- श्रेणिक नरदे (shreniknaradesn41@gmail.com)
माणूस कुठेही जावो. तो वयाने कितीही मोठा होवो, पैसा भरपूर असो, बुद्धिवंत असो किंवा काहीही असो..कुणीही असो..जीवनात छळवणूक ही ठरलेलीच असते.अगदी कायम कोण ना कोण छळतच असतो त्याला. एकटाच जरी असला तरीसुद्धा त्याचं मन किंवा एखाद्या अदृश्य अशा फांदीवर बसलेल्या कोकिळेचा आवाज ही छळू लागतो.आपण सर्वसामान्य लोक म्हणतो किंवा कुणाचं तरी ऐकून म्हणू लागतो कोकिळेचा आवाज मधुर असतो. एकदोन वेळा कुहु कुहु ऐकून मधुर वाटणं ही योग्य गोष्ट. पण तीच कोकीळ सलग कुहुकुहु बोंब मारायला सुरुवात करते तेव्हा मधुर वाटणं बंद होऊन कोकिळेचा गळा का दाबू धये असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा तो आवाज आपला छळ करू लागलेला असतो. ज्या कोकीळ पक्षाच्या आवाजानं थोडा वेळ बरं वाटतं तोच आवाज सलग आला तर ते काही मेळात बसणारं नाही.अशीच जगातली प्रत्येक गोष्ट असते, जी आपल्याला आवडते तरीही त्यात सलगपणा आला किंवा अति झालं तर माणूस वैतागतो.आता हेच पाहा, आमचा सोमू उन्हाळ्याच्या सुटीतही अभ्यास करतो. असं सोमूचे आईबाप जेव्हा येणाऱ्या प्रत्येक पाव्हण्याला सांगू लागतात तेव्हा सुरुवातीलाच सोमू चष्मा लावलेले डोळे पुस्तकात अधिक जोरात खुपसतो. पण तेच आईबाप सोमूचा कौतुक सोहळा हरेक पाव्हण्याला ऐकवू लागतात तेव्हा कालांतरानं सोमू पुस्तक भिरकावून हिंडू लागतो. शाळा चालू झाली तरीही तो पुस्तक हातातच धरत नाही. अतिकौतुक सोमूलाच काय कोणालाही बिघडवतंय.आता मेन विषयावर येऊ.प्रेमातही हे असंच चालू असतं.आवडणं किंवा झक मारत मजबुरी असणं. या गोष्टीत माणूस बिघडतो. पोरं-पोरी बिघडून जातात. आता व्हाट्सअॅपच्या स्मायली/इमोजी तशाच पडून असतात फोनमध्ये, त्यांचा वापर ही वारेमाप करतात. ते किसचे स्टिकर असतात ते एवढ्या वेळा एका दिवसात पाठवले जातात की बिचारा मोबाइलदेखील म्हणत असेल माझ्या ओठांची सालपटं निघाली बास कर भावा.कधी त्या मोबाइलने बोलायला सुरुवात केली तर?तो सांगेल..मी कॉलिंगपुरता होतो त्यावेळी तुमचं काय काय ऐकावं लागायचं. तिथून नेट चालू झाल्यावर काय काय बघायला लागतं आणि आत्ता तर तुम्ही माझ्याकडून कायकाय करवून घेता, तुमचं जर हे असंच चालू राहिलं तर मी आत्महत्या करेन...अलीकडे मोबाइल स्फोट होऊन फुटतात ते कदाचित याचमुळे असेल. आत्महत्या हाच पर्याय त्या मोबाइल जवळ असावा. असा एकंदरीत त्याचा सूर असेल.तर हे कितीही गोडगोड, मधुर, कोमल आणि काहीही असलं तरी ठरावीक काळानंतर माणूस कंटाळतो. प्रेमात माणूस काहीही करत असल्यानं त्याला हे माफ करून टाकायला हवं.रोज माणूस देवळातल्या फुलासारखा टवटवीत, अगरबत्तीसारखा सुगंधी राहू शकत नाही. देवळातले फूलही रोज नवीन असते तो भाग निराळा. पण, माणसाचा एकंदरीत स्वभाव हा बदलत असतोच. त्याला पर्याय ही नसतो. तो किंवा ती बिचारे कायम एकाच मूडमध्ये कसे असू शकतील?प्रेम हे सुरुवातीला असंच मस्त गोड लागतं.थोड्या दिवसात कडू व्हायला सुरुवात होते. त्याला हे असं वागणं जबाबदार असतं.माझा एक मित्र त्याच्या प्रेयसीला पोहे आवडायचं म्हणून हा रोजच तिला डब्यात पोहे नेऊ लागला. एकदिवस बिचारी कंटाळली असेल डब्बा फेकून मारला. टण्णू आला डोक्यात.विचारल्यावर खासगीत त्यानं सांगितलं हे प्रेयसीने डबा फेकून मारला. याला वाटलं पोह्यात शेंगदाणं नव्हतं म्हणून मारलं असेल. दुसºया दिवशी परत पोह्यापेक्षा शेंगदाणे जास्त घालून हा गडी डबा घेऊन गेला तिच्याकडे, परत मार खाऊन आला. ती तर बिचारी रोज किती पोहे खाणार म्हणा. हेच तर होतंय. पूर्वी डोळ्यात बघून प्रेयसीला काय हवं आहे हे ओळखणारे लोक आणि मार खाऊनही दुसºया दिवशी डबा नेणारा माझा दोस्त मला एकाचवेळी दोन्ही लोक आठवतात. ही अशी छळवणूक माणसाची म्हणजे दोघांची व्यवस्थित दोन्ही बाजूने चालू असते.आपण काही करावं, ते समोरच्या व्यक्तीला लगेच पटावं, अशी वेळ येत नसते. त्यामुळे माणूस ज्यादाची उचापत करण्यापेक्षा रुटीनप्रमाणे जात असतो. पण त्यालाही काही मर्यादा असल्या तर प्रेम सुखाचे होते. सुखाचे नाही सोईचे होते.प्रेमीक जनता ही तशीच त्रासदायक नसते. पण, ते बिचारे एकमेकांचे असे प्रेम झेलत असतात. निदान फेसबुकवर तरी या एप्रिल- मे च्या सीझनमध्ये बरेच जण आपापल्या लग्नाला एवढी एवढी वर्षे झाली असे सांगतात. भारीभारी फोटो टाकतात. तेव्हा त्यांनी झेललेल्या कष्टाबद्दल आदर वाटल्यावाचून राहत नाही.एकत्र जगताना माणसाचे माणसाबद्दल गैरसमज होत राहतात. बरेचदा त्याकडे दुर्लक्ष करून, कधी समजावून घेऊन लोक आयुष्य घालवतात, तेही मजेशीर. त्यामध्ये कुठंतरी समजूतदारपणा दाखवल्याशिवाय पर्याय राहत नाही.