- अचर्ना राणो-बागवान
यूपीतल्या रेहुआ नावाच्या खेडय़ातला एक तरुण.
दलित वस्तीतला, जातीपातीचे चटके खाणारा.
त्यात गरिबी अशी की दोन वेळची भ्रांत.
हिंदी म्हणजे जेमतेम अवधीच बोलू शकणारा,
केवळ आपल्या गुणवत्तेच्या जोरावर
त्यानं मुंबई आयआयटीत प्रवेश मिळवला
आणि आता त्याची नवीन लढाई सुरू झाली आहे.
ब्रिजेश सरोज नावाच्या एका तरुणाचा आयआयटीर्पयतचा खमका प्रवास
स्वत:चं मनोबल ब्रिजेशनं लिहिलेल्या कवितेच्या या काही ओळी.
जब टूटने लगा हौसला
तो इतना याद रखना
बिना मेहनत के हासील
तख्तो ताज नहीं होते
धुंड लेते है अंधेरे में भी मंङिाल को
जुगनू कभी रोशनी के मोहताज नही होते..
‘‘मला माङया गावात, माङया जिल्ह्यात, माङया देशात एकही बाल कामगार नकोय. प्रत्येक मूल शिकलं पाहिजे.’’
- ही कोणा नेत्याची वा अभिनेत्याची महत्त्वाकांक्षा नाही. हे ध्येय आहे, एका सामान्य कुटुंबातील तरुणाचं. ब्रिजेश सरोज त्याचं नाव.
उत्तर प्रदेशातल्या रेहुआ लालगंज (जिल्हा प्रतापगढ) सारख्या मागास खेडेगावातला हा मुलगा. त्यानं जेईई क्र ॅक केली. म्हणजे देशातली इंजिनिअरिंगसाठीची सगळ्यात बडी प्रवेश परीक्षा. जिनं त्याच्यासाठी आयआयटीचं दार उघडलं!
दलित कुटुंबातला हा तरुण. त्याचे वडील धर्मराज सरोज सुरतमधल्या कपडा मिलमध्ये रोजंदारीवर काम करतात. महिन्याला आठ हजार कमावतात. आई प्रेमकुमारी गृहिणी. ब्रिजेशसह एकूण सहा भावंडं. पाच भाऊ एक बहीण. घरात अठराविसे दारिद्रय़. दलित म्हणून होणारी अवहेलना, त्रस, अपमान त्याच्याही वाटय़ाला आला आहेच. मुख्य म्हणजे त्याच्या घरातच काय, गावातही कोणाला आयआयटी माहीत नव्हती.
ब्रिजेश सांगतो, मी जेईई क्र ॅक केली आणि जणू काही आयआयटीचे नाही तर माङया नशिबाचीच प्रवेशद्वारं उघडली. मेरे लाइफ का बडा टर्निग पॉईंट! चॅनेल्सवाल्यांची माङया घरी रांग लागली होती. सगळे उत्साहात होते. पण मला आणि माङया कुटुंबाला वेगळीच काळजी. प्रवेशासाठी पैसे आणायचे कुठून? पोरगं पुढे जातंय. पण लाखाच्या घरातली फी भरायची कशी?
एक छोटी झोपडी. आठ बक:या. एक सायकल आणि एक टेबल फॅन इतकीच काय या कुटुंबाची पुंजी. शिक्षणासाठी बँकेतून लोनही प्रवेश मिळाल्यानंतरच दिलं जाणार होतं. मात्र त्या अगोदर प्रवेश निश्चित करण्यासाठी 5क् हजार रुपये भरायचे होते. एका वृत्तपत्रत ब्रिजेश आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल छापून आलं नि मदतीचे हात पुढे सरसावले. स्मृती इराणीने त्याला संपूर्ण शिष्यवृत्ती जाहीर करत त्याची आयआयटीची फी माफ केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्याला एक लाख रु पये व लॅपटॉप भेट दिला.
ब्रिजेश म्हणतो, बरीच राजकीय नेतेमंडळी मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येत होती. मी त्यांना एकच सांगायचो, माङया गावात वीज नाही, रस्ते नाही, पाणी नाही. कुठलीच सुविधा नाही. तेव्हा कुठे माझं गाव ‘लेहिया’ (मागास भाग) घोषित झालं. माङया गावात, माङया घरात वीज आली. कच्ची मातीची घरं जाऊन आता पक्की घरं बांधण्यास सुरुवात झालीय. तीही सरकारी मदतीनेच.
ब्रिजेशचा मोठा भाऊ राजेश एमएस्सी करतोय. तिसरा भाऊ राजू आयआयटी खरगपूरमध्ये शिकतोय. त्यानेही ब्रिजेशबरोबरच जेईई क्रॅक केली. त्याला 167 वी रँक मिळालीय. चौथा भाऊ राहुल अकरावीत, तर बहीण माधुरी पाचवीत. सहावा भाऊ रोहित दुसरीत शिकतोय. ब्रिजेश सांगतो, आमचं मागासलेलं गाव. इथल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळत नाही. मुलांना कामाला लावावं म्हणजे मिळकत दुगनी होते, हाच इथला समज. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे पार दुर्लक्ष. माङया वडिलांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. पण थोडं शिकलं तर पैसे अजून चांगले मिळतील, हीच त्यामागची भावना. आम्हाला जसं समजायला लागलं, तसं आम्हीही शिकत असतानाच छोटी मोठी काम करू लागलो. मीही एका गॅरेजवर काम करायचो.
ब्रिजेशचं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण गावातल्याच शाळेत झालं. शाळेत असताना त्याला ड्रग्जचं व्यसनही लागलं होतं. ही गोष्ट मोठय़ा भावाच्या वेळीच लक्षात आली. थोडा धाक, मार देऊन समजावून ब्रिजेशला त्याने या व्यसनातून बाहेर काढलं. तो नसता तर माझं शिक्षण थांबलंच असतं - ब्रिजेश सांगतो.
पुढे पाचवीनंतरचं शिक्षण नवोदय विद्यालयात. ब्रिजेश एकदा शाळेत उशिरा पोहचला. सर मुलांना फळ्यावर एक गणित सोडवून दाखवत होते. दरवाजात उभे राहून ब्रिजेश हे पाहत होता. त्याने सरांना सांगितलं, टीचर तुम्ही चुकीचं गणित सोडवलंय. उत्तरही चुकलंय. हातातला खडू टेबलवर ठेवत सर ब्रिजेशजवळ जाऊ लागले. ब्रिजेशही सरांचा मार खाण्याच्या तयारीतच उभा राहिला. पण त्यांचा हात त्याच्या पाठीवरून फिरला. ब्रिजेश, तू नवोदय विद्यालयात जा. काही दिवसांत तिथली प्रवेश परीक्षा सुरू होईल. फार कमी दिवस आहेत तयारीसाठी. पण तू तिथेच शिक. त्याच्या वडिलांना भेटून त्यांनाही तसंच सांगितलं. ब्रिजेशचं पुढचं शिक्षण नवोदय विद्यालयात सुरू झालं, तेही फुकट.
नवोदय ते आयआयटी
नवोदयमधून बारावी केल्यानंतर ब्रिजेश जेईईसाठी तयारी करू लागला. पण फस्ट अटेम्प्टमध्ये तो यशस्वी झाला नाही. त्याच्यातली हुशारी पाहून पाटणामधील एका कोचिंग इन्स्टिटय़ूटने त्याला जेईईसाठी फुकट ट्रेनिंग देऊ केलं. तो पाटणात जेईईची तयारी करत असतानाच त्याच्या भावाची निवड हैदराबादमधील दक्षणा फाउंडेशनमध्ये झाली. आम्हा दोघांनाही जेईईसाठीचं प्रशिक्षण फुकट मिळाल्यानेच आयआयटीपर्यंतचा प्रवास शक्य झाल्याचं ब्रिजेश सांगतो.
खेडेगावातून थेट मुंबईसारख्या शहरात आणि तेही आयआयटीच्या भव्य कॅम्पसमध्ये आल्यावर कसं वाटतं तुला? यावर ब्रिजेश उत्तर देतो, हॉलिवूड फिल्म. इथे सगळेच इंग्लिश बोलतात. क्लासरूमच काय इथले टॉयलेटदेखील अद्ययावत. मला इंग्लिश बोलता येत नाही, पण कळतं. मी इंग्लिशमध्ये बोलण्याचाही प्रयत्न करतोय. हळूहळू मी तेही शिकेन.
ब्रिजेशला आयआयटीतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयएएसची तयारी करायचीय, तर राजूला एमबीए करायचंय.
आता ब्रिजेशनं त्याच्या गावातल्या दहा मुलांना दत्तक घेतलंय. आयआयटीमधील शिक्षणासाठी त्याच्याकडे मदतीचा मोठा ओघ आला. जवळपास आठ लाख रु पये त्यांना मदत म्हणून मिळाले. त्यातले दोन लाख रुपये त्यानं या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचं ठरवलं आहे.
भेट मिस्टर परफेक्शनिस्टशी
आमीर खानने दोन आठवडय़ांपूर्वी त्याला भेटीसाठी बोलावलं होतं. कुठंतरी त्याच्याविषयीची बातमी वाचून आमीरनं त्याला भेटायला बोलावलं आणि काही मदत लागली तर सांग म्हणत प्रोत्साहनही दिलं.