- एकनाथ कर्डिलेजेव्हा तो औरंगाबादला आला होता, तेव्हाचा दिवस आणि आजच्या दिवसात फरक काय, असं जर एकनाथला विचारलं तर तो सांगतो की, ‘मी खडीपासून एसीपर्यंत गेलो.’ नाही कळलं ना? काही वर्षांपूर्वी जेव्हा तो औरंगाबादमधील एका कॉल सेंटरवर इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला होता तेव्हा तिथला चकचकीतपणा, काचा, फर्निचर, रिसेप्शनमधला आलिशान सोफा पाहूनच अर्धा गार झाला. आजूबाजूला नजर फिरवली तर आपण इथे ‘आॅड मॅन आऊट’ असल्यासारखं त्याला वाटू लागलं. इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेल्या इतर जणांकडे पाहिल्यावर तर तो संपलाच. मिरखेडा हे त्याचं गाव. औरंगाबादपासून ९० किमी अंतरावर जेमतेम एक हजार लोकवस्तीचं. विशेष म्हणाव असं काही नाही. मराठवाड्यातील इतर खेड्यांसारखं एक खेडं. शेतात दिवसभर अंगतोड मेहनतीस जुंपण्याआधी आणि सायंकाळी श्वासही जड व्हावेत एवढं थकून आल्यावर पारावर दोन घटका बसून नापिक ी, बिनभरवशाच्या पावसाला शिव्या आणि ग्राम पंचायतीच्या राजकारणावर चालणाऱ्या गावगप्पा याशिवाय बोलायला दुसरा विषय नाही. शिक्षण घेणं ही काही तिथली ‘प्रायॉरिटी’ नाही. पोरगा कळता झाला की, शेतात मदतीला घ्यायचा. परीक्षा पास होण्या इतकंच शाळा आणि शिक्षणाचं महत्त्व. एकनाथचं बालपणसुद्धा यापेक्षा काही वेगळं नव्हतं. चौथीपर्यंत गावातील जि.प.च्या शाळेत आणि नंतर शेजारच्या विहामांडवा गावात बारावी पर्यंतच शिक्षण झालं.तो दहावीत असताना आईला कॅन्सरचं निदान झालं. उपचारांच्या अमाप खर्चामुळे आधीच बेताची आर्थिक परिस्थिती आणखीच बिकट झाली. तो सांगतो, ‘‘मला काम करण्यावाचून पर्याय नव्हता. म्हणून मग संपूर्ण अकरावीचं वर्ष मी गावाकडे मिळेल ते काम केलं. भर उन्हात रस्त्यावर खडी टाकली, विहीर खोदकाम केलं, बांधकामावर राबलो, कापूस वेचला. यातून जमा झालेल्या पैशातून मग मी बारावीची पुस्तकं, वह्या, कपडे घेतले. बारावीला नियमित कॉलेज केलं. वर्तमानपत्रातून स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाली. तेव्हा खऱ्या अर्थाने मला माझ्या आयुष्याचे ध्येय कळलं. यशस्वी अधिकाऱ्यांच्या कथा वाचून तर मी फारच प्रेरित झालो. आपणही स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं, असं ठरवलं.’’मोठं व्हायचं तर बाहेर पडावंच लागेल हे एकनाथला कळलं होतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करावी तर घरची परिस्थिती नव्हती. पण काम करून स्वत:चा खर्च भागवण्याची तयारी ठेवून त्याने औरंगाबादला ‘बीए’साठी अॅडमिशन घेतलं. महिन्याचा खर्च काढण्यासाठी मग त्याने वाळूंज एमआयडीसीतील एका कंपनीत नाईट शिफ्टला काम सुरू केलं. रात्री अकरा ते सकाळी सात डोळे फोडून काम करावं लागायचं एकाच वेळची मेस होती. एक वेळ नुसता कोरडा भात खायचा. कारण पगार फक्त २२०० रुपये.तेव्हा त्याला शिकणाऱ्या पोरांना कॉलसेंटरमध्ये नोकरी मिळते हे कळलं. तो म्हणतो, ‘मुलाखत घेणाऱ्या मॅडमने तु आणखी तयारी कर आणि पुन्हा येण्याचा सल्ला दिला. पर्यायच नव्हता. मी त्यांचं ऐकलं आणि एक-दोन-तीन वेळेस नाही तर सात वेळा पुन्हा मुलाखतील गेलो. प्रत्येक वेळी रिजेक्ट व्हायचो. प्रत्येक वेळी मला ते हे कर, ते कर म्हणून सांगायचे. अखेर मी आठव्या वेळेस गेलो तेव्हा त्यांनी ठरल्याप्रमाणे नाव विचारलं. दीर्घ श्वास घेऊन ‘ट८ ठेंी ्र२ ए‘ल्लं३ँ ङं१्िर’ी. क ें ा१ङ्मे ट्र१‘ँींि. ट८ ां३ँी१ ्र२ ां१ेी१.’ असं पाठ करून गेलेली वाक्यं बोललो. मला थोडसं सांभाळून घेत अखेर त्यांनी मला आॅफर लेटर दिलं. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. डोळ्यासमोरच ब्लॅक व्हाईट भविष्य रंगीत दिसू लागलं. हातात साडेचार हजार रुपये पडणार होते. त्या रात्री कधी नव्हे ती समाधानाची झोप लागली.’प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी कॉल सेंटरमध्ये ट्रेनिंग देण्यात येतं. एकनाथ मन लावून शिकला. विशेष म्हणजे स्वत:ला या जॉबच्या लायक न समजणारा एकनाथच ट्रेनिंग बॅचमध्ये सर्वाेत्त्कृष्ठ ठरला. तो सांगतो, ‘कॉल सेंटरमुळं नवीन जग मला कळलं. जगात असं पण काम असतं - टीम लीडर, फ्लोअर मॅनेजर, मॅनेजर, कस्टमर सॅटिसफॅक्शन, क्वालिटी, एचआर विभाग, रिझ्युमे, जॉब अॅप्लिकेशन असं सगळं कळत असताना मी समृद्ध होत गेलो. प्रत्येक नवीन शब्दागणिक माझा आत्मविश्वास वाढत गेला. भाषाशुद्धी, व्याकरण, उच्चार, अदब, विनंती कशी करायची हे शिकलो. कस्टमर्सशी बोलून बोलून माझी हिंदी सुधारली. चार चौघांत बोलण्याची हिंमत आली. कंम्प्युटर आणि तांत्रिक ज्ञान मिळालं. दर महिन्याला मिळणारा पगार तर होताच पण कॉलसेंटरमध्ये जे स्किल्स मी शिकलो ते मला जास्त महत्त्वाचे वाटतात.’दिवसभर कॉलेज करून एकनाथ संध्याकाळी कॉलसेंटरला जायचा. दोन्ही लहान भावांनापण मग त्याने औरंगाबादला बोलावून घेतलं. मनोज मधला तर सोपान धाकटा भाऊ. मनोजने बी. कॉमला तर सोपानने अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. तिघांना महिन्याकाळी येणारा सगळा खर्च एकनाथच्या कॉलसेंटरच्या पगारावर भागवायचा. ‘खूप काटकसर करावी लागते. कपड्यालत्त्याची चैन नाही की, स्मार्टफोनची हौस नाही. शिकायला मिळतंय यातच सगळं काही मिळवल्याचा आनंद. ओव्हर टाईम, डबल शिफ्ट काम करून कसाबसा तिघांचा खर्च निघायचा.’या सगळ्यात एकनाथचं अधिकारी होण्याचं स्वप्न मागे पडलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला वेळच मिळेना. तिकडे कॉल सेंटरमध्ये पोस्टपेडच्या ‘कॉर्पोरेट कस्टमर’ विभाग म्हणजे टॉपवर तो पोहोचला होता. त्याच्या कामावर वरिष्ठदेखील जाम खुश होते. पण दोन वर्षे कॉल सेंटरचा जॉब केल्यावर अधिकारी बनण्याची ओढ त्याला स्वस्थ बसून देईना. लहान्याची बारावी झाली आणि त्याने ‘बीसीए’साठी अॅडमिशन घेतलं. एकनाथ सांगतो, ‘सोपान बारावी पास झाल्यावर मी थोडा रिलॅक्स झालो. मग मी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करू लागलो. पण त्यासाठी मला जॉब सोडावा लागणार होता. ते सोपं नव्हतं. याच जॉबने मला चांगले दिवस दाखवले होते. खडीतून उचलून एसीत बसवलं होतं. आम्हा तिन्ही भावांचे शिक्षण पूर्ण केलं होतं. पण मला यापेक्षा मोठं व्ह्यायचं होतं. घरी सांगितलं तर म्हणाले, ‘मिळतायत ना दोन पैसे तर मग कशाला एमपीएसी-यूपीएसीच्या नादाला लागतो. ते आपलं काम नाही.’ पण कॉल सेंटर तरी कुठं आपलं काम होतं? पण केलंच की ते! मग आपण हे करू शकतो तर अधिकारी का नाही होऊ शकत? मग मी स्वत:लाच स्वत:चं प्रेरणास्थान बनवलं आणि जॉब सोडला.’एकनाथच्या मदतीला धावून आला तो लहान भाऊ सोपान. आता त्याने कॉल सेंटर जॉईन केलं. मोठा भावाने इतक्या दिवस कमूवन आपल्याला शिकवलंय आता आपली बारी म्हणत तो आता एकनाथला मदत करतो आहे. एकनाथ झपाटून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. त्याची जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी होईल हा विश्वास आहे. तो म्हणतो, ‘कॉल सेंटरवर मी संवाद कौशल्य आत्मसात केलं. कमीतकमी शब्दांत कसं बोलायचं, समोरची व्यक्ती रागात जरी असली तरी विनम्रपणे त्याला कसा प्रतिसाद द्यायचा, टीम मॅनेजमेंट, नेतृत्त्व, क्राईसिस मॅनेजमेंट, उपलब्ध असलेल्या रिसोसर्सेचा कसा पुरेपुर वापर करायचा या गोष्टी मी शिकलो. ज्याचा फायदा जन्मभर होणार आहे. अधिकारी झाल्यावर तर होणारच आहे. गरज आहे ती फक्त स्ट्रगल करत असताना हार न मानण्याची’........................................................................
... खडी ते एसी!
By admin | Published: August 18, 2016 3:49 PM