स्थळ : पुणे शहरातलं भरत नाट्यमंदिऱ ती सायंकाऴ नगरकरांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला़ ‘आय माय सॉरी.. नगर पडलं भारी, एमएच सोळा.. नादच खुळा, आवाज कोणाच्चा.. अहमदनगरचा, माइक आपला.. आव्वाजपण आपलाच, अशा टिपीकल नगरी घोषणा़कट टू अहमदनगऱ
स्थळ : लोकमत भवन पुन्हा त्याच घोषणा तोच उत्साह तोच जल्लोष पुन्हा जिंकल्याचा तब्बल ३५ वर्षांनंतर पुण्यात अहमदनगर जिंकलं होतं. राज्यातील नामांकित पुरुषोत्तम करंडकावर अहमदनगरच्या तरुण पोरापोरींनी हक्क सांगितला आणि तो जिंकूनही आणला. ते सारे त्याचा जोषात, पुण्यात साऱ्यांना भारी पडल्याचा आनंद शेअर करत होते. त्यातले काही अगदीच मिसरूड फुटू लागलेले तर काही झुपकेदार मिशांना टोकदार वळण दिलेले सारेच खेडूत तरुण नगरमध्ये शिक्षणासाठी गावपण मागे सोडून आलेले काहींनी तर चक्क इंजिनिअरिंग सोडून नाटकासाठी न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतले. आणि या पोरांच्या खांद्याला खांदा लावून दणादण मंडप उभारणारी एक बॅकस्टेज सांभाळणारी मुलगीही. एकएक जण आपापल्या परीने ‘माइक’च्या यशाची कहाणी सांगू लागू लागला़ ‘माइक’ या एकांकिकेनं नुकताच पुण्यात पुरुषोत्तम करंडक जिंकला. पुण्यात पुरुषोत्तम जिंकणं म्हणजे काय असतं हे नाटकवेड्या तरुणांना वेगळं सांगायला नको. अनेकांचं स्वप्नच ते, मानाचं, आपण सर्वोत्तम ठरल्याचं. तर तेच या तरुण मुलामुलींनी करून दाखवलं. म्हणून त्यांच्याशी गप्पांचा घाट घातला. मैफल जमली. तर ही मुलं सांगत होती. माइक या एकांकिकेविषयी. ‘माइक’चा जन्म वाघोलीत झाला, संदीप दंडवते सांगू लागले़ ‘मी एकदा पुण्याला जात होतो वाघोलीजवळ वाहतूक कोंडीत अडकलो़ खूप वेळ झाले बस जागची हलेना़ तेथून जवळच सभामंडप उभारणीचं काम सुरू होतं. कोणी उत्तर भारतीय भैया होता, कोणी मुसलमान होता, कोणी हिंदू होता, कोणी ख्रिश्चन होता जो-तो आपापली जात, धर्म, प्रांत विसरून मंडप उभारत होता मी बसमधून खाली उतरलो ते पाहू लागलो तेथे बहुतेक कोणत्यातरी नेत्याची सभा होणार होती़ मी थांबलो़ स्टेज उभं राहिलं. त्यावर माइक लावला गेला़ काही वेळाने सभा सुरू झाली त्याच माईकवरून तो नेता तावातावाने विशिष्ट समूहाविरोधात उपस्थितांना भडकावत राहिला़ सभा संपली़ मंडप उतरविण्याचं काम सुरू झालं. पुन्हा तेच कामगार, हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन आणि युपीवाला भैयाही हीच तर आहे, पुरुषोत्तम जिंकणाऱ्या ‘माइक’ची जन्मकथा़’ माइक एकांकिका लिहून तयार झाली होती. वेगवेगळ्या कॉलेजात शिकणारी पोरं एकत्र आली अन् त्यांनी ‘माइक’ ही एकांकिका बसवली. पोरांच्या कलेला स्टेज देणाऱ्या विविध स्पर्धा त्यांना गाजवायच्या होत्या़; पण संघ एकाच कॉलेजचा असायला हवा, अशी बहुतांश स्पर्धांची पहिली अट पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धाही त्याला अपवाद नाही. तिथे तर नियम खूपच कडक दरवर्षी या स्पर्धेत ५१ संघांना प्रवेश दिला जातो़ त्यातील ४१ संघ नियमित सहभागी होणारे व उत्कृष्ट कामगिरी करणारे असायला हवेत उर्वरित १० संघ नवख्या कॉलेजचे निवडले जातात, तेही चिठ्ठ्या टाकून नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये शिकणारा कृष्णा वाळके, त्यानं ठरवलं पुरुषोत्तमला एण्ट्री टाकायची़ पण कॉलेज पात्र ठरत नव्हतं. आता भरोसा चिठ्ठीवरच चिठ्ठी निघाली, त्यात नंबर लागला. नशिबानं पहिली साथ दिली. आणि पुरुषोत्तमसाठी तयारी सुरू झाली़ अगोदरच कृष्णाने वेगवेगळ्या कॉलेजमधील तरुणांना घेऊन ‘माइक’ एकांकिका बसवली होती़ आता पुन्हा गडी बदलण्याची वेळ आली़ कृष्णा वाळके. तो एकांकितेचा दिग्दर्शक तर आहेच; पण त्यात ‘बजा’ नावाची एक ही व्यक्तिरेखाही त्यानं साकारली आहे. तो सांगतो, ‘मी टीम तयार करायला सुरुवात केली़ भूमिकांसाठी मुलं शोधली. विराज अवचिते, संकेत जगदाळे, ऋषभ कोंडावार, अमित रेखी, निखिल शिंदे, आकाश मुसळे, शुभम पोपळ, अभिषेक रकटे हे एकेक पात्र म्हणून आले. प्रत्येकाला भूमिका समजावून सांगितली गेली़ यातील काहीजण पहिल्यांदाच स्टेजवर जाणार होते. त्यांना स्टेजवर जाऊन निव्वळ अभिनय करायचा नव्हता तर स्टेजवरच दुसरं स्टेज उभं करायचं होतं. त्यासाठी फक्त अभिनय गरजेचा नव्हता तर ओझंही उचलायचं होतं, देहबोली सांभाळायची होती. हे कसब आत्मसात करण्यासाठी सर्वांनी निर्णय घेतला, जिथं मंडप उभारणीचं काम सुरू असेल तिथं जायचं. तासन्तास त्या कामगारांचे निरीक्षण करायचं. त्यांच्या बोलण्याची लकब आपल्यात भिनवायची स्टेज उभारताना सुतळी, काथ्याच्या गाठणी अशा मारायच्या की ते पुन्हा उतरवताना सहज सुटल्याही पाहिजेत, हे सारं या पोरांनी नगरच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये फिरून शिकून घेतलं. या दोस्तांसोबत एक तरुणी प्रिया तेलतुंबडे भेटली. ही राकट पोरगी़ काम सांगा, नाही म्हणायची तिला सवयच नाही़ मंडप उभारणीसाठी टेबल उचलायचं, पोरांना जेवण द्यायचं, बांबू उचलायचे अशी पडेल ती कामं तिने केली़ प्रिया सांगते, ‘भूमिका देऊन झाल्या होत्या़ तयारीही जोरात सुरू झाली होती़ अशातच मी गेले आणि कृष्णाकडे या एकांकिकेत काम करण्याचा हट्ट धरला़ मला मिळालं बॅकस्टेजचं काम़ या एकांकिकेत काम करणारी सारी पोरंच पोरगी मी एकटीच पोरंपोरं त्यांच्या त्यांच्या गप्पागोष्टी करायचे. मी एकटीच रहायची बळच कोणातरी मुलासोबत जाऊन बोलण्याचा प्रयत्न करायची; पण मुलं टाळायचे हळूहळू सर्वांच्या ओळखी झाल्या आणि मीही मुलांमध्ये मिसळून गेले; पुढे मला एक मैत्रीणही मिळाली, तिचं नाव रेणुका ठोकळे’ अशी सगळ्यांची भट्टी जमली तयारी जोरात सुरू झाली पण युपीचा भैया साकारणारा विराज अवचिते याच्या संवादात ‘भैया’चा बाज काही उतरत नव्हता़ तो भाषेचा लहजा काही येईना. म्हणून विराजने ठरवलं, रोज पाणीपुरीवाल्याकडे जायचे़ त्याच्यासोबत गप्पा मारायच्या़ बळेच त्याला मैत्रिणीला फोन लावायला लावायचा़ त्याचं बोलणं, लाजणं, मुरडणं न्याहाळत बसायचा असा विराजचा दिनक्रम सुरू झाला़ अखेर त्यानं ऐकून ऐकून युपीचा भैया हुबेहूब साकारलाच़ भाषेचा लहजाही शिकून घेतला. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम चरणात ९ एकांकिका दाखल झाल्या़ त्यात नगरच्या ‘माइक’ व ‘ड्रायव्हर’ अशा दोन एकांकिकांचा समावेश होता. हा क्षणही नगरच्या नाट्यसृष्टीसाठी गौरवास्पदच म्हणायचा. अंतिम स्पर्धेचा निकाल हाती आला अन् त्यात ‘माइक’ला दिग्दर्शन, अभिनयाची दोन पारितोषिके मिळाली. मानाच्या पुरुषोत्तम करंडकावरही नगरच्याच ‘माइक’ने नाव कोरलं. सारडा कॉलेजच्या अमोल साळवे लिखित ‘ड्रायव्हर’मधील भूमिकेसाठी हरीश बारस्कर याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं. पुरुषोत्तम करंडकामध्ये कधी नव्हे ती चार पारितोषिकं आणि मानाचा पुरुषोत्तम करंडकही नगरमध्येच आला़ पुण्यातील भरत नाट्यमंदिराबाहेर नगरच्या तरुणाईने नगरी घोषणा देत जल्लोष केला़ या जल्लोषातच त्यांनी नगर गाठलं. नगरमध्ये या तरुणांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली़ आमदारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचे सत्कार घेत ही तरुणाई पोहोचली. ‘लोकमत’मध्ये आपल्याशी गप्पा मारायलाही आली. सळसळत्या रक्ताला सद्यस्थितीची असलेली जाणीवही त्यांच्या बोलण्यातून डोकावत होती़ निव्वळ धांगडधिंगा करणारी ही तरुणाई नव्हे तर जबाबदारीही तेवढ्याच उत्साहाने पेलणारे हे तरुण आहेत. जिवाची बाजी लावल्यागत तयारी करत त्यांनी पुरुषोत्तम करंडक जिंकला. आणि आपणही नाटकाची भाषा, नाटकाचं पॅशन जाणतो हे सिद्धच केलं!
२०१४ नंतर २०१७पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या गेल्या ५४ वर्षांच्या इतिहासात नगरकरांनी यापूर्वी फक्त दोन वेळाच पुरुषोत्तम करंडक पटकावला आहे़ २०१४ साली ही संधी नगरकरांना ‘हिय्या’च्या रूपाने आली होती़ परंतु ‘हिय्या’ला दुसºया क्रमांकावरच समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे ‘हिय्या’ एकांकिकाही संदीप दंडवते यांनीच लिहिली होती. २०१७ मध्ये ‘माइक’ने मात्र करंडक पटकावला़
हमाली केली; पण लिहिणं सोडलं नाही असा संदीपजाणता राजा नाटकामध्ये काम मागण्यासाठी गेलेला हा तरुण पुढे जाणता राजा नाटकाच्या प्रचाराचं काम करू लागला़ त्यासाठी पथनाट्य बसविलं अन् त्याचे जिल्हाभरात ४० ठिकाणी सादरीकरण केलं. रस्त्यावरून त्याच्या कलेची सुरुवात झाली़ ते २००५ साल होते़ नाटक करायचं म्हणजे स्वत:च लिहून ते बसवावं लागतं अशी या तरुणाची भाबडी समज़ म्हणून त्याने २००६ साली ‘हृदयांतर’ ही एकांकिका लिहिली अन् सादरही केली़ आता संदीप दंडवतेला लिहिण्याचा छंद जडला होता़ एक्सक्ल्युसिव्ह, आय अॅम द बिगिनिंग, शापित माणसांचे गुपित, दिवस तुझे हे फुलायचे, तत्पुरुष अशी दोन अंकी नाटके, तर हृदयांतर, तोच तो शेवट, आता कुठे जळल्या खुणा, मूक आक्रोश, गुरफट, हिय्या, दोन कट्टे, लबाड बिबट्या ढोंग करतोय, फ्लॅश, चोर आले रे चोर, माइक या एकांकिका संदीप दंडवतेच्या नावावर आहेत़ दरम्यानच्या काळात त्यानं पानटपरी, रिक्षाचालक, एमआयडीसीत हमाल, फायनान्स कंपनीत नोकरी, कुल्फ्या विकणे अशी विविध कामे केली; पण हात रिकामा राहू दिला नाही़ दिवसभर श्रमलेल्या हातात तो रात्री लेखणी धरायचा़ दिवसभर भारवाही हमाल असलेला संदीप रात्री शब्दांचा भार वहायचा व्हायचा आणि लिहित सुटायचा़ ‘भॉ’ नावाचा त्याने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे़
बीड ते नगर नाटकामागचा कृष्णाचा प्रवासबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर या गावचा कृष्णा वाळके. शाळेत असल्यापासून अभिनय करायचा. शाळेत त्याने स्त्री पात्रही वठविली. घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील शेतात राबतात, तर मोठा भाऊही शेती करतोय. घरात भाऊ सोडून कोणीच शिक्षित नाही; मात्र नाटकाच्या वेडाने शिक्षणासाठी नगर गाठलं. सध्या टीवायबीएस्सीत शिक्षण घेतोय. माइकचं दिग्दर्शन करण्याबरोबरच बजाची भूमिकाही त्यानं निभावली. त्याने दिग्दर्शन व अभिनयाचे पारितोषिक पटकावलं.
मिळेल ते काम करतो, पण नाटक सोडणार नाही म्हणणारा विराजपारनेर तालुक्यातील रुईछत्रपती या खेड्यातून आलेला विराज अवचिते. आई-वडील शेती करूनच घर चालवितात. घरी एक बहीण. शिक्षणासाठी त्यानं नगर गाठलं; पण पैशांची चणचण पाठ सोडत नाही़ त्यामुळे विराज सुटीत मिळेल ते काम करतो अन् कुटुंबाला हातभार लावतो. सध्या तो एफवायबीसीएच्या वर्र्गात शिक्षण घेतोय. माइकमध्ये त्यानं भैयाची भूमिका साकारली़ त्याच्या या भूमिकेला पुरुषोत्तममध्ये अभिनयाचे पारितोषिक मिळाले.
इंजिनिअरिंग सोडून नाटक करणारा आकाशआकाश मुसळे. हा मूळचा पारनेर तालुक्यातील वनकुटे गावचा़ लहानपणापासून अभिनयाची आवड. बारावीला चांगले गुण मिळाले म्हणून अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. एक वर्ष इंजिनिअरिंगही केलं. तिथेही टॉप राहिला. पण कलेला वाव नव्हता़ तिथे त्याचं मन रमलं नाही. इंजिनिअरिंगला राम राम करत न्यू आटर््स कॉलेजमध्ये एण्ट्री केली. अन् मग कलाक्षेत्रात त्याचा प्रवास सुरू झाला. ‘माइक’मध्ये त्याने मुश्ताक ही भूमिका साकारली.
बॅकस्टेजची प्रिया नगरमधील एमआयडीसीमध्ये राहणारी प्रिया तेलतुंबडे एक जिगरबाज मुलगी. चौकट मोडून वेगळे काहीतरी करण्याची तिच्यामध्ये धमक आहे़ म्हणूनच तिने टेबल उचलण्यापासून ते कष्टाची कामं करण्यापर्यंत सारं बॅकस्टेज एकहाती सांभाळलं. ती एफवायबीएला शिकतेय़ नाटकाचा तिचा प्रवास आता सुरू होतोय..