- कलीम अजीम
1. औरंगाबाद विद्यापीठातील रिडिंग हॉलसमोरील हिरवळीवर मुलांचा घोळका गप्पात रंगलाय. सिंगल टिफिनमधून दोन-दोन जणांनी हातं ओली करत जेवणं केलीत. तासाभरानंतरही बैठकीची जागा तसूभरही हलली नाही. काहीजण स्मार्ट फोन्सवर बोटं आदळताहेत, पलीकडे काहीजणांनी पुस्तकात डोकी खुपसलीत. दुपारी दोनला जेवायला बाहेर पडलेले चारपर्यंतही मेन कॅण्टीनसमोरच आहेत. चहानंतर पाचपर्यंत रिडिंगकडे कूच; खुर्ची भेटली नाही की पुन्हा बाहेरचा रस्ता. तोपर्यंत कुठंतरी व्याख्यान असल्याची माहिती कानावर आदळते. काहीजण म्हणतात, तापडियाला तमक्याचं लेक्चर आहे. कुणी म्हणतं, चला गेटवर राऊण्ड मारून येऊ या. अभ्यासाचा ताण हलका करण्यासाठी रिडिंगमधून बरीचजण पांगलीत. आठला जेवणाच्या डब्यासमोर घोळका. जेवणं आटोपताच विद्यापीठ गेटवर शतपावलीसाठी पुन्हा गर्दी होते. काहीजण मोनुज हॉटेलला गप्पांचं फड रंगवतात.
विद्यापीठासह मिलिंद कॉलेज, घाटी, फॉरेन्सिक इस्न्टिट्यूटमधील अभ्यागतांचे प्रश्न आणि समस्या सारख्याच. सर्वांची सर्चा एकच, तलाठीचे फॉर्म सुटलेत इथंपासून ते फेलोशिप, गाइड, स्नॅपसिस, पेट, आरआरसी, शोधनिबंध, पब्लिशर्स, चर्चासत्र, एसटीआयची तयारी इत्यादी विद्यार्थीज्वलंत प्रश्न. चारएक तासाची चर्चा पोकळी आणि रिक्तपणा भरवते. दहा-अकराला विद्यापीठीय घोळके होस्टेलकडे परतात. इकडे वसतिगृहात प्राइम-टाइम बघून राष्ट्रवादावर काहींनी वाद सुरू केलाय. प्रत्येक विचारसरणीचे प्रवक्ते विद्यार्थ्यांमध्ये घुसलेत. जशी रात्र चढते तसं मांड्या घातलेलं रिंगण वाढत जातं. रिडिंगकडून आलेले दोन-दोन जणांचे ग्रुप थेट वसतिगृहात शिरतात. इकडे चर्चा कुठलंही निष्कर्ष न काढता बरखास्त होते. यानंतर होस्टेलच्या रूममध्ये रात्री दोनपर्यंत सामूहिक सिनेमाचा आस्वाद.काहीजण भल्या सकाळीच आवरून थेट रिडिंगच्या खुर्चीवर स्थिरावतात. काही सॅक घेऊन हिस्टरी गार्डनमध्ये पुस्तकात डोकी रूतवतात. रोटेशनमधले विभागाकडे, तर होस्टेलनिवासी मेन बिल्डिंगमध्ये व्याख्यानाला. काहीजण ह्युमॅनिटीज, नाट्यगृह, फुले हॉल, जर्नालिझम डिपार्टमेण्टला कार्यक्रमांसाठी दौरे करतात. अभ्यासू, जबाबदार दरवर्षी रोटेशनमध्ये असतात. जुने जाणार नवे ‘स्वप्नाळू’ येणार; पण काहींचा मुक्काम पंचवार्षिक योजनेसारखा. राहायला होस्टेल, काहींचा सिनिअर म्हणून रूबाब, तर काही पैरासाइडचे घुसखोर. मराठीतून इतिहास-राज्यशास्त्र-लोकप्रशासन-अर्थशास्त्र-जर्नालिझम असा अनेकांचा डबल पिजीचा प्रवास. एक पीजी करून ‘चान्स’ (सोयीचा) नाही म्हणत आणखीन एक पोस्ट ग्रॅज्युएशन. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सोशल वर्कपूरक पीजीची लिस्ट वाढतेय; पण ग्लोबल मार्केटकडे रोजगार नाही. वेळ व वय निघून जाण्याचं कुणाला पडलंय. फेलोशिप-फ्रीशिप-स्कॉलरशिप मिळवण्याचा कमी, पण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला वेळ (वर्षे) जुळवण्याचा सगळा खटाटोप. कुठल्याच तासिका नियमित नाहीत. वर्षभरात अन्य कोर्सला शिफ्टिंग. नाममात्र दरात नवा प्रवेश, सगळीकडे नुसती बोंबाबोंब.. सर्वांची फक्त विषय ओळख. लायब्ररी कार्ड मिळवून रिडिंगमध्ये बसण्याची सोय सारी.. घरची परिस्थिती कुटुंब सांभाळण्यापुरती. अशा अनेकांची पाल्ये कमवा-शिका, स्वयंरोजगार करून शिक्षित होण्यासाठी धडपडताहेत. विद्यापीठ परिसरात भंडारा खाऊन वर्षे सरतात. हाती उरली गरिबीचे उणे-दुणे आणि डावलल्याची तीव्र भावना.. शिक्षणाची दिशा आणि मार्गदर्शन नसल्याने पिढीचे आयुष्य बरबाद होतंय.
एमपीएससी, तलाठी, एसटीआय, सेल टॅक्स, पोलीस/सैन्य भरती, बँकिंग परीक्षांच्या ‘तयारी’ इतरांना सांगण्यासाठी. ‘खुद के गिरेहबान में झाँके तो बरंच फाटलेलं’ कुठंच काही नाही. बघावं तिथपर्यंत साचलेपण.. पैसा नसल्यानं गावा-घराकडे जाणं नाही, कुटुंबापासून तुटलेपणाचा भाव.. अशीच विद्यापीठाच्या बंदिस्त जेलमध्ये अनेक वर्षं एकट्यानेच सरतात. कुंठा, नैराश्य, तुटलेपण, साचलेपण, हिस्टेरियातून अस्वस्थ पराभवी कंपूंचे थवे दिवसेंदिवस वाढताहेत. जिद्दी गुणवत्ता आणि कौशल्य हस्तगत करून पुढे निघून गेलं. संधीचे लोंढे वर्ण आणि वर्ग संघर्षात अडकले. विद्रोही असूनही ते आव्हानांना तोंड देण्याचा आत्मविश्वास कमावू शकले नाही. व्यावसायिक कोर्स करूनही आधुनिक जगातील स्पर्धेला तोंड देता येत नाही. एका विषयावर सलग बोलणं नाही. निव्वळ पुस्तकी गप्पा व्यावहारिक माहिती शून्य.. वरून ‘आपल्याला संधीच देत नाही’ म्हणण्याची कसरत वारंवार सुरू असते. परिणामी एम.फील आणि पीएच.डी.च्या नावाने दरवाज्याआड लपण्याची सोय. पाच वर्षे आई-बाप, बॅचमेटना लॉलीपॉप. दरम्यानच्या काळात नोकरी मिळवण्याची शहरं अस्पृश्य होतात. शासकीय नोकरीच्या आशेवर वर्षे लोटली. घरचे सांगतात पोरगं शिकतंय आमचं...2. पुणे विद्यापीठाचं सहा नंबर होस्टेल, अधिकृत पैरासाइडच्या (चोरून राहणारे) हक्काचं ठिकाण. पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहण्यासाठी मोफत जागा असल्याने अनेकांसाठी ‘सेफ झोन’ ठरला. (पण कधी कधी सेफ झोन संधी गमावण्याला कारणीभूत ठरतात.) एका रूममध्ये किमान सातजण, तर कमाल १० चे संख्याबळ. इथं सेट-नेट-एम.फील झालेले कितीतरी वर्षांनी पडून आहेत. काहीजण पीएच.डी.चे. डिग्री व गुणवत्ता असून, आत्मविश्वास गमावलेले सगळेच. नांदेड, अमरावती, लातूर, बीड, अकोला, जळगाव, यवतमाळ, सांगली, सातारा, नाशिकच्या ग्रामीण भागातून आलेले. आर्थिक दुर्बल, काही मागास तर अल्पभूधारकांचे बहुसंख्य लोंढे दरवर्षी विद्यापीठात स्थिरावतात. लाजºया-बुजºया मुलींची संख्याही लक्षणीय. रिफेक्टरीतून स्वस्तात जेवण, (फक्त दोन वेळच्या जेवणासाठी केटरिंगचं काम स्वीकारणारे अनेकजण) दोन हजारात महिना पुरा. घरचे मुलं शिकतात म्हणून पाकिटे पाठवतात. मोकळ्या वातावरणात जेलचा अनुभव, काहींचा विद्यापीठ गेटचा वापर फक्त गावाकडून येण्या-जाण्यासाठी. अशांसाठी पुणे विद्यापीठ बंदिस्त खेडं. अनेकांना काही हजार मीटरवरचे शहर अज्ञात. काहीजणांत चळवळीच्या वळवळी. चळवळीवाले ‘मॅनपॉवर’ साठी होस्टेलच्या रूमबैठका घेतात. रशियन राज्यक्र ांती, मोसादचं संघठन, राष्ट्रवादाचे पापभिरू लेक्चर रात्र-रात्र चालतात. महिण्यातून सात-आठजण चळवळीवाल्यांच्या खिशात हमखास येतातच. करिअर शिक्षण चळवळीवाल्यांच्या नादी लागून बरबाद. उरली-सुरली कसर राजकारणी पूर्ण करतात.
व्यावसायिक, आयटी, सायन्स विषयातले दरवर्षी रोटेशनमध्ये. दोन वर्षं संपली की विद्यापीठ गेटबाहेर. यांना होस्टेल व निसर्गरम्य परिसराचा कसलाच मोह नसतो. ते चळवळीच्या सावलीला परके. मेरिट घेऊन रोजगार-स्वयंरोजगार मिळवतात. ५० वर्षांनी मुलांना शिकायला पुन्हा इथंच पाठवतात. पाल्याचंही रोटेशन ठरल्यानुसार होतं. व्हॉट्सअॅपच्या मास मोटिव्हेशनमधून काहीजण विद्यापीठातून बाहेर पडतात. एखादा व्हिडीओ बघून पुण्यातील पेठेत स्पर्धा परीक्षांच्या जुगारात पैसा लावण्याची तयारी. घरच्यांना स्वप्न दाखवून इतकं इमोशनल करायचं की बाप तिकडे एकरभर विकून सगळा पैसा पाठवतो. काहींचे आई-बाप मेहनतीचा घाम करून पैसा पुरवतात. पोरगं/पोरगी एमपीएससी-यूपीएससी करतेय म्हणून स्वप्न साठवत पालकही मास मोटिव्हेशनचे क्लास करतात. मह्या पोरगं साहेब हुईन...! आईकडे कौतुकाला बोटं नाहीत मोडण्यासाठी.. आमचा एक मित्र म्हणतो, मास मोटिव्हेशनच्या व्हिडीओ करणाºयांना संपवा एकदा.
आर्थिक दुर्बलांना थेट भरती आणि वशिल्याशिवाय नोकरीची स्वप्ने.. भारावलेली ही पिढी अडकते महानगरात स्पर्धा परीक्षांच्या माया बाजारात, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आर्थिक कुवत व वर्गवारीनुसार शहरे ठरलेली. कुणी तलाठ्याला लाच दिलीय, कुणाचं तहसीलदाराकडे पैशाअभावी काम रखडलेले. घरकूल, अन्नपूर्णा, संजय गांधी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी लाच दिलेल्या मध्यमवर्गीय पिढींना साहेब होण्याची स्वप्ने.. बागायतदार-ऊस-द्राक्ष पट्ट्यातील शेतकरीपुत्रांकडे वेगळ्याच वर्गीय अस्मिता, जातीत वरचढ, कुटुंबात मान, मित्रांमध्ये मिरवण्याची हौस अनेक कारणे साहेब होण्याची..! पण एकही अटेम्ट निघत नसल्याचे दु:ख डोंगराएवढे मोठे. तालुका, जिल्हा, विभाग, प्रदेश, जात, वर्ण अनेकजण विभागवार मित्रांच्या कंपूत स्थिरावतात. रात्रंदिवस मनाची द्विधा करणाºया गप्पा, पाच वर्षांनंतरही करतोय ते बरोबर ठरवायचे वांधे. यातून अलिप्त राहून एखादाच अन्सार शेख घडतो.
३‘मायानगरी’, ‘स्वप्नांचे शहर’, ‘शिक्षणाचं माहेरघर’, ‘पूर्वेचं ऑक्सफोर्ड’, ‘सांस्कृतिक शहर’ प्रसारमाध्यमांनी शहराचं मार्केटिंग केले. वस्तू विकण्यासाठी ग्राहकांची इनसिक्युरिटी शोधायची हा मार्केटचा नियम.. त्यानुसार दुसºयाचे उणे काढून आपल्या श्रेष्ठत्वाचं बाजारीकरण करण्यात आलं. शिक्षणाचं मटेरिअल मार्केट कॅश करण्यासाठी पालकांची पिढी मुलांच्या जिवावर उठली. पालकांनी इंजिनिअरिंगनंतर, आयटीचे लोंढे बड्या शहरात रवाना केले. इथलं शिक्षण मार्केट आणि संस्थानिक तुम्हाला तुच्छ समजणारं. मीडियातून, खासगीतून तुम्हाला हिणवणारं. तुमचं सगळ वाईट, तिकडे सगळा करप्शन, शिक्षणाचा बाजार, गुणवत्ताशून्य शिक्षण, स्पर्धा तुम्हाला काय माहीत, तुम्ही दुष्काळग्रस्त, तुम्ही मागासलेले असा नैराश्यांचा पट तुमच्यासमोर उभा करणार.. आपलं किती छान(?), गोड गोड(?), आम्ही हे करतो(?), आमची शिक्षण परंपरा(?), आमच्याकडे वारसा(?), आमची भाषा(?), आमचा कूळ(?) आमची शैक्षणिक संस्कृती(?) प्रसारमाध्यमांना प्रसाराचं कंत्राट देऊन तुमची डोकी भ्रष्ट करणारं असं महानगराचं मार्केट.. अशा कथित पूर्वेच्या आॅक्सफोर्डा(?)त अकरावीपासून शिक्षणासाठीचे लोंढे.. बारावीपासून अभियांत्रिकी, सीएस, लॉ, फिल्म, टीवी, एमबीए, सीए इत्यादी शिक्षण व्यवहारात तरु ण पिढी.. शिक्षणाची स्वप्ने एकरभर शेती विकायला भाग पाडते, तर मध्यमवर्गीयांचा मेहनतीचा घाम पुण्या-मुंबईला पाठवतो.भरमसाठ फी भरून सिम्बी, भारती, डीवाय, एफसी, गरवारे, मॉडर्न, एसपी, आझम कॅम्पस, एमएमसीत प्रवेश. पीपीटी सांप्रदायात अडकलेल्या शिक्षकांच्या पिढ्या. सेल्फ स्टडीतून स्वत:च घडावं लागतं. प्रॅक्टिकलवर भर जास्त, स्व-कष्टातून कौशल्य विकासाला संधी आपणच निर्माण करायची. तुच्छतावाद व असुरक्षितेतून संधी, करिअरची स्वप्ने व प्रलोभने दाखवणाºया जाहिराती शहरभरात, लाखो रुपये महापालिकेला देऊन चिटकलेल्या. जाहिराती पाहून स्थलांतरित आणखीन अस्वस्थ होतात. खोपटेवजा अभ्यासिकेत प्रवेशासाठी पहाटेपासून रांग, हजारो-लाखो फी देऊनही प्रवेशासाठी दैना.. तमक्या-अमका पेठांमध्ये निवासी खोपटे, वाडे, फ्लॅट, चाळीत लोंढे स्थिरावले. घरमालकांच्या हजार सूचना, ढेकणांच्या निवासस्थानात रात्री पाठ टेकवण्यापुरता खोपटांचा वापर. हजारो रुपये भाडे आकारूनही घरमालकांच्या तुच्छतेच्या नजरा.४पेठेत-उपनगरात मेस भरमसाठ व्यवसाय. गरम पाण्यातून काढलेला भात, पिवळा रंग दिलेलं वरणाचं पाणी, जळक्या व अर्धकच्च्या चपात्या. वांगी, बटाटे, कोबी, वटाणे, हरभरा २० लाखांच्या शहरात एकच भाजी रोटेशनमध्ये. मेसचालकांचा दरमहा कोट्यवधींचा व्यवसाय.. चार बीएचकेपासून बंगलो कार, गाड्या भरपूर स्थावर मिळकत स्थलांतरितांच्या जेवणावर कमावलेत. शंभर-दीडशे कोटीचं वार्षिक मेस बजेट.. नोकरदारांची अपत्ये वर्षाकाठी किमान लाखभर खर्च करतात. मध्यमवर्गीयांचा किमान खर्च ७५ हजार. हाच आकडा उच्चभ्रूंसाठी पाच लाखांपर्यंत वाढतो.. हजारो कोटींचा पुण्याचा बाजार वार्षिक विद्यार्थ्यांच्या जिवावर चालतो. प्रकाशने, स्टेशनरी, क्लासेस, झेरॉक्स, चहा-नास्ता, स्नॅक्स, सिगारेटी, खैनी, हुक्का, बियर, दारू, पब, डान्स बार, मल्टिप्लेक्स कोट्यवधींची कमाई विद्यार्थ्यांकडून उकळतात. महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात पाणीपुरवठा व रस्ते दुरुस्तीएवढा विद्यार्थ्यांकडून उत्पन्न उकळतंय शहर.. सरकारची कमाई वेगळी.. फॉर्म, शिक्षण शुल्क, स्पर्धा परीक्षांचे फॉर्म, पीएमटीची हजारो कोटींच्या घरात.. पण या हजारो कोटी खर्च केल्याचं आउटपुट काय..? किती जण यशस्वी होतात..? लाखो विद्यार्थ्यांतून बोटावर मोजण्याइतके सक्सेस.. पुन्हा यांचाही वापर मार्केटिंगसाठी. तो आमच्या क्लासचा म्हणत स्पर्धा परीक्षावाले तुमच्याच जिवावर उठतात. काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार करायला वाव असतो. पण .. गमावल्याचं दु:ख जास्त होत असल्याने हा विचार करायची सोय नाही..
५पुणे असो की मुंबई किंवा दिल्ली या शहरात शिक्षणासाठी लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी येतात. तंत्र, विज्ञान आणि व्यावसायिक शाखेतील विद्यार्थी दोन-तीन वर्षांच्या शिक्षणानंतर चांगला हुद्दा व पगार मिळवून स्थिरावतात, अर्थात हेदेखील सोप्पं नाहीये. प्रचंड चुकीचा, सातत्य आणि श्रमानं हे मिळवावं लागतं. मिळवायचं काय तर बळकवावं लागतं. ज्यांना जमत नाही किंवा झेपत नाही असे, पटकन लक्षात घेऊन सोडून देतात किंवा इतर मार्ग चोखाळतात. या निर्णयात त्यांना यशही मिळतं; पण व्यावसायिक वगळता इतर शिक्षणपद्धतीत झेपत नसलं तरी रेटण्याची भूमिका वाढीस लागली आहे. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेनं श्रमाचं मूल्य कमी करून पैशांचं मूल्य वाढवलं. परिणामी धंदेवाईकवृत्ती बाजारात आणि शिक्षणात रूजली. बाजाराने भरपूर नफा मिळवला; पण शिक्षणव्यवस्थेची दैना झाली. रोजगाराभिमुख शिक्षणव्यवस्था आल्यानं अनेकांनी संधीचं सोनं केलं. पण, ज्यांना या शिक्षणव्यवस्थेचं मोल कळालं नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला अशांसाठी हा मार्ग अधिक खडतर बनला.
आरक्षण आणि शैक्षणिक सवलतींमुळे समाजातील मागास प्रवर्ग मुख्य प्रवाहात येऊ पाहतोय; पण अजस्त्र भ्रष्टाचाराने शिक्षण व रोजगारव्यवस्था बळकावली आहे. परिणामी दुर्बल घटकांना दर्जेदार उच्चशिक्षण घेणं अवघड झालं आहे. रोजगार व प्रतिष्ठा मिळण्यासाठी अनेकांची धडपड.. तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेऊन रोजगाराशिवाय पडून असेलली पिढी रोजगाराच्या शोधात स्पर्धा परीक्षांकडे, पत्रकार, डॉक्टर, इंजिनिअर, आयटी प्रोफेशनलिस्टपासून, बीएड, डीएड, बीसीए, नेट-सेटवाले शिपायापासून पोलीस हवालदार भरतीसाठी प्रयत्नशील आहेत; पण दिशा व मार्गदर्शन नसल्यानं पैसा व उमेदीची वर्षे तरुण पिढीची वाया जात आहेत. १०-१५ वर्षांनंतर या तरुण पिढीने रोजगारासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आता या विद्यार्थ्यांनी शांत मनाने विचार करण्याची गरज आहे, आपण जे करतोय ते योग्य आहे का? आपणास ही पद्धती झेपेल का? आपला रस कशात आहे? पालक, मित्र म्हणतात म्हणून स्पर्धा परीक्षांकडे वळू नका.. एकावर-एक आदळणाºया परीक्षांची तयारी करण्यापेक्षा एकच परीक्षा निवडा व त्याला पूर्ण वेळ द्या.. मास मोटिव्हेशनची व्हिडीओ बघून कदापि इकडे येऊ नका. प्रत्येकात उपजत कला, गुण असतात. फक्त त्यांना वेळीच ओळखायचं असतं. आपल्यात असलेली कौशल्यांचा विकास करायचा असतो. अगदी सहजपणे आपल्या क्वालिटी आपल्याला ओळखता येतात. त्या ओळखून लागा मार्गाला..
पुणे विद्यापीठाच्या काही मुलांनी केलेल्या खासगी सर्वेक्षणात यूपीएससीला येणारे तब्बल ८० टक्के विद्यार्थी मास मोटिव्हेशनचे व्हीडीओ बघून आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं.
* प्रेरक व्हीडीओ पाहून अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणारी ग्रामीण भागातील मुलांची संख्या जास्त आहे. भरमसाठ फी भरून अभ्यासिकेत प्रवेश घेताच काहीच दिवसात रोमण्टिक वाटणारा यूपीएससी अजस्त्र अजगर वाटू लागतो.
* २५-३० मिनिटांची प्रेरक भाषणं ऐकून यूपीएससी-एमपीएससी सोपी वाटते; पण एकदा अभ्यास सुरू केला तर त्याची खोली व भीषणता लक्षात येते. अशावेळी पुढेही जाता येत नाही व मागेही फिरता येत नाही. इकडे आड, तिकडे विहीरचा प्रसंग आज लाखो विद्यार्थ्यांवर आलेला आहे.
* ‘मी यशस्वी झालो!’, ‘परीक्षांचा कानमंत्र’, ‘वर्षभरात व्हा अधिकारी!’, ‘माझा यूपीएससीचा लढा’ इत्यादी अशी कित्येक पुस्तके आज बाजारात बहुसंख्येनं विकली जात आहेत. अशी पुस्तके वाचून अधिकारी कदापि होता येत नाही, त्यासाठी चिकाटीचा अभ्यासच लागतो.
* वारंवार मास मोटिव्हेशनचे व्हीडीओ पाहू नका, त्यातून तुमचं नैराश्य वाढत जाणार. तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळतात. यातून आयएएस अधिकारी व कोचिंगवाल्यांची दरमहा लाखो रु पयांची कमाई होते. कोचिंग क्लासेस, पब्लिकेशन आणि मार्केट अशी मोठी साखळी यंत्रणा तरु णांचे रक्त शोषणासाठी तयार झाली आहे. व्हीडीओ, पुस्तके, सीडीजच्या विक्र ीतून वार्षिक कोट्यवधींची उलाढाल होते; पण लाखो विद्यार्थी देशोधडीला लागले आहेत.
* १० वर्षांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांचा व्हीडीओ पाहून मलाही वाटले होते की मीदेखील आयएएस होऊ शकतो, पण काही दिवसातच मी आपली ‘अभ्यासीय लायकी’ ओळखली व स्वप्नातून खाडकन जागा झालो. पण आजही हा व्हीडीओ पाहून अनेकजण यूपीएससीकडे वळतात, हा निर्णय घेताना बहुतेकजण आपणास हा अभ्यास झेपेल का? हे विसरतात किंवा दुर्लक्षित करतात.
* नाईकवाडेंचे पुस्तक आणि नांगरे-पाटील यांचे व्हीडीओ पाहून अनेकांनी हातातला जॉब सोडला व स्पर्धा परीक्षांकडे वळले आहेत. अनेक आयटी प्रोफेशनल आणि इंजिनअर्स पाच आकडी पगाराची गलेलठ्ठ नोकरी सोडून अभ्यासाला लागले; पण चार-पाच वर्षांनंतरही त्यांना अजूनही यश लाभलेलं नाही. अनेकजण आज वयाच्या पिस्तशीत आहेत. शरीर थकलंय, पण यूपीएससीचा डोंगर फोडण्याची स्वप्ने आजही त्यांच्या डोळ्यांत आहेत.
* यूपीएससीच्या फायनल रिझल्टनंतर यशवंतांच्या सक्सेस स्टोरींचे पेव फुटते. औरंगाबाद-नाशिक-पुणे-मुंबईचे क्लासवाले नव्या यशस्वीतांना पुढे करून प्रेरक भाषणांचे जाहीर कार्यक्र म ठेवतात. मोठ-मोठी स्पॉन्सर्सशीप मिळवून लाखो रु पये भाषणातून कमावतात. पालक बळजबरी अशा भाषणांना मुलांना पाठवतात. एक-दीड तासाच्या भाषणातून भारावलेले किमान १०० मुलं तरी दरवर्षी तयार होतात.
* भाषणं व मोटिव्हेशन व्हीडीओ अभ्यासाची प्रेरणा व आत्मविश्वास देऊ शकतात; पण अभ्यास व त्याची दिशा तुम्हाला ठरवायची आहे.
* माझ्या ओळखीतले काही कोचिंगवाले विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगतात की हा अभ्यास झेपणार नाही तुम्ही करू नका, तुमचा पैसा वाया घालू नका. ते कमी आहेत; पण तरी यूपीएससी-एमपीएसीचा अभ्यास करण्यापूर्वी आपली एनर्जी व कुवत ओळखा. त्यानंतर शांत चित्ताने विचार करून योग्य तो निर्णय घ्या. ध्येय व धोरणं निश्चित केल्यानंतर घेतलेला निर्णय हा तुमचा असेल. मित्र व पालक सांगताहेत म्हणून कदापि यूपीएसएसी-एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करू नका.
* माघार घेतानाही मित्र-वडील-नातेवाईक-लोकं यांचा विचार करू नका. निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्यात अडकू नका. झेपत नसेल तर अजिबात मोह करू नका. मात्र, परीक्षा खरंच क्र ॅक करायची असेल तर इतरांचा विचार करू नका. पूर्ण तयारीनिशी इकडे-तिकडे लक्ष न देता अभ्यासाला लागा; पण याद राखा झेपत नसेल तर अजिबात अडकू नका. एखादा लेख वाचून किंवा मोर्चे पाहून अभ्यासातून माघार घेऊ नका. घरची परिस्थिती, वाया गेलेली वर्षे, पुढचं नियोजन करूनच जो तो निर्णय घ्या. डोकं वापरा.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)