-ऑक्सिजन टीम
आय हेट माय टीचर!वो मुझ पे चिल्लाता है.ही इज द रिझन फॉर माय स्कार्स,ही लाइक इट व्हेन आय स्वेटव्हेन आय फॉलव्हेन आय काण्ट इव्हन ब्रिदही इज द रिझन फॉर माय पेनही डजण्ट केअर फॉर माय स्लीपआय हेट हीम बिकॉज ही नेव्हर गिव्हज अपआय हेट हीम बिकॉज ही बिलिव्हज इन मीमोअर दॅन आय डू इन मायसेल्फआय हेट हीम बिकॉज ही इज अलवेज राइट..- या ओळी म्हटल्या तर सिंधू आणि गोपीचंद या गुरु-शिष्य जोडगोळीनं केलेल्या एका एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीतल्या आहेत. मात्र या ओळीच पी. व्ही. सिंधू आणि पुलेला गोपीचंद यांच्या नात्याचीच नाही तर एका चॅम्पिअननं दुसरा चॅम्पिअन घडवण्याची कहाणी सांगतात. खेळातली शिस्त आणि समर्पण सांगतात.आणि ही गोष्ट सुरू होते तेव्हा सिंधू नावाची ही मुलगी फक्त आठ वर्षाची होती. शाळेत जायची, बॅडमिंटन खेळायची. त्या काळात ती सिकंदराबादला राहायची. हैदराबादमध्ये नव्यानंच सुरू झालेल्या गोपीचंद अकॅडमीपासून 30 किलोमीटर लांब. 2004ची ही गोष्ट. सकाळी शाळेत जायची आणि सायंकाळी तिचे वडील तिला प्रॅक्टिससाठी अकॅडमीत घेऊन यायचे. तेव्हा ही मुलगी चॅम्पिअन होईल आणि खेळात नाव काढेल असं कुणाला वाटलंही नव्हतं. तिच्यात टॅलेंट होतं, त्यात गोपीसरांची शिकवणी लागली तर उत्तम एवढाच तिच्या पालकांनी विचार केला होता. त्यामुळे 4 वर्षे रोज सायंकाळी एवढय़ा लांबून प्रॅक्टिसला येणं सुरू होतं. मात्र गोपीसरांनी सुचवलं की असं नाही चालणार, बॅडमिंटनवर फोकस हवा म्हणून मग पुढची दोन वर्षे ती अकॅडमीतच राहिली. मात्र घरच्यांशिवाय ही मुलगी फारच होमसिक होऊ लागल्यावर गोपीसरांच्या सांगण्यावरूनच सिंधूच्या पालकांनी अकॅडमीजवळ घर घेतलं आणि मग जरा गोष्टी सोप्या झाल्या.म्हणायला सोप्या झाल्या, पण अकॅडमीतलं सोपं जगणं काही फार सोपं नव्हतं. गोपीसरांची शिस्त प्रचंड. वेळ चुकलेली त्यांना अजिबात चालत नाहीच. त्यामुळे अकॅडमीच्या शिस्तीप्रमाणे पहाटे 4.30 वाजता कोर्टवर हजर असणं बंधनकारक असतंच. त्यावेळी स्वतर् गोपीसरही पोहोचलेलेच असतात. सुटी नावाची गोष्ट नाही. रविवारी सुटी घोषित असते, त्या दिवशीच काय तो आराम आणि चंगळ.पहाटे 4 ला दिवस सुरू होणार म्हणजे होणार. आपल्या सेशनला प्रॅक्टिसला हजर राहायचं. सेशन इतकं कडक असतं की दहा मिनिटात भलेभले खेळाडू धापा टाकायला लागतात. दोन तास सेशन झालं की नास्ता आणि छोटी डुलकी काढायला जाचयं. डुलकी काढायची म्हणजे काढायचीच. आणि परत ठरल्यावेळी सेशनला हजर. रात्री आठ वाजता झोपायला जायचं म्हणजे जायचं. कुणी कितीही मोठा खेळाडू असो इथं नियम बदलत नाहीत म्हणजे नाही. सिंधूही याच चक्रातून गेली. साईना नेहवाल, के. श्रीकांत. पी कश्यप, गुरुसाई दत्ता, बी साईप्रतीक हे सारे याच गोपीचंद फॅक्टरीतून तावून सुलाखून बाहेर पडलेले विद्यार्थी.
सिंधू अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगते, गोपीसर सांगत खेळाडूचं आयुष्य जगणं ही काही सोपी गोष्ट नाही. एकदा खेळावर लक्ष केंद्रित केलं की बाकी दुसरं काहीही करायचं नाही.तसं पाहता सिंधूची उंची जरा जास्त आहे. 5.11 इतकी या मुलीची उंची आहे. त्यावरून अनेकांनी ठरवून टाकलं होतं की, तिला काही फार भारी बॅडमिंटन करिअर करता यायचं नाही. कारण एकतर उंची दुसरं म्हणजे तिचे गुडघे कमकुवत आहेत. मात्र गोपीचंदने तिच्यातलं टॅलेंट हेरलं होतं, या मुलीवर काम केलं तर ही चॅम्पिअन होईल असं त्यांना वाटायचं. मात्र जे गोपीसरांना वाटायचं ते सुरुवातीच्या काळात सिंधूलाही वाटत नव्हतं. तीही स्वतर्ला गांभीर्यानं घेत नव्हतीच. नाही म्हणायला ती 2013 पासून आंतरराष्ट्रीय पदकं जिंकत होती; पण फायनल फिनिश ज्याला म्हणतात तिथवर जात नव्हती. 2015 सालची ही गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिअन ओपनच्या पहिल्याच फेरीत सिंधू बाद झाली. अर्थात ती स्वतर्ही निराश होतीच. त्यामुळे लगेच भारतात न येता, बहिणीकडेच ऑस्ट्रेलियात काही दिवस राहिली. तोवर गोपीचंदही तिला काही बोलले नाहीत.मात्र ती भारतात परतल्यावर गोपीचंदने तिला एक पत्र दिलं. त्या पत्रात तिच्यासाठी ‘डूज अॅण्ड डोण्ट्स’ स्पष्ट लिहिलेले होते. पुढचे आठ महिने तिनं काय करायचं, काय करायचं नाही, काय खायचं, काय खायचं नाही आणि कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही याची एक शिस्तशीर यादीच होती. सिंधूला वाटलं बाकी सगळं तर ठीक आहे; पण त्या यादीतला पहिलाच मुद्दा होता की सिंधूने आपला सेलफोन तातडीनं सरेंडर करायचा. मुळीच वापरायचा नाही, परत मागायचा नाही.सिंधूला वाटलं की ही काही गंमत आहे. पण ती तशी नव्हती, त्या क्षणापासून तिचा फोन ताब्यात घेण्यात आला. गोपीचंद सांगतात, ‘सिंधूचा सेलफोनचा वापर वाढलेला होता. सगळ्यांना मेसेज केले की तातडीनं रिप्लाय सिंधूचा यायचा इतका सतत तिच्या हातात फोन असायचा. तिचं लक्ष्य भरकटू नये यावरचा एक पहिला तातडीचा उपाय म्हणजे तिचा फोन वापर बंद करणं!’ तसा तो त्यांनी केलाही. सिंधू सांगते, ते आठ महिने फार कष्टाचे होते. माझं खाणंपिणं, प्रॅक्टिस सगळंच अत्यंत कडक शिस्तीचं होतं. सरांनी माझा एकेक विक शॉट तासन्तास गिरवून घेतला. एकच शॉट, पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा मला खेळून घोटवावा लागला. एवढंच नाही तर मी आक्रमक खेळावं, म्हणून एकदा सरांनी मला अकॅडमीत मधोमध उभं केलं होतं. म्हणाले, ओरड. जीव काढून ओरड. तुला जितकं जीव काढून ओरडता येईल तितकं ओरड. मला ओरडणंच शक्य नव्हतं. आवाज फुटत नव्हता, मला रडू कोसळलं, पण ओरडता आलं नाही. असं सरांनी कितीदा रडवलं असेल. पण आज मी जिथं कुठं आहे, ती केवळ सरांमुळेच आहे.’शिस्त, फोकस आणि समर्पण हे सिंधूनंही इतकं प्रचंड प्रमाणात घोटवलं स्वतर्त की अनेकदा विजयाच्या अगदी समीप येऊनही ती चॅम्पिअन झाली नाही. 2013 पासून सलग 2018 र्पयत ती ब्रॉँझ आणि सिल्व्हर मेडल जिंकत आली.यंदा मात्र ते जिंक्स तोडून तिनं वर्ल्ड चॅम्पिअन म्हणून स्वतर्ला सिद्ध केलंच.आणि सुवर्णपदक जिंकून दाखवलं.साधेपणासह कष्ट आणि शिस्तीची झळाळी त्या सुवर्णपदाची शान वाढवते आहेच.