- प्रसाद ताम्हनकर
सध्याच्या काळात अन्न, वस्र आणि निवारा यांच्या जोडीला स्मार्टफोनदेखील आला आहे असे गमतीनं म्हणलं जातं. पण खरं सांगायचं तर आता मोबाइल हा हळूहळू जीवनाचा अपरिहार्य असा घटक बनू पाहतो आहे. तेव्हा मोबाइलसारखा जोडीदार निवडताना काही गोष्टी खास विचारात घ्यायलाच हव्यात. त्यात आता दिवाळीत नवा मोबाइल घेणार असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.1) सगळ्यात आधी विविध स्मार्टफोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेणं आणि आपल्यासाठी योग्य असलेल्या सिस्टिमचा फोन निवडणं.
2) आपल्याला नक्की कोणत्या कोणत्या कामांसाठी मोबाइलची विशेष आवश्यकता भासणार आहे, त्याचा विचार करून मोबाइलच्या स्क्रीनचा साइज निवडणं.3) आपल्या कामांची गरज, त्यासाठी आवश्यक असणारा मोबाइलचा वेग, आपल्याला फाइल्स, फोटो इतर महत्त्वाची कागदपत्रे साठवण्यासाठी लागणारी जागा याचा विचार करून मोबाइलच्या स्टोरेजची निवड करणं.4) आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी कोणती कोणती अॅप्लिकेशन्स, जसं की ईमेल्स, फोटो एडिटर, व्हिडीओ कटर इ. वापरावी लागणार आहेत याचा पूर्ण अभ्यास करून, आपण निवडत असलेल्या मोबाइलमध्ये ती पूर्ण कार्यक्षमतेने काम करून शकणार आहोत का नाही, याची नीट खात्री करून घेणं.5) ज्या कंपनीचा मोबाइल आपण घेत आहोत, त्याचे गॅरंटी किंवा वॉरंटी नक्की कशाकशासाठी आहे, कोणत्या नुकसानीसाठी काय भरपाई आहे, सदर मोबाइल कंपनीचे सव्र्हिस स्टेशन आपल्या जवळच्या भागात आहेत का नाही, किंवा आपल्या शहरात सदर कंपनीची एकूण किती सव्र्हिस स्टेशन उपलब्ध आहेत याची निश्चित माहिती घ्यावी.6) एखादे मॉडेल नक्की केल्यानंतर मित्रांशी चर्चा करून, तसेच इंटरनेटवरती जाऊन सदर मॉडेल खरेदी केलेल्या ग्राहकांची मतं काय आहेत, त्यांना काही तक्रारी असल्यास त्या नक्की काय आहेत, त्या कंपनीकडून व्यवस्थित सोडवल्या जात आहेत का नाहीत याचीदेखील माहिती घ्यावी.7) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बजेट आणि आपल्या गरजा यांची योग्य सांगड घालूनच मोबाइलची खरेदी करावी.