्टिव्हल, ‘शारजा फिल्म फेस्टिव्हल’ आणि भारतातल्या ‘केरळ फिल्म फेस्टिव्हल’मध्येही ‘पंख’ची विशेष दखल घेण्यात आली. एकाच वेळी डोळ्यांना सुखावणारी आणि हृदयाला भिडणारी विकासची ‘पंख’ ही फिल्म.
ही फिल्म पाहण्यासाठी...
https://www.youtube.com/watch?v=dEtP5iH8JFA