हरयाणातलं शहाबाद मरकांडा हे गाव माहीत आहे?
अगदी छोटंसं गाव. ना धड शहर, ना धड खेडं.
पण हे गाव ‘सोन्याच्या हॉकी’साठी प्रसिद्ध आहे.
काही वर्षापूर्वी हे गाव कोणाच्या खिजगिणतीतही नव्हतं, पण इथल्या मुलांनी, विशेषतर् मुलींनी आपल्या गावाला, अख्ख्या देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध केलं आहे.
या छोटय़ाशा गावानं आत्तार्पयत खूप हॉकीपटू भारताला दिले आहेत. भारतीय हॉकी संघातून खेळलेला ऑलिम्पियन संदिपसिंग याच गावचा. भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार रितू राणी याच गावची. तिच्याच नेतृत्वाखाली तब्बल 36 वर्षानंतर भारतीय महिलांचा हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. नुकत्याच झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या राणी रामपाल आणि नवज्योत कौर याच गावच्या.
भारतातलं हे एकमेव गाव आहे ज्या गावातल्या तब्बल चार हॉकी खेळाडूंना अजरुन अॅवार्डनं गौरवण्यांत आलं आहे- सुरिंदर कौर, जसजित कौर, राणी रामपाल आणि संदिपसिंग. कॉमनवेल्थ, एशियन गेम्स, ज्युनियर वर्ल्डकप, सिनियर वर्ल्डकप. अशा कितीतरी स्पर्धा इथल्या मुलींनी गाजवल्या आहेत.
याचं मुख्य श्रेय आहे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बलदेव सिंग यांचं. अगोदर तेच इथं मुख्य प्रशिक्षक होते. या छोटय़ाशा गावाला आंतरराष्ट्रीय पातळीर्पयत नेलं ते त्यांनीच. रक्ताचं पाणी केलं त्यासाठी! त्यांच्यानंतर ही जबाबदारी नुकतीच गुरबाजसिंग यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
एवढे आंतरराष्ट्रीय हॉकीपटू या छोटय़ाशा गावानं देशाला दिले.असं आहे तरी काय या गावाच्या मातीत?
यासंदर्भात ऑलिम्पिक खेळाडू थेट राणी रामपालशीच बोलणं झालं.
ती सांगते, ‘जिद के सिवा कुछ नाही है हमरे गावमें! आजही अनेक खेळाडूंचे वडील मजुरी करतात. आई लोकांकडे धुणीभांडी करून कसाबसा गुजारा करते. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे असा, चांगल्या खात्यापित्या घरातला एकही खेळाडू तुम्हांला इथं सापडणार नाही. आमच्या अगोदर ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव गाजवलं, ते सारे खेळाडूही अशाच घरांतून आले आहेत. धड खायला-प्यायला नाही, घालायला कपडे नाहीत, ते महागडय़ा हॉकी स्टिक तरी कुठून आणणार? माजी प्रशिक्षक बलदेवसिंग यांनीच हॉकी स्टिक, शूज सगळ्यांना पुरवले.
असं हे अफलातून गाव.
माजी कर्णधार रितू राणी याच गावची. तब्बल 36 वर्षानंतर तिच्याच कारकीर्दीत भारतीय महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. त्यात तिची कामगिरी खरोखरच लक्षणीय होती, पण ऑलिम्पिक ऐन तोंडावर आलं असताना हॉकी इंडियाशी झालेल्या मतभेदांमुळे राणीनं तडकाफडकी राजिनामा दिला आणि भारताला मोठा धक्का बसला. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची ‘हुकमाची राणी’च मैदानावर नव्हती. नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम झालाच.
वयाच्या नवव्या वर्षापासून राणी हॉकी खेळते आहे. दोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय सिनिअर संघात 2006 मध्ये तिची निवड झाली. याच वर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही ती खेळली. त्यावेळी ती केवळ चौदा वर्षाची होती. संपूर्ण संघात त्यावेळी ती सगळ्यांत लहान वयाची खेळाडू होती.
2009 मध्ये रशियात झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत भारतीय महिला संघानं अजिंक्यपद मिळवलं. त्यात राणीची कामगिरी नजरेत भरणारी होती. या स्पर्धेत तिनं सर्वाधिक आठ गोल झळकवले. राणीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे 2011 मध्ये भारतीय महिला संघाचं कर्णधारपद तिच्याकडे सोपवण्यात आलं. या संधीचं चिज करताना अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिनं भारताला पदकं मिळवून दिली. 2013च्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्यपदक, 2014च्या एशियन गेम्समध्ये ब्रॉँझ. अशी यशाची चढती कमान मग सुरुच राहिली. आपल्यापेक्षा बलवान असलेल्या जपानच्या संघाला हरवून मिळवलेली ऑलिम्पिक पात्रता हा त्यातला मानाचा शिरपेच.
मात्र त्यानंतर झालेल्या मतभेदांमुळे राणीनं थेट निवृत्तीच जाहीर केली. खरं तर हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळता आलं असतं आणि राणीसारख्या उत्तम खेळाडूची निवृत्ती टाळता आली असती, पण उशिरा का होईना राणीचं मतपरिवर्तन करण्यात आता यश आलं आहे आणि आपली निवृत्ती तिनं मागे घेतली आहे. तिच्या या निर्णयाचा आदर करून हॉकी इंडियानं नुकतीच तिची भारतीय महिला संघात निवडही केली आहे.
दरम्यानच्या काळात गेल्या वर्षी पंजाबी गायक हर्ष शर्मासोबत रितू राणीनं विवाह केला आहे.
विवाहानंतर हॉकीच्या मैदानात राणीची दुसरी इनिंग आता लवकरच सुरू होणार आहे.
येत्या एक एप्रिलपासून कॅनडा येथे ‘हॉकी वर्ल्ड लिग राऊंड-2’ स्पर्धा सुरू होत आहे.
‘राणी’सारखी खेळणारी राणी या स्पर्धेत पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशीच तिच्या सार्या चाहत्यांची अपेक्षा आहे.