- दत्तात्रय खेडेकर
हिमालय. या शब्दातच एक ओढ आहे. बर्याच वर्षापासून हिमालयात जाण्याची इच्छा माझीही होती. यावेळी युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (वायएचएआय) ही संधी चालून आली. दिनेश पाटील यांची 17 जणांची टीम ‘चंद्रखणी पास’च्या ट्रेकिंग मोहिमेवर जाणार असल्याची माहिती कळली. माझीही उत्सुकता वाढली. ही संधी सोडायची नाही असं मनानं पक्कं केलं. मात्र मनात एक शंका होतीच, मी एका हातानं आणि पायानं पोलिओग्रस्त. हा एवढय़ा उंचीवरचा ट्रेक आपल्याला जमेल तरी का, अशी मनात शंका आली. नाही म्हणायला सह्याद्रीतील पदभ्रमण, राजस्थानात ट्रेकिंगचा अनुभव मला होता. मन ऐकत नव्हतं. दिनेश पाटीलसर स्वतर् एका हातानं दिव्यांग असूनही हिमालयातील त्यांनी केलेल्या 20पेक्षा अधिक मोहिमा केल्या आहेत. मी या ट्रेकला जायचं ठरवलं.मुंबई, चंदीगड, मनाली असा प्रवास करून 4 जून 2018 रोजी मनालीजवळ ‘15 माइल्स’ या बेस कॅम्पवर आम्ही दाखल झालो. 1 मे ते 15 जून 2018 या दरम्यान 50 ते 60 जणांची बॅच दररोज चढाईसाठी जात असे. आमची 35 वी बॅच होती. बेस कॅपवर रिपोर्टिग केल्यापासून पहिले तीन दिवस बेस कॅम्पवरच आमचा मुक्काम होता. प्रशिक्षण/ वातावरणाशी समरस होण्यासाठी हे आवश्यक होते. पुढील दोन दिवस हलका व्यायाम व पहिल्या दिवशी अॅक्लमटाइझ होण्यासाठी 5 किलोमीटरचा वॉक, दुसर्या दिवशी 10 किमीचा वॉक, पर्वतावर सराव ट्रेक झाला. आपली क्षमता कळत होती. हायर कॅम्पसाठी कमीत कमी सामान कॅरी करण्याच्या सूचना बेस कॅम्प लीडरकडून वारंवार देण्यात येत होत्या. त्यानुसार अतिमहत्त्वाचं सामान रॅकमध्ये भरून अतिरिक्त सामान बेस कॅम्पवर जमा करण्यात आले.चौथा दिवस या दिवशी खर्या अर्थाने ट्रेकिंगला सुरुवात झाली. आमची 60 जणांची बॅच पाठीवर रॉक लावून सज्ज झाली. चार रांगेत शिस्तबद्ध उभे राहिल्यावर, कॅम्प लीडरने दिवसभराच्या ट्रेक रुटबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. राष्ट्रगीत झाल्यावर एका मागे एक असे हायर कॅम्पसाठी स. 8 वा. निघालो. युथ हॉस्टेल्सच्या प्रथेनुसार आमच्या नंतर रवाना होणार्या बॅचचे सदस्य दुतर्फा उभे राहून व विशिष्ट पद्धतीने टाळ्यांच्या गजरात आम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत होते.ट्रेकला सुरुवात झाली. मनात अपार ताकद दाटली होती, शरीराची परीक्षा होती. उंच पर्वतावर, थंड हवामानात ऊर्जा मिळावी असा हेल्दी आहार मिळत होता. त्यात बटाटय़ाचा अधिक वापर. सोबत दलिया, सूप, खीर, डाळ-भात, रोटी इ. पोषक आहार होताच. सततच्या चार दिवसांच चढाईमुळे आमची दमछाक झाली होती. पाचवा दिवस फार महत्त्वाचा होता. दोरानाला (उंची 10,692 फूट). या हाय कॅम्पवरून चढाई करत ‘चंद्रखणी पास ’ (उंची 12,190 फूट) हे या ट्रेकचं सर्वात उंच ठिकाण गाठायचं होतं. तेथून पुढील कॅम्प साइट ‘नया टप्रू (उंची 9970 फूट) येथे पोहचायचं होतं. हे अंतर 14 किलोमीटरचं होतं. अतिशय खडतर व अनेक चढ-उतार. लांब पल्ल्याचा मार्ग संपता संपत नव्हता. त्यातील अंतिम बराच मोठा मार्ग अतिशय निमुळता होता, जेमतेम एक व्यक्ती जाऊ शकेल असा मार्ग. त्यात डाव्या बाजूला पर्वत तर उजव्या बाजूला नजर पोहचणार नाही एवढी खोल दरी. पाय घसरला तर जिवंत राहणं असंभव.