पृथ्वी शॉ. विश्वविजेत्या अंडर नाइण्टीन संघाचा कप्तान. मूळचा मुंबईजवळच्या विरारचा. वय वर्षे केवळ १८. या १८ वर्षांत तो सलग १० वर्षं कुठल्या ना कुठल्या संघाचं नेतृत्व करतोय. वय लहान असलं तरी त्याचा कर्णधार म्हणून अनुभव मोठा आहे आणि आजवर केलेल्या धावांचं तागडंही चांगलंच जड आहे. वयाच्या १४व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये त्यानं विक्रमी ५६४ धावांची खेळी केली होती. माध्यमांत तो पहिल्यांदा त्या खेळीमुळेच चमकला. त्याच्या रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेकडून खेळताना त्यानं हा विक्रम केला. मुंबई क्रिकेटला नवीन तेंडुलकर सापडल्याची चर्चाही माध्यमांत सुरू झाली. मात्र शालेय क्रिकेटचे हीरो अनेकदा या प्रसिद्धीच्या भोवºयात हरवून जातात. मुंबई क्रिकेटमध्ये अशी उदाहरणं कमी नाहीत.पृथ्वीनं मात्र स्वत:ला त्यापासून वाचवलं. त्याच्या ‘डॅडीं’नी त्याचा हात कधी सोडला नाही. पृथ्वी चारच वर्षांचा असताना त्याची आई गेली. वडील रेडिमेड कपड्यांचे व्यापारी. आपल्या मुलाचं क्रिकेट पॅशन पाहून रोज विरार ते वांद्रा, ते चर्चगेट असा त्यांचाही प्रवास सुरू झाला.त्या साºया कष्टांचा एक टप्पा ओलांडून पृथ्वी कर्णधार म्हणून थेट अंडर नाइण्टीन संघाचा विश्वचषक भारतात घेऊन आला.कसं पाहतो तो यशाकडे? काय आहेत त्याला सापडलेली यशाची - आणि अपयश पचवण्याचीही-सिक्रेट्स?पृथ्वीने अलीकडेच ‘लोकमत’च्या मुंबई मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्याच्याशी झालेल्या गप्पांतून उलगडलेली ही काही सूत्रं, त्याच्याच शब्दांत..
फोकसमी कधी फार पुढचा विचार नाही केला. प्रत्येक टप्प्यावर संधी येणार, ती आली की मी सोडणार नाही एवढंच ठरवलं होतं. मला माहितीये मला नेमकं काय करायचंय ते. नुकतीच सुरुवात केलीये, अजून भरपूर पायºया बाकी आहेत.- त्यात हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीपण होऊ शकतं. अपयश येतं, त्याच्यापाठी यशही येतं. त्यामुळे फोकस लागतो. अपडाऊन्स येतात. मात्र आपण आउट कसे झालो, अपयशात का अडकलो हे शोधत बसण्यापेक्षा त्यातून बाहेर कसं पडायचं, कमबॅक कसं करायचं याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं असतं.
प्रेशरप्रेशर सगळ्यांनाच असतं. प्रत्येकाची काही ‘लक्ष्य’ असतात. त्यासाठीचं प्रेशर असतं. प्रेशर हे एक चांगलं चॅलेंज आहे. प्रेशर आणि चॅलेंज नाय तर लाइफ काही कामाचं नस्तं!
शिस्तमैदानाबाहेरच नाही मैदानात पण पाहिजे आपल्याला शिस्त. तर पुढच्या पायºया दिसतात.आम्ही विश्वकप जिंकलो. पार्टी, आॅफिशियल डिनर झालं. तेव्हा द्रवीड सरांनी एकच सांगितलं की, आता आयपीएल खेळा. तिथं सेलिब्रेशन, पार्टी हे सारं असतं. तो पण या प्रवासाचा एक भाग आहे. ते पण एन्जॉय करा; पण त्यातून काही शिकून, ते पाहून पुढं जाणं हापण आपल्यासाठी एक ‘धडा’च आहे.
फिटनेसफिटनेस महत्त्वाचा आहे. मी लहान असताना एवढा फिट नव्हतो. त्याचा त्रासही झाला. त्यामुळे फिटनेस ठेवा. चांगलं खा. व्यायाम करा. ते फार महत्त्वाचं असतं.
आधी टीम, मग आपणआम्ही वर्ल्डकप खेळायला गेलो होतो. सगळ्यांना वाटतंच की आपल्याला खेळायला संधी मिळावी. पण जे संघात होते त्यांची आणि संघाबाहेर होती त्यांची संघभावना चांगली होती. सपोर्ट स्टाफपण आमचा संघच होता. आपण इंडियासाठी खेळतोय हे महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळे कुणी सेल्फिश नव्हतं. सगळे टीम म्हणून, टीमसाठी खेळले.