- अभिषेक भोसले
वयात येतानाचा काय; पण तरुण वयातही लैंगिक प्रश्न, समस्या, गैरसमज याविषयी विश्वासानं, खात्रीशीर बोलण्याच्या मोकळ्या जागा तर सोडाच कोपरे मिळणंदेखील अवघडच असतं. अनेकांच्या मनात किती प्रश्न असतात. लग्नापूर्वी लैंगिक संबंध ते गर्भप्रतिबंधकांचा वापर ते ‘नाही’ म्हणण्याची आणि ऐकण्याची तयारी इथपासून अनेक प्रश्न असतात. कधी मित्रमैत्रिणीतच उत्तर शोधली जातात तर कधी गूगल केलं जातं. त्यातून हाताला शास्रीय माहिती आणि खरी उत्तरं लागतातच असं नाही. मात्र तरुण मुलामुलींच्या लैंगिक स्वास्थ्याबद्दलच्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न पुण्यातील प्रयास हेल्थ ग्रुपने केला आहे. त्यातून आकार घेतलेली आजच्या पिढीतील तरुणांच्या लैंगिक स्वास्थ्यावर चर्चा घडवून आणणारी बेब सीरिज ‘सेफ जर्निज’ सध्या यू टय़ूबवर चालू आहे. प्रयास हेल्थ ग्रुप ही पुण्यातील आरोग्यविषयक काम करणारी संस्था आहे. 1994 पासून ही संस्था सार्वजनिक स्वाथ्य आणि आरोग्य त्यातही विशेषतर् लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि एचआयव्ही या अनुषंगानं संशोधन आणि जनजागृतीचं काम करत आहे.मागील दोन वर्षापासून प्रयास एक महत्त्वाचा प्रकल्प राबवत आहे ‘यूथ इन ट्रान्झिशन’. या प्रकल्पांतर्गत 20 ते 29 वयोगटातील अविवाहित शहरी तरुण- तरुणींच्या लैंगिक व मानसिक आरोग्य जडणघडणीचा प्रवास बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि जागतिक संदर्भामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न संशोधनातून केला जात आहे. मागच्या दोन वर्षात या संशोधनासाठी प्रयासने जवळपास 1250 तरुण-तरुणींच्या मुलाखती घेतल्या. या संशोधनात थेट सहभागी असणारी आणि सेफ जर्निज या वेबसीरिजचे काही भाग लिहिणारी मैत्रेयी ‘यूथ इन ट्रान्झिशन’ या संशोधनाबद्दल सांगताना म्हणते, ‘‘20 ते 29 या वयोगटातील युवक-युवतींच्या जगण्यामध्ये अनेक बदल घडत असतात. तसंच त्यांच्या जगण्यावर बाहेरचे अनेक बदलते संदर्भही परिणाम करत असतात. उदाहरणार्थ, जागतिकीकरण, शहरीकरण, तंत्रज्ञान, सोशल मीडिया, स्थलांतर, माध्यमं या सगळ्यामधून आजच्या पिढीचा प्रवास चालू असतो. नातेसंबंध, लैंगिक आणि मानसिक आरोग्य यांचा वर सांगितलेल्या संदर्भांशी परस्परसंबंध असतोच. पण आजच्या काळात तो नक्की काय आहे? तो कसा परिणाम करत असतो, त्यातून त्यांची यासंबंधीची समज, जाणिवा आणि त्यांना भिडण्याची क्षमता कशी तयार होते. ती अधिक कशी वाढवता येईल यासंबंधीचं हे संशोधन आहे. त्यापुढं जाऊन लैंगिक विषमता, लैंगिक असंवेदनशीलता तसंच पितृसत्ताक व्यवस्थेतूनतून निर्माण झालेला दृष्टिकोन बदलण्यासाठी काय करता येईल याचाही शोध या संशोधनातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.’’ या संशोधनात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींच्या सविस्तर मुलाखतींमध्ये शिक्षण, करिअर, स्थलांतर, नातेसंबंध, लैंगिक वर्तन, मानसिक आरोग्य, व्यसन, लैंगिक त्रासाचे अनुभव, कौटुंबिक वातावरण, लैंगिकतेबद्दल असणारी माहिती, त्यासंबंधी पडणारे प्रश्न, त्यासंबंधी असणारे दृष्टिकोन यांचा समावेश होता. अनेकांच्या मुलाखतींमधून जे सामाईक मुद्दे, क्षमता-अक्षमता पुढे आल्या त्याअनुषंगाने तरुणांमध्ये काही मुद्दय़ांवर अधिक जनजागृती करण्याची गरज प्रयासला वाटली. त्यातून सेफ जर्निज या वेबसीरिजची सुरुवात झाली. या वेबसीरिजमध्ये पर्ण पेठे, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे, अक्षय टांकसाळे, अभिषेक देशमुख इत्यादी मराठी सिने-नाटय़ सृष्टीमधील सेलिब्रिटी कलाकार काम करत आहेत, तर अनुपम बर्वे, आलोक राजवाडे व वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. आलोक राजवाडे आणि मृण्मयी गोडबोले हे प्रत्येक भागाच्या शेवटी प्रेक्षकांशी थेट संवाद साधत आहेत.या वेबसीरिजचं दिग्दर्शन करणारे अनुपम बर्वे या सगळ्या प्रवासाबद्दल सांगतात, ‘या वेबसीरिजमध्ये हाताळलेले विषय समाजामध्ये उघडपणे बोलले जात नाही. त्यांबद्दल एक प्रकारचा टॅबू झालेला आहे. त्यातून निर्माण झालेल्या दुर्लक्षितपणामुळं तरुण-तरुणींमध्ये लैंगिक प्रश्नांबद्दलची सुजाणता कमी प्रमाणता आढळते. या सीरिजमधून नातेसंबंध, लैगिक आणि मानसिक आरोग्य व त्यातून उद्भवणार्या समस्या, उदा. असुरक्षित लैंगिक संबंध, त्यासंबंधीची संमती आणि नातेसंबंधांतील तणाव या विषयांवर किमान चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तसंच याबद्दलच्या आरोग्य सेवासुविधांशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’’ अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ही निकोप चर्चा होणं आणि शास्रीय माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तरुणांच्या जगात अनेकदा लैंगिकता हा विषय विनोद, अश्लिलता आणि चावटपणाच्या चौकटीत बंद केलेला असतो. लैंगिक हिंसा, लैंगिक ओळख किंवा पॉर्नोग्राफी या विषयांवर उघड बोललंही जात नाही. त्यातून त्यासंबंधी पडणारे प्रश्न अनुत्तरित राहण्याची शक्यता जास्त असते. गैरसमज निर्माण होतात. मात्र त्याबद्दल जर मोकळेपणाने बोललं गेलं, चर्चा झाली तर नक्कीच मानसिक आणि लैंगिक दृष्टय़ा आरोग्यादायी समाज निर्माण करता येऊ शकेल.
प्रयास हेल्थ ग्रुपसंपर्क -www.prayaspune.org technopeer@prayaspune.org
(अभिषेक स्वतंत्र पत्रकार आहे.)