-सायली जोशी
आई-वडील तर आपल्यासाठीच कमावतात ना, मग काय थोडी मजा केली तर काय बिघडलं? वडिलांचा तर इतका मोठा व्यवसाय आहे, मग मला त्यांनी आयफोन घ्यायलाच हवा. बाकी मुलांकडे अमुक एक बाइक आहे, मग आपली परिस्थिती असताना मला ती बाइक तुम्ही का घेत नाही?मला का जाऊ देत नाही, विदेश ट्रिपला?मला का नको डिझायनर ड्रेस?मला का नको स्मार्टफोन?पैसे देता तर काय उपकार करता का सगळेच पालक आपल्या मुलांसाठी एवढं करतात.***हे असे संवाद घरातून किंवा मित्रमंडळींच्या टोळक्यातून सहज कानावर येतात. पालकही म्हणतात की, कार्टी फार शेफारली, उद्धट झाली. कमवायची अक्कल नाही; पण बोलतात फार. अनेकदा आई-वडीलही एकुलता एक मुलगा किंवा मुलगी म्हणून खूप लाड पुरवतात. आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना मिळावं म्हणून जिवाचं रान करतात.***हे सगळं आपल्या मध्यमवर्गीय घरात होतं, कल्पना करा जी माणसं मल्टिबिलिअन डॉलर्स कमावतात, त्यांच्या घरात काय होत असेल?मुलांच्या खिशात पाण्यासारखा पैसा असेल?-असेलही. मात्र एक पालक त्यांना अपवाद आहेत, आणि तसं ते जाहीरपणे सांगतात.त्यांचं नाव आहे बिल आणि मेलिंडा गेट्स.***मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा असलेले बिल गेट्स. त्यांची भाषणं, त्यांचं काम हे सगळं तरुण जगात फार लोकप्रिय आहे. मात्र त्यांच्या घरात काय? त्यांच्या घरातही त्यांची तीन तरुण मुलं आहे. जेनिफर, जी विशीत आहे. रॉरी हा मुलगा शिकागोत शिकतोय आणि फोबी ही तिसरी मुलगी जी अजून शाळेत जातेय. म्हणजे वयात येणारी आणि तरुण अशी त्यांची मुलं आहेत.अलीकडेच एका टेट टॉकमध्ये मात्र बिल गेट्स यांनी सांगून टाकलं की, आम्ही खूप पैसा कमावला म्हणजे आता वारसा म्हणून तो पैसा आम्ही सगळ्याच्या सगळा आमच्या मुलांना देणार नाही. मुलांनी स्वतर्च्या हिमतीवर पैसा कमवावा. जगातील तिसर्या क्रमांकाची आणि अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीनं केलेलं हे विधान जगभर गाजलं. आपण कितीही संपत्ती कमावलेली असली तरी त्यावर केवळ आपल्या मुलांची मालकी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मुलांना प्रत्येकी 10 मिलिअन अमेरिकन डॉलर्स एवढेच पैसे मिळणार आहेत. ते पैसे आपल्याला फार वाटत असले तरी गेट्स यांची एकुण संपत्ती पाहता ते फार नाहीत.बिल गेट्स सांगतात, ‘एवढेच पैसे मुलांना द्यायला हवेत, ज्यातून त्यांना आयुष्यात काही करून पाहण्याचं स्वातंत्र्य मिळावं, मात्र एवढेही देऊ नयेत की, त्यांची काही करण्याची इच्छाच संपून जाईल. हा बॅलन्स सांभाळला पाहिजे.’ मुलांनी स्वतर् कष्ट करून आपल्या धनाची निर्मिती करावी, असंही ते सांगतात.आणखी विशेष बाब म्हणजे त्यांच्या या म्हणण्याचा त्यांच्या तिन्ही मुलांनी आदर केला आहे. आपले वडील जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात असताना त्यांनी मिळवलेला सर्व पैसा आपल्यासाठीच आहे ही भावना त्या मुलांमध्ये सहज येऊ शकते. मात्न या मुलांना आपल्या वडिलांच्या संपत्तीबाबत अजिबात गर्व नाही. उलट आपल्या वडिलांच्या म्हणण्याचा अभिमान आणि आदर असल्याचं ही मुलं सांगतात. बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी वयाच्या 14 व्या वर्षार्पयत मुलांना साधा मोबाइल फोनही दिलेला नव्हता. शिस्त आणि शिक्षण महत्त्वाचं यावर पालक म्हणून ते ठाम होते. नुकतेच एका मुलाखतीत बिल गेट्स यांना त्यांच्या संपत्तीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी मला माझी संपत्ती दान करायची आहे असं अगदी प्रांजळ उत्तर त्यांनी दिलं. माझ्या मुलांनी आपल्या हिमतीवर मोठं व्हावं आणि माझा मान वाढवावा, असंही ते सांगतात. आपण कमावलेली संपत्ती ही केवळ आपण आणि कुटुंब यांच्यासाठी नसून, आपण यातील मोठा हिस्सा समाजाला देणं लागतो हेही त्यांनी आपल्या उदाहरणातून जगाला दाखवून दिलं आहे.जे बिल गेट्स यांना जमलं, त्यांच्या मुलांना पटलं ते आपल्याला का पटू नये, हाच खरा प्रश्न आहे.