- भरत भुटाले
स्वप्न सत्यात उतरविण्याची तयारी असणारेच आव्हान स्वीकारतात आणि ती गोष्ट तडीस नेतात. हीच खासियत ‘केआयटी’च्या विद्यार्थ्यांची आहे. यावर्षीच्या प्रारंभी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेला (एनएसएस) आॅनलाइन स्वरूप देऊन शिवाजी विद्यापीठाला पोर्टल बनवून दिले. आता एमसीएच्या विद्यार्थ्यांनी यूथ फेस्टिव्हलचे पोर्टल बनविले असून, ते प्रायोगिक तत्त्वावर कुलगुरूंसमोर सादर केले आहे. या पोर्टलमुळे फेस्टिव्हलची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी होणार आहे. त्याचबरोबर आॅनलाइनमुळे लाखो कागदांची बचत होणार असून, पर्यावरणपूरकतेच्या वाटचालीत आणखी एक पाऊल पडणार आहे.शिवाजी विद्यापीठातर्फे दरवर्षी यूथ फेस्टिव्हल साजरा केला जातो. कोल्हापूर, सांगली, सातारा कार्यक्षेत्र असलेल्या २८० कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा उपक्रम प्रत्येक वर्षी एका कॉलेजमध्ये आयोजिला जातो. यानिमित्त होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी होतात. कार्यक्रम आयोजित करण्यापासून फॉर्म भरणे, त्यातील माहिती, फोटो, फी, तसेच शेवटी स्पर्धेचा निकाल, अशी खूप मोठी प्रक्रिया असते. पोर्टल टीममधील अक्षय मगदूम पोर्टलबद्दल उत्स्फूर्तपणे बोलत होता. शिवाजी विद्यापीठ व ‘केआयटी’चे अनेक माध्यमातून अटॅचमेंट असते. त्यातूनच यूथ फेस्टिव्हलसाठी पोर्टल बनविण्याची संकल्पना समोर आली. प्रा. अमित वैद्य यांनी आमच्यासमोर हा प्रस्ताव मांडला आणि आम्ही एमसीएच्या दहा जणांनी हे आव्हान स्वीकारलं. प्रा. मृदुला पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पोर्टलची निर्मिती केली. प्रारंभी शिवाजी विद्यापीठाच्या यूथ फेस्टिव्हलची माहितीपुस्तिका अभ्यासून ं२स्र.ल्ली३ ६्र३ँ टश्उ अ१ूँ्र३ीू३४१ी टेक्नॉलॉजीचा वापर करून पोर्टल बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर माहितीपुस्तिकेच्या आधारे डेटा इन्पुटची प्रक्रिया राबविली. त्यात स्पर्धकाचे नाव, जन्मतारीख, विद्यार्थ्याचा फोटो, पीआरएन, शिक्षण, संपर्क क्रमांक आणि पत्ता, तसेच नियमावली हे मुद्दे समाविष्ट केले. मथळ्यात शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरून डिझाइन तयार केले. या पोर्टलमुळे आॅनलाइन फॉर्म भरता येणार असून, तो सबमिट झाल्याची रिसिट मिळते. तसेच हा फॉर्म विद्यापीठाला प्राप्त झाल्यानंतर डी.एस.डब्ल्यू. (विद्यार्थी कल्याण मंडळ) विभागात त्याची लगेच पडताळणी होते. त्यामुळे अडीअडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.हे पोर्टल विद्यापीठाच्या डी.एस.डब्ल्यू. विभागात दोनवेळा सादर केल्यानंतर ही संकल्पना संबंधितांना पसंत पडली. त्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमोरही पोर्टलचे सादरीकरण केले. पोर्टलचे डिझाइन व रिपोर्ट जनरेशन, फंक्शन पाहून ते भारावून गेले. त्यांनी त्यात काही महत्त्वाच्या सूचना सुचविल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेले पोर्टल विद्यापीठाच्या मान्यतेनंतर महाविद्यालयांसाठी खुले केले जाणार आहे.(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)