मुंबईत राहणा:या सुप्रियाच्या मैत्रिणीचं लग्न नुकतंच झालं. अगदी जवळची मैत्रीण. तिच्या लग्नात सुप्रियाला एकदम हटके दिसायचं होतं. तशी ती तिच्या प्रत्येक गोष्टीबाबत खूपच चूझी. अगदी तिच्या चपलांपासून तिच्या कपडय़ा-ज्वेलरीपर्यंत. कपडय़ांमध्ये, ज्वेलरीमध्ये येणारा तोच तोपणा तिला नको होता. शिवाय महागडे कपडे, ज्वेलरी घेऊन ते तिला वर्षानुवर्षे कपाटातच ठेवायचे नव्हते. काय करायचं, या काळजीत असतानाच तिच्या वहिनीनं तिला कपडे नि त्याला साजेशी ज्वेलरी रेंटवर घेण्याचा सल्ला दिला आणि तिची शोधमोहीम सुरू झाली. विशेष म्हणजे तिला हवे तसे कपडे आणि ज्वेलरी तिला अगदी माफक किमतीत रेंटवर मिळालीही.
एखादी वस्तू भाडय़ानं घेण्याचा ट्रेंड काही नवा नाही. घरातलं फर्निचर असो वा कार, बाइक आपल्याला हव्या त्या वस्तू आपल्या खिशाला परवडतील अशा किमतीत रेंटवर उपलब्ध असतात. या गोष्टींमध्ये भर पडलीय ती कपडे आणि दागिन्यांचीही. गेल्या वर्ष- दीड वर्षाच्या अवधीत विविध कौटुंबिक सोहळ्यांसाठी कपडे, दागिने रेंटवर घेण्याचा ट्रेंडही वाढत चाललाय. इतकंच काय, नव:या मुलीही सध्या हजारो रुपये लेहंगा चोलीवर, साडय़ांवर खर्च करण्याएवजी ते रेंटने घेणंच पसंत करतात.
राजश्री हजारिका हिचं लग्न तिच्या गावी आसाममध्ये पारंपरिक पद्धतीनं होणार होतं. पारंपरिक पेहराव आणि दागिन्यांची खरेदी तर तिची झाली होती. पण रिसेप्शन दोनदा होणारं होतं. आसाममध्ये आणि मुंबईतदेखील.
ती सांगते, रिसेप्शनसाठी एकच लेहंगा चोली दोनदा घालायचं म्हणजे अतीच होतं. मला ते टाळायचं होतं. शिवाय आता इतके महागडे कपडे घेऊन ते पुन्हा वापरात एखाद्या फंक्शनदरम्यानच येणार. पण तेव्हा स्टाईल चेंज झाली असेल किंवा पुन्हा तेच कसं वापरणार? आणि मित्रमैत्रिणी पुन्हा विचारणारच, अगं हा तोच ड्रेस ना तू अमुक तमुक कार्यक्रमाला घातला होतास, तेव्हा अगदी कसंनुसंच होतं! मग रेंटचा पर्याय कधीही चांगलाच ना. खिशातले जास्त पैसेही जात नाहीत आणि प्रत्येक सोहळ्यात एकदम डिफरण्ट लूक. त्यामुळे मी माझ्या रिसेप्शनसाठीची ज्वेलरी आणि कपडेही रेंटवर घेणंच पसंत केलं.
असं सध्या अनेकींचं मत. एकच लूक किंवा स्टाईल प्रत्येक सोहळ्यात कॅरी करण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. इतरांपेक्षा वेगळं दिसण्याच्या नादात प्रत्येक सोहळ्यासाठी कपडय़ांपासून ज्वेलरीर्पयतची खरेदी होतच राहते. बरेचदा ते आउट आफ बजेट, खर्चिक ठरतं. शिवाय एखादा ड्रेस वा एखादी ज्वेलरी रिपिट झालेली हल्ली बायकांना आवडतही नाही. त्यामुळेच हा कपडे, दागिने मिळणारा रेंटचा सिलसिला सुरू झाला. इमिटेशन ज्वेलरीबरोबरच सोन्याचे तसेच हि:या-मोत्यांचे दागिनेही रेंटवर दिले जातात.
रेंटवर दागिने कुठे नि कसे मिळतात?
साधं ज्वेलरी ऑन रेंट असं गूगल केलं तरी आपल्यासमोर अनेक साइट्स येतात. एकदाच, मासिक, वार्षिक, कायम सदस्य असे अनेक प्लॅन्स भाडय़ानं कपडे देणारे देतात. प्रत्येक शहरात आता शोधलं तर असे भाडय़ानं कपडे देणा:या मुली, महिला सापडतील. अनेकींना तर घरगुती उद्योगही त्यातून मिळतो आहे.
मुंबईत रेण्टनं कपडे, ज्वेलरी देणारी जया कोकणो सांगते, लग्नसराईच्या दिवसांमध्ये नव:यामुलीसह तिच्या घरातल्यांसाठीही दागिन्यांची मागणी होते. मल्टी डायमंड, पोल्की, फॅन्सी स्टोन तसंच जोधपुरी ब्रायडल सेट्स, मोठा हार, चोकर, कानातले, मांगिटका, हातपंजे असं आता मुलींना हवं असतं. त्यामुळे अगदी पाचशे-सातशे-बाराशे रुपयांपासून दागिन्याच्या किमतीनुसार भाडं आकारलं जातं. दागिन्याचं नुकसान झालं तर काय म्हणून डिपॉङिाटही घेतलं जातं.
पण तरीही या गोष्टींना आता मागणी वाढते आहे, हे नक्की!
किराया - पराया असं मानण्याची एक रीत आपल्याकडे होती, पण आता तो किराया-पराया न मानता हौस भागवून घेण्याचा एक नवीन ट्रेण्ड रुजतो आहे, हे खरं!
- अर्चना राणो-बागवान
3
कारणं
जी म्हणतात. विकत नको,
भाडय़ानं आणू; हौस भागेल, पैसे वाचतील!
* लग्नातले कपडे, दागिने मग ते कितीही महाग का असू देत ते परत घालायचे म्हणजे निमित्तच शोधावं लागतं. नातेवाइकांच्या मित्र-मंडळींच्या लग्नातच या कपडय़ांना आणि दागिन्यांना वारं लागण्याची शक्यता. एरवी ते कपाटात बंदच. आता हजारोंचे कपडे आणि लाखांचे दागिने सांभाळणं काही सोपं काम नाही. त्यांची काळजी घेण्यात थोडी जरी कमतरता आली तर ते विरणार, फाटणारच! त्यात आता मानसिकता अशी की, इव्हेण्टसाठी घालून झालेले कपडे आणि दागिने पुन्हा दुस:याच्या कार्यक्रमात घालायचंही जिवावर येतं. इथेही काहीतरी नवीन हवं असतं. शिवाय तीन-चार वर्षात वजन कमीजास्त होतंच. लग्नात एकदम मापात असलेले कपडे पुढे दोन वर्षात अंगावर बसतही नाहीत. मग ते पुन्हा पेटीत जातात. त्यामुळे प्रश्न असा की, त्यापोटी एवढे पैसे खर्च करायचे का?
* पूर्वी इमिटेशन ज्वेलरीकडे खोटं आणि तकलादू याच नजरेने बघितलं जायचं. पण आता या ज्वेलरीनंही कात टाकली आहे. इतकी की आपल्या लग्नात इमिटेशन ज्वेलरी घालायची इच्छा अनेक तरुणींना वाटते. टीव्हीवर ती ज्वेलरी त्यांना सुंदर दिसलेली असतेच. त्यात खास लग्नातल्या कॉश्च्यूमला मॅच करणारी वेलडिझाइन ज्वेलरीची हौस या ट्रेण्डमुळे स्वस्तात भागवली जाते.
* पूर्वी लग्नाचा सोहळा साधारण तीन दिवस चालायचा. पण हल्ली बदलत्या ट्रेण्डमुळे लग्न सोहळ्यात गृहयज्ञ, मेंदी, संगीत, सिमांत पूजन, लग्न, रिसेप्शन असे पाच इव्हेण्ट किमान होतात. लग्न सोहळा आता चांगला पाच-सहा दिवस रंगतो. प्रत्येक सोहळ्याला वेगळा ड्रेस, वेगळे कपडे. सोबत ज्वेलरीही आलीच. मग एवढं सगळं खरेदी करायचं म्हटलं तर बजेटचे तीन तेरा वाजणारच. पण भाडय़ाच्या नवीन ट्रेण्डमुळे लाखो रुपयांचे कपडे आणि ज्वेलरी काही हजारांत घालायला मिळते. वेळ नुसती भागत नाही, तर घालणारे नवरा-नवरी खुलून दिसतात.
- प्राची खाडे
फॅशन स्टायलिस्ट